तेजस्वी यादवांची खुर्ची रिकामी

0
74

महाआघाडीतील मतभेद आणखी तीव्र
पाटणा, १५ जुलै 
भ्रष्टाचार आणि बेनामी संपत्तीच्या घोटाळ्यात अडकलेले बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरून महाआघाडीतील वाद शिगेला गेला असतानाच, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या एका कार्यक्रमाला तेजस्वी यादव यांनी आज शनिवारी पाठ दाखवून, महाआघाडीत काहीच चांगले नसल्याचे संकेतच दिले.नितीशकुमार यांच्या उपस्थितीत आज पाटण्यात जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर तेजस्वी यादव यांच्यासाठी खुर्ची आणि त्यांच्या नावाची पाटी ठेवण्यात आली होती. मात्र तेजस्वी यादव येणार नसल्याची माहिती मिळताच त्यांच्या नावाच्या पाटीवर कापड झाकण्यात आले. त्यानंतर ती हटविण्यात आली.
तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याने आणि सीबीआयने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला असल्याने, तसेच तेजस्वी यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा, अशी नितीशकुमार यांची भूमिका असल्याने, मुख्यमंत्र्यांसोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहण्यास तेजस्वी यादव यांनी नकार दिला असल्याचे सूत्रांचे मत आहे. राजकीय तज्ञांच्या मते, तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही ते सत्तेत कायम असल्याने नितीशकुमार स्वत:च्या स्वच्छ प्रतिमेविषयी चिंतीत आहेत. त्यामुळेच ते सार्वजनिक कार्यक्रमात तेजस्वी यादव यांच्यासोबत अंतर कसे ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहेत.
राजीनाम्याची शक्यता कमीच
दरम्यान, तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता फारच कमी आहे. नितीशकुमार यांनी स्वत:च आपल्याविरोधात बडतर्फीची कारवाई करावी, याची ते प्रतीक्षा करीत आहेत. असे झाल्यास महाआघाडी धोक्यात आणल्याचा आरोप जदयूवरच जाईल आणि राज्यातील लोकांची आपल्याला सहानुभूती मिळेल, अशी रणनीती लालूप्रसाद यादव यांनी तयार केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)