पेढा अधिकच गोड झाला!

0
161

वास्तव
••गेल्या महिन्यात भाजपाचे अध्यक्ष अमितभाई शाह महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर आले असताना, मुंबईच्या संघ कार्यालयात त्यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील काही निवडक पदाधिकार्‍यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रम संपता संपता एक सुखद बातमी देण्यात आली. रवींद्र भुसारी यांचा आज वाढदिवस असून ते वयाची साठी पूर्ण करीत आहेत. या आनंदाप्रीत्यर्थ सर्वांना पेढे देण्यात आले. पेढा चांगल्या गुणवत्तेचा असल्यामुळे तो खाताना आनंद वाटला; परंतु तेव्हा हा पेढा रवींद्र भुसारी यांच्या निवृत्तीचा पेढा असेल, असे कुणाला वाटले नाही. ज्या सहजपणे त्यांनी निवृत्ती स्वीकारून एक मापदंड निर्माण केला, त्याचे मोल फार मोठे आहे.
काही बातम्या अत्यंत अनपेक्षित असतात. अशी अनपेक्षित बातमी आली की, ती बातमी वाचणारा आणि ऐकणारा आपल्या प्रतिभेप्रमाणे त्या बातमीचे अर्थ काढीत राहतो. भाजपाचे संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी आपले संघटनमंत्री हे पद सोडले. पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बहुतेकांना तो अनपेक्षित होता आणि अनपेक्षित असल्यामुळे त्यावर खळबळ सुरू झाली. एक-दोघांनी मला फोन केले आणि विचारणा केली. त्यांची अशी अपेक्षा होती की, मला याची काही माहिती असेल; परंतु याची मला काहीच माहिती नव्हती. प्रश्‍न विचारणार्‍यांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे रवींद्र भुसारी यांची भाजपामधून हकालपट्टी का केली? असा प्रश्‍न मला विचारला. प्रश्‍न ऐकताक्षणीच मला हसू आले. भाजपा, संघ यांची माहिती नसणारे असा प्रश्‍न विचारू शकतात किंवा त्यांना असा प्रश्‍न पडू शकतो, हे मला समजते; परंतु वर्षानुवर्षे संघात आणि भाजपामध्ये काम करणार्‍यांच्या मनातही असा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर दुःख होते.
हा लेख लिहीत असताना माझ्यापुढे एक बातमी आहे. भुसारींचा राजीनामा की हकालपट्टी? या शीषर्काने सुरू झालेल्या बातमीचा खालील मजकूर, सूत्रांनी सांगितले की, भुसारी यांच्या कार्यशैलीविषयी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे आमदार, खासदार व बर्‍याच जिल्हाध्यक्षांमध्ये नाराजी होती. राज्य शासनाचे चांगले निर्णय जनतेपर्यंत नेण्यासाठी पक्षसंघटना कमी पडली, असा नाराजीचा सूर होता. बातमी लिहिणार्‍यांनी कोणती सूत्रे हे सांगितले नाही. कारण अशी बातमी कार्यालयात टेबलवर बसून लिहायची असते. अशा बातमीचा एक साचा तयार झालेला असतो. त्या साच्यातील वाक्यं काढायची आणि बातमी लिहायची. कोण नाराज झाले? का नाराज झाले? वगैरे वगैरे कपोकल्पित कथा लिहायच्या, कारण नुसता राजीनामा ही तशी बेचव बातमी होते. तिला चव आणण्यासाठी कल्पनाशक्ती जेवढी ताणता येईल, तेवढी ताणून विषय जोडायचे असतात.
रवींद्र भुसारी रा. स्व. संघाचे प्रचारक आहेत. भाजपाचे संघटनमंत्री होण्यापूर्वी संघाच्या केंद्रीय कार्यालयाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्याच्यापूर्वी ते गुजरात, महाराष्ट्र, प्रातांचे संघाचे क्षेत्रप्रचारक होते. संघाच्या प्रचारकाविषयी असे म्हटले जाते की, तो पत्ता नसलेले पोस्टकार्ड असते! म्हणजे त्याने कुठे काम करायचे, कोणत्या क्षेत्रात काम करायचे, याचा निर्णय संघ करतो. निर्णय करण्यापूर्वी त्याच्याशी बोलले जाते आणि कामाची जबाबदारी दिली जाते. ज्या क्षेत्राची जबाबदारी दिली जाते, त्या क्षेत्रातील विषयांचा तो काही तज्ज्ञ नसतो. त्या क्षेत्रात गेल्यानंतर पहिली एक-दोन वर्षे त्याला त्या क्षेत्रातील काम शिकून घ्यावे लागते. रवींद्र भुसारी यांची भाजपाचे संघटनमंत्री म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा सत्तेच्या राजकारणातील आणि निवडणुकीच्या राजकारणातील त्यांना सखोल ज्ञान होते, असे नाही. प्रचारकाची मानसिकता ज्या क्षेत्रात काम दिले आहे, त्या क्षेत्रात आपल्या सर्व क्षमता आणि बुद्धी लावून काम करण्याची असते. वेगाने तो सर्व गोष्टी आत्मसात करीत जातो. रवींद्र भुसारी क्षेत्रप्रचारक असताना त्यांचे बौद्धिक वर्ग मी ऐकले. बौद्धिक वर्गाची एक स्वतंत्र शैली आहे. संघटनमंत्री झाल्यानंतर त्यांची राजकीय भाषणेदेखील ऐकली. तेव्हा मला वाटले की, बौद्धिक वर्ग घेणारे, हेच भुसारी आहेत का? दुसर्‍या भाषेत राजकीय भाषणाची शैली त्यांनी आत्मसात केली होती. संघ प्रचारकाचे मुख्य काम संघटनेची बांधणी करण्याचे असते. संघाचे संघटन माणसांचे आहे, माणसे एकमेकांना जोडून ठेवावी लागतात, हे जोडण्याचे काम प्रामुख्याने प्रचारक करतात. त्यांचे मुख्य काम म्हणजे, सर्व कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संबंध निर्माण करण्याचे असते. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना सतत कार्यप्रवण ठेवणे, हे काम प्रचारक करतो. रवींद्र भुसारी यांनी भाजपाचे संघटनमंत्री म्हणून हेच काम २०११ पासून केले. अन्य क्षेत्रात जाणारा प्रचारक, मी संघाचा प्रचारक आहे हे कधी विसरत नाही. संघाचा प्रचारक या दोन शब्दांत असंख्य विधिनिषेध आणि यम-नियम येत असतात, त्याचे अत्यंत काटेकोरपणे तो पालन करीत राहतो.ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्या क्षेत्राच्या मोहात पडायचे नाही, कार्यकर्त्यांशी स्नेह जोडायचा; परंतु त्या स्नेहबंधनात अडकायचे नाही, त्या क्षेत्राची आवश्यकता असेल त्याप्रमाणे राहणीमान ठेवायचे; परंतु त्या राहणीमानाची स्वतःला सवय लावून घ्यायची नाही, त्याचे गुलाम बनायचे नाही. मा. दत्तोपंत ठेंगडी कचाचे उदाहरण देत असत. शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या ग्रहण करण्यासाठी त्याला पाठविण्यात येते. तो असुर राज्यात राहतो. शुक्राचार्यांची मुलगी देवयानी त्याच्या प्रेमात पडते. शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कच ग्रहण करतो आणि परत देवलोकी जायला निघतो, तेव्हा देवयानी त्याला विवाहाचे साकडे घालते. कच तिचा स्वीकार करीत नाही. सगळे मोह बाजूला सोडून तो आपले काम पूर्ण करून पुन्हा आपल्या स्वगृही जातो. दत्तोपंत ठेंगडीजींच्या शब्दांत सांगायचे तर, ‘बॅक टु पॅव्हेलियन’ कच जातो. दत्तोपंतांना हे सांगायचे आहे की, संघ कार्यकर्ता असा हवा. जे काम सांगितले ते सर्व शक्तिनिशी करायचे, तिथली गरज संपली की, पुन्हा आपल्या घरी परत यायचे. रवींद्र भुसारी यांनी स्वतःपुरता एक निर्णय केला होता की, वयाची ६० वर्षे झाल्यानंतर कोणतेही पद स्वीकारायचे नाही. प्रचारक म्हणून काम करीत राहायचे; परंतु त्यासाठी कोणतेही पद नको. कामं तर असंख्य आहेत, त्यापैकी कुठल्यातरी एका कामात तेही सेवेच्या कामात, ग्रामविकासाच्या कामात गुंतवून घ्यायचे, असे त्यांनी ठरविले. आपली इच्छा त्यांनी संघाच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांकडे अनेक वर्षांपूर्वीच बोलून ठेवली होती. साठीनंतर निवृत्ती घेण्याचा आपला मनोदयही त्यांनी व्यक्त केला होता. ते ज्या क्षेत्रात काम करीत होते, त्या क्षेत्रातून सहजासहजी कुणी निवृत्त होत नाही. राजसत्ता, राजलक्ष्मी याचा मोह सोडणे महाकठीण काम असते. त्यात रवींद्र भुसारी पक्षाचे संघटनमंत्री होते. पक्षातील संघटनमंत्री हा अतिशय शक्तिमान असतो. अनेकांना निवडणुकीची तिकिटे देण्याची शक्ती त्याच्याकडे असते, शासकीय पदे देण्याची शक्तीदेखील त्याच्याकडे असते. एकदा शक्तिस्थानावर गेल्यानंतर त्यावर आपण दीर्घकाळ असावे, असे वाटू लागते. असे वाटण्यात काही गैर नाही. कारण तो मनुष्यस्वभाव आहे; परंतु रवींद्र भुसारींसारखा संघप्रचारक या मोहात पडत नाही. मी या क्षेत्रात सत्ता भोगण्यासाठी आलो नसून संघटनेच्या कामासाठी आलो आहे, याची जाणीव संघप्रचारक सदैव ठेवतो. म्हणून ज्या निर्लेपपणे तो पदाचा स्वीकार करतो, त्याच निर्लेप मनाने त्या पदाचा त्यागही करतो.
गेल्या महिन्यात भाजपाचे अध्यक्ष अमितभाई शाह महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर आले असताना, मुंबईच्या संघ कार्यालयात त्यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील काही निवडक पदाधिकार्‍यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रम संपता संपता एक सुखद बातमी देण्यात आली. रवींद्र भुसारी यांचा आज वाढदिवस असून ते वयाची साठी पूर्ण करीत आहेत. या आनंदाप्रीत्यर्थ सर्वांना पेढे देण्यात आले. पेढा चांगल्या गुणवत्तेचा असल्यामुळे तो खाताना आनंद वाटला; परंतु तेव्हा हा पेढा रवींद्र भुसारी यांच्या निवृत्तीचा पेढा असेल, असे कुणाला वाटले नाही. ज्या सहजपणे त्यांनी निवृत्ती स्वीकारून एक मापदंड निर्माण केला, त्याचे मोल फार मोठे आहे. अन्य पक्षात पदाधिकार्‍याचा राजीनामा ही हकालपट्टीच असते. भाजपामध्येही कधी कधी असे होते; परंतु संघप्रचारकाला या श्रेणीत आणता येत नाही. तो महत्त्वाकांक्षेने भाजपामध्ये आलेला नसतो आणि जाताना तो कर्तव्यपूर्तीच्या भावनेने जातो. त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या पेढ्याची चव माझ्या तोंडात आजही आहे, ज्या निर्लेप, निर्मोही आणि अनास्तक वृत्तीने त्यांनी पदभार सोडला आहे, त्यामुळे पेढा अधिकच गोड झाला आहे…
– रमेश पतंगे