भ्रष्टाचाराचे बाळकडू…

0
132

अग्रलेख
तसेही भारताला यादव वंशियांनी पुराणकाळापासूनच काय काय दिले आहे. तसे म्हटले तर भारताचा इतिहासच यादवांचा आहे. कृष्णदेव यादवांनी या देशाला गीता दिली. ती केवळ या देशाला नव्हे तर सार्‍या जगालाच दिली. अगदी अलीकडची यादवांची देशाला दिलेली चांगली देणगी म्हणजे त्यांनी उत्तर प्रदेशात भाजपाचे चांगले सरकार दिले. योगी आदित्यनाथांसारखा चांगला मुख्यमंत्री दिला… हो, हा करिश्मा मोदींचा नाही. यादवांचा आहे. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर ते उत्कर्षाच्या अवस्थेत असताना यादवी माजविण्याची त्यांची परंपरा असल्याने त्यांनी आताही काका-पुतण्यांत ती यादवी माजविली आणि उत्तरेत किसनकन्हैयाच्या प्रदेशात त्यांनी भाजपाच्या हाती सत्ता दिली. त्यातही बिहारच्या यादवांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आताही भ्रष्टाचार या संकल्पनेला त्यांनी नवा आयाम दिला आहे. ‘सहकुटुंब भ्रष्टाचार’ हे त्यांचे महानाट्य तिकडे अनेक वर्षे जोरात सुरू आहे. त्यात केवळ लालूप्रसादांचेच कुटुंब अशी संकुचित व्याख्या त्यांनी केलेली नाही. म्हणजे लालूंचे साळेदेखील त्यात सामील होते. आता सासरी गेलेली कन्यादेखील त्यात आहे. त्यांची मुलेही आहेत, असा आरोप आहे. त्याची चौकशी सुरू आहे. तरीही हे कुटुंब तिथे सत्तेत आहे. अर्थात ही काही त्यांची मक्तेदारी नाही. भ्रष्टाचाराचे एकाहून एक उच्चांक स्थापित करणे आणि ते पचविणे यात कॉंग्रेसींचा हात आजवर कुणीही धरलेला नाही. कधी कधी असे वाटते की, या पक्षात प्रवेशाची किमान अट हीच असली पाहिजे की त्या व्यक्तीने एकतरी छोटासा का होईना भ्रष्टाचार केलेलाच असायला हवा. त्यामुळे यादव कुटुंबाच्या राष्ट्रीय जनता दलाचेच ते पेटंट आहे, असे अजिबात नाही, मात्र भ्रष्टाचार या विषयाला लालूपुत्र तेजस्वी यादवांनी नवा आयाम मात्र दिला आहे. आता त्यांच्यावर आरोप झाले असताना ते म्हणाले की, ‘‘साधे मिसरुडही फुटले नसताना मी भ्रष्टाचार कसा करणार?’’ त्यांचा सवाल रोकडा आहे आहे. त्यावर सुशीलकुमार मोदींनी खास बिहारी शैलीतच उत्तरही दिले की, लोक मिसरुड फुटले नसताना बलात्कार करतात मग भ्रष्टाचाराचे काय घेऊन बसलात. आता नावात सुशील आणि आडनावात मोदी असले म्हणजे सगळे होत नसते. नेता बिहारचा आहे, त्यामुळे त्याने तसलेच दणक्यात उत्तर दिले. भ्रष्टाचार करण्यासाठी मिशा असायलाच हव्यात, हा फार म्हणजे फारच तेजस्वी विचार झाला. तो सामान्यांना कळण्याचे तसे काही कारण नाही. असले विचार कळण्यासाठी आणि ते स्वीकारण्यासाठी ती व्यक्ती किमान बिहारी असायला हवी आणि हमखास यश मिळवायचे असेल तर यादव तर असायलाच हवी. त्यामुळे सांप्रतकाळी लालूपुत्राचे हे तेजस्वी विचार देशात एकदम कुणाच्या पचनी पडणार नाहीत. आता कुणी म्हणेल की, तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत अन् त्यांना मिशा आहेत. हे खरे असले तरीही ज्या प्रकरणात बिहारच्या या लाडक्या मुख्यमंत्र्यांना फसविण्याचा डाव ‘धर्मांध तांकतोंने’ रचलेला आहे, त्या वेळी लालूपुत्राला खरेच मिशाही फुटलेल्या नव्हत्या. म्हणजे तो नाबालिग होता. त्यामुळे तो भ्रष्टाचार करूच शकत नाही. त्याला फार फार तर त्यात फसविले जाऊ शकते. कारण भ्रष्टाचारासारखे ऍडल्ट काम त्याला कळत नसल्याने त्यानेच ते केले, असे आरोप त्याच्यावर लावून त्याला फसविले जाऊ शकते. बिहारमध्ये, ‘किसीको मुंछ होती ना तो उसे भ्रष्टाचारी कह सकतें है’, अशी म्हण असावी. नसेल तर ती आता तयार झाली, असे म्हणावे लागेल. लालटेनवाल्या यादवांनीच तिचे सूतोवाच केल्यानंतर देशात कुणाचा माईका लाल पैदा झाला की विरोध करायला? लालूपुत्राने फार सखोल विचार करून भ्रष्टाचाराचा अन् मिशीचा संबंध जोडलेला आहे. एकतर राजकीय परिवेशात त्यांच्या कुटुंबाची विनापाण्याने हजामत करणे सुरू झाले आहे. सर्वश्रेष्ठ लालूंना निवडणूक लढण्याची बंदी करण्यापर्यंत न्यायालयांची मजल गेलेली आहे. आज सारेच गाय गाय करत सुटले असताना ज्या काळात गाय ही केवळ मारण्यासाठीच असते, असाच समज होता त्या काळात त्यांनी तिच्या वाटचा बेचव चारा स्वत: खाल्ला नि तिला लुसलुशीत हिरवे गवत खाऊ घालून ते दूध जनतेला दिले. त्याबद्दल आता त्यांच्या सार्‍या कुटुंबाचीच हजामत करणे सुरू झालेले आहे. म्हणून लालूपुत्राला भ्रष्टाचार अन् दाढी-मिशांचा संबंध गवसला आहे. त्यात तुम्ही अगदी बारकाईने पाहिले तर लालूंना मिशाच नाहीत. त्यांना दाढीही नाही. त्यामुळे खुद्द माझ्या पित्यालाही भ्रष्टाचाराच्या दाढी अन् मिशा फुटलेल्या नाहीत, असे तेजस्वीला म्हणायचे आहे. तेजस्वीची ही ओजस्वी वाणी कुणालाच कळलेली नाही. किमान बिहारात तरी लहान मुले भ्रष्टाचार करत नाहीत. म्हणजे उर्वरित देशात लहान मुले शाळेत जायचे नसेल तर सुटीचा अर्ज लिहून त्यावर आपल्या पालकांची सही स्वत:च ठोकण्याचा भ्रष्टाचार तरी करतात. बिहारात मात्र तसे नाही. तिथल्या मुलांना शाळेत जायचे नसेल तर ते एकतर शाळाच पाडून टाकतात किंवा मग मास्तरलाच पळवून लावतात. देशात लहान मुलांना तिकीट लागत नाही. रेल्वेत, बसमध्ये कुठेच नाही. बिहारमध्ये तुम्ही गेलात तर तुमच्या आरक्षित जागेवर लोक बसलेले असतात आणि ते उठतही नाहीत. आरक्षण वगैरे त्यांना कळत नाही. त्यांना दाढी-मिशा आल्या असल्या तरीही त्यांना तिकीट लागतच नाही. ते त्यांना कुणी विचारतही नाही. कारण तिकडे भ्रष्टाचारच नाही. बाकी देशात कसे होते की, काही माणसे तिकीट न काढता रेल्वेत चढतात आणि मग टीसी आला की त्याला चिरीमिरी देऊन उलट आपली सीट आरक्षित करतात. हा भ्रष्टाचार झाला. मिशा फुटलेल्या लोकांना भ्रष्टाचार करण्याची संधीच बिहारात दिली जात नाही. ज्यांना मिशी फुटली आहे त्यांचे चारित्र्य शुद्ध रहावे यासाठी त्यांना मोकळीकच दिली जाते. ते मग स्वच्छंद विहार करतात (या ‘विहार’चाच अपभ्रंश ‘बिहार’ झाला असावा.) त्यांना कुणी तिकीट विचारतच नाहीत. त्यामुळे टीसीला चिरीमिरी द्यावीच लागत नाही. एखाद्या टीसीने कायदा दाखवून त्यांना तिकीट विचारली अन् भ्रष्टाचार करण्यासाठी उद्युक्त केलेच तर ते अशा पातकी टीसीला, सरकारी अधिकार्‍याला चक्क रेल्वेतून उचलून फेकतात. उर्वरित देशात चारचाकी, दुचाकी वाहनांच्या चोर्‍या होतात, बिहारमध्ये त्या होत नाहीत. तिथे एकोपा आहे. हे माझे ते त्याचे असे नाही. सगळेच सगळ्यांचे आहे. त्या वेळी ज्याला त्या वस्तूची अधिक गरज आहे, ती त्याची, असा साधा नियम आहे. त्यामुळे तुमची चारचाकी उभी असेल तर कुणीही ती आपली म्हणून घेऊन जातो. म्हणून मग तुम्ही तक्रार द्यायला पोलिसात गेलात तर तिकडे पोलिस याची तक्रारही घेत नाहीत. एकतर ती चोरीच नसते. दुसरे म्हणजे चोरीचा गुन्हा दाखल करून दोन्ही पार्ट्यांकडून पैसे उकळण्याचे धंदे तिथले पोलिस त्यांना मिशा असल्या तरीही करत नाहीत. हे सारेच नियम लालूंनी घालून दिले आहेत. त्यामुळे तिकडे भ्रष्टाचारच होत नाही. लहान मुले ज्यांना दाढी-मिशा फुटल्या नाहीत, ते तर करतच नाहीत अन् ज्यांना फुटल्यात त्यांच्या भ्रष्टाचाराला उद्युक्त करणार्‍या मिशा आधीच सफाचट करून टाकलेल्या असतात. आताचे मुख्यमंत्री नितीशकुमारांना भ्रष्टाचाराच्याच काय कसल्याच मिशा नसल्याचे पाहूनच लालूंनी त्यांच्याशी युती केलेली आहे. आता तेजस्वीला मिशा आहेत पण त्या भ्रष्टाचाराच्या अजिबात नाहीत… हे भ्रष्टाचाराचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालेले आहे!