बाटलीच करणार पाणी पिण्याची आठवण!

0
185

पॅरिस, १५ जुलै 
रोज भरपूर पाणी पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते, मात्र अनेक लोक कामाच्या रहाटगाड्यात पाणी पिणेही विसरतात! आता अशा लोकांसाठी संशोधकांनी ही एक ‘सोय’ निर्माण केली आहे. एका फ्रेंच कंपनीने पाणी प्यायची आठवण करून देणारी बाटली विकसित केली आहे. या कंपनीने बाटलीला नेहमीसारखेच दिसणारे ‘विटेल रिफ्रेश कॅप’ हे झाकण बनवले असून, त्यामध्ये ‘अलार्म’ बसविला आहे. तुम्हाला किती वेळाने पाणी प्यायचे आहे, त्यानुसार तुम्ही अलार्म सेट करू शकता.
बाटलीला झाकण बसविल्यानंतर तासाभराने झाकणावर असलेला छोटा झेंडा सरळ होतो आणि तुमचे लक्ष वेधतो. यामुळे तुम्हाला पाणी पिण्याची इच्छा होते का, याची कंपनीने चाचणी घेतली. यात लोकांनी दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याचे दिसून आले. या झाकणाच्या व्यावसायिक उत्पादनाबद्दल कंपनीने अद्याप काहीही स्पष्ट केले नाही. (वृत्तसंस्था)