अडीच कोटी महिलांना मिळाले मोफत गॅस कनेक्शन

0
113

उज्ज्वला योजनेचा अर्धा टप्पा पार
जांगीपूर, १५ जुलै
नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रात सत्तेत येताच उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील पाच कोटी गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन वितरित करण्यासाठी निर्धारित केलेल्या उद्दिष्टाचा अर्धा टप्पा आज शनिवारी पूर्ण करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज येथील एका महिलेला २ कोटी ५० लाखावे गॅस कनेक्शन देण्यात आले.
मोदी सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात देशातील पाच कोटी गरिब महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी उज्ज्वला योजनेचा शुभारंभ केला होता. तीन वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला होता. ग्रामीण भागात लाकडे आणि वाळलेला कचरा जाळून स्वयंपाक करण्यात येत असल्याने हवेतील प्रदूषणाची मात्रा मोठ्या वाढत असून, यामुळे भारतात दरवर्षी १.३ दशलक्ष लोकांचा मृत्यू होत असतो, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. त्यामुळे या इंधनाचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली होती.
सध्या बंगालच्या भेटीवर असलेले राष्ट्रपती मुखर्जी आज जांगीपूर येथील गौरी सरकार या महिलेच्या घरी गेले आणि त्यांना मोफत गॅस कनेक्शन दिले. यासोबतच, उज्ज्वला योजनेंतर्गत पुरविण्यात आलेल्या मोफत गॅस कनेक्शनची संख्या आता २ कोटी ५० लाख इतकी झाली आहे.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते या गावातील आणखी दहा महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. विशेष म्हणजे, प्रणव मुखर्जी यांचे हे जन्मगाव आहे. (वृत्तसंस्था)