अमर फोटो स्टुडिओ

0
56

प्रस्तावना
मराठी नाटकं ही सामाजिक व कौटुंबिक विषयांभोवती तद्वतच एका अलिखित परंतु ठराविक साच्यानुसार व पठडीनुसार सादर होताना दिसतात. या प्रवाहाला भेदून काही नाटकं रंगभूमीवर मधूनअधून येत असतात आणि अशाच प्रकारचा विषय घेऊन ‘मनस्विनी लता रवींद्र’ यांनी एकुणात माणसाच्या जगण्याला समजून घेण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमाने केला आहे. आज स्पर्धेच्या युगात तरुणाई अनामिक भीतीने ग्रासली आहे. आपलं आयुष्य, करिअर, स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड, टार्गेट्स या गदारोळात आपलं स्वत:चं आयुष्य विसरून गेल्यासारखी परिस्थिती कळत नकळत त्यांच्यावर ओढवली आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत ही तरुणाई इंटरनेटच्या माध्यमातून व्हर्च्युअल जगाशी नातं जोडून आहे. काल काय होतं, आज काय आहे आणि उद्या काय असणार आहे याचा त्यांना पुरेपूर अंदाज बांधता येऊ शकतो. लेखिकेने याच बेसवर ही काल्पनिका रचली आहे आणि व्हर्च्युअल जगाचा अनुभव देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. इथे संवादापेक्षाही प्रसंगांना मांडून दिग्दर्शकाच्या इंटरप्रिटेशनला एक आवाहन व भरपूर स्कोप दिला आहे. निपुण धर्माधिकारी हा एक हुशार दिग्दर्शक असल्याने त्याने या काल्पनिकेला वास्तवतेचा आधार देऊन अतिशय कल्पकतेने हा रंगमंचकीय आविष्कार सादर केला आहे.
कथानक
‘अपू’च्या खानदानातील पूर्वजांनी म्हणजेच खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा व वडील या सर्वांनी वयाच्या २७ व्या वर्षी घरातून ‘पलायन’ केले आहे आणि कधीही परतले नाहीत. आता तोही २७ वर्षांचा झाल्याने ‘आपणही खानदानी परंपरेनुसार गायब होणार’ या भीतीने अस्वस्थ झाला आहे. कारण त्याला जगण्यासाठी काही ‘टार्गेट्स, ऍश्युरन्स व भवितव्य’ दिसतच नाहीत. अपू (सुव्रत जोशी) आणि तनू (सखी गोखले) यांचं एकमेकांवर प्रेम असतं. परंतु, माणसं एकमेकांना पूर्णत: समजली की त्यांच्यात दुरावा निर्माण होतो या ‘स्व- तत्त्वप्रणाली – जनम जनम का साथ है निभानेको’ हा प्रेमप्रकार ‘तनू’ला मान्यच नसतो. अशी ही ‘इक्वल ऍण्ड अपोझिट’ मतमतांतरे असल्याने ‘लेट्स अपार्ट’ या ‘सिच्युएशन व निर्णयाप्रत’ दोघंही आली आहेत. नाटकाची सुरुवातच अपू गळफास घेऊन आत्महत्या करताना होते. गळ्यात फास आणि मोबाईलवर ‘सुसायडल कन्फेशन’ रेकॉर्ड करत असतानाच तनू दाखल होते आणि अपूचा प्लान फिसकटतो. खरंतर ‘अपू’ला रिसर्चसाठी प्रदेशातून स्कॉलरशिप मिळाली आहे व व्हिसाच्या फॉरमॅलिटीज पूर्ण करायच्या सोडून याने भलतंच काय मांडलंय हे बघून ‘तनू’ जाम वैतागते. आता भानावर ये, व्हिसासाठी फोटो काढायला चल, तू एकदा युरोपला गेलास की ‘दोन तीरावर दोघे आपण’ अशा परिस्थितीत आपलं प्रेम काही टिकणार नाही, तेव्हा आपण एकमेकांना शुभेच्छा देत, बायबाय करू असे लागोपाठ निर्णयात्मक आदेश ‘तनू’ने दिल्यावर ‘अपू’ची जगण्याची उरलीसुरली आशाही लोप पावते आणि पदरी पडते केवळ, निराशा! तनू जबरदस्तीने ‘अपू’च्या युरोपला जाण्याच्या तयारीत, व्हिसासाठी फोटो काढायचा म्हणून एक फोटो स्टुडिओमध्ये दाखल होतात.

एका विक्षिप्त म्हातार्‍याचा हा ‘अमर फोटो स्टुडिओ’ आहे. हा म्हातारा (अमेय वाघ) त्यांचे फोटो काढण्याऐवजी त्यांना तत्त्वज्ञानाचे तारेच तोडू लागतो. या म्हातार्‍याचा असा दावा असतो की, मी ‘काळ’ माझ्या कॅमेर्‍यात बंद करत असल्याने तुम्हाला कोणत्याही काळात पाठवू शकतो. याची काहीतरी सटकलीय म्हणून ही दोघं तेथून निघून जायला लागतात. परंतु, हा इरसाल म्हातारा त्यांना स्टुडिओमधल्या वेगवेगळ्या देखाव्यांसमोर उभं करून त्यांचे फोटो काढायला लागतो. ‘अपू आणि तनू’ यांचा फोटो काढण्यासाठी तो कॅमेर्‍याचं बटन दाबतो आणि काहीतरी गडबड होते. त्या विक्षिप्त म्हातार्‍याने म्हटल्यानुसार ‘अपू १९४२ आणि तनू १९७७’ सालात पोहोचतात. ‘अपू (१९४२) – एका चित्रपट स्टुडिओत आणि त्याला भेटते नटी- चंद्रिका (पूजा ठोंबरे) तर तनू (१९७६) – एका चरसी हिप्पींच्या अड्ड्यावर- तिथे भेटतो व्यसनाधीन अनंता (सिद्धेश पुरकर). दोघांचा काळ वेगळा, भेटणारी माणसे वेगवेगळी आणि समोर वेगवेगळी सिच्युएशन अशा चक्रात दोघंही फसतात. या दोघांच्या हातून काहीतरी अर्थपूर्ण घडण्यावर त्यांची या काळातली वापसी अवलंबून असते. तो काळ, त्या काळातली माणसं, त्यांची जीवनमूल्ये, जगण्याचं प्रयोजन, त्यागी व दुसर्‍यासाठी ‘झिजण्याची, झटण्याची व झगडण्याची’ प्रवृत्ती असं सगळं समजून घेतल्यानंतर त्यांना आपली आज ओढवून घेतलेली परिस्थिती याचा आढावा घेण्याची संधी मिळते व त्यातूनच जगण्याचा एक नवीन मार्ग सापडतो. कारण काळ जरी बदलला तरी मानवी जीवनमूल्ये कधीही बदलत नसतात हा साक्षात्कार त्यांना होतो. आता एकमेकांना समजून व समजावून घेताना आता झगडावं लागणार नाही, हा विश्‍वास घेऊनच ते वर्तमानात परततात. या मूळ संकल्पनेवर ही कलाकृती बेतलेली आहे. पुढे काय घडतं याचं वर्णन इथे शक्य नाही. कारण एखाद्या चलतचित्रपटासारखं व सतत काहीतरी वळणवळणाने घडत हे नाटक पुढे सरकतं, ते समक्ष बघणं व अनुभवणं जास्त योग्य.

दिग्दर्शकीय करामत
‘अपू आणि तनू’ या दोघांनाही वर्तमानाची जाणीव आहे. परंतु, दोघंही भूतकाळातील वेगवेगळ्या कालखंडात अडकलेले त्यामुळे ते जग, त्या वेळेची परिस्थिती, अनोळखी माणसं असं सगळंच अनपेक्षित आणि अपरिचित. फार जुना काळ नसल्याने थोडंफार या काळाबद्दल ऐकीव माहिती आहे परंतु त्या वेळेच्या परिस्थितीला सामोरे जाताना त्यांची अवस्था गोंधळल्याची, अद्भुत अनुभव, त्यातून निर्माण होणारे प्रश्‍न, मनाची गुंतागुंत, आपलं आजचं आयुष्य आणि त्या काळच्या लोकांचं जगणं याचं परस्परसंबंध, कुठेतरी साम्य, जुळवाजुळव वगैरे स्वानुभव त्यांना एक वेगळीच अनुभूती देऊन जातात. दोन वेगवेगळ्या काळातील बदलते संदर्भ, त्याने निर्माण होत जाणारी विसंगती स्पष्टपणे दर्शवताना वैविध्यपूर्ण प्रकार वापरत प्रेक्षकांना संहितेशी घट्ट बांधून ठेवलं आहे. आणि म्हणूनच प्रेक्षक हा अद्भुत प्रकार अतिशय तन्मयतेने बघतात, अनुभवतात व या आविष्काराचा मनमुराद आनंद घेतात. लेखिकेच्या मूळ विचारांच्या पलीकडे जाऊन ही रंगावली सादर होताना लेखिकेला ‘आनंद, समाधान व कर्तव्यपूर्ती’ हा त्रिवेणी संगम अनुभवता येत असेल. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानेच या नाटकाला सर्वांकडून ‘गौरव, सन्मान व पारितोषक’ याचा वर्षाव झाला आहे. मालिकांमधून गाजलेली, तरुण परंतु स्वत:ची प्रतिमा असलेली कलाकार मंडळी हे नाटक सादर करताना आपल्या प्रतिमेला छेदून दिग्दर्शकबरहुकूम आपापल्या पात्रांना सुयोग्य न्याय देतात. अमेय वाघ याने विक्षिप्त म्हातारा, फोटोग्राफर व स्टुडिओचा मालक मस्त केला आहे. सुव्रत जोशी व सखी गोखले यांनी अपू व तनू या पात्रांना न्याय देत दोन काळातील त्यांचा प्रवासानुभव एन्जॉय केला आहे. सिद्धेश पुरकर याने १९७६ सालचा चरसी हिप्पी व केशवराव दाते या भूमिका छान पेलल्या आहेत. पूजा ठोंबरे ही कलाकार १९४२ च्या काळातली नटी म्हणून शोभली आहे. तिनेही चंद्रिका व सुजाता या वेगवेगळ्या शेड्सच्या भूमिका उठावदार केल्या आहेत.
सारांश
लहानपणी मोठ्यांकडून ऐकल्याचं चांगलं आठवतंय की आकाशातल्या कुठल्याशा एका ग्रहावरून प्रकाशलहरी पृथ्वीवर पोहोचण्यास तब्बल चारशे वर्षे लागतात. याचाच अर्थ असा की, त्या ग्रहावरील प्राणिमात्रांच्या दृष्टिकोनातून आपली पृथ्वी तितकेच वर्ष मागे आहे. मस्त प्रकार आहे हा! असंच काहीसं या नाटकाच्या माध्यमाने आपल्याला अनुभवायला मिळतं. एका फॅन्टसीच्या रूपाने नाट्यकलेच्या साचेबद्ध प्रवाहाला छेद देण्याचा हा प्रयत्न होय. खरंतर इंग्लिश चित्रपटात शोभणारी ही कलाकृती थेट मराठीत आल्याने आता मराठी रंगभूमीवर एक नवीन ‘व्हेरायन्ट’ दाखल झाल्याची बाब कौतुकास पात्र ठरते. भारतीय प्रेक्षकांना व विशेषतत्वाने मराठी प्रेक्षकांना, तरुणांना ‘हॉलीवूडपटांनी’ अशा विषयांची चांगलीच सवय लावली असल्याने तरुणांनी सादर केलेल्या या नाट्यकृतीला तरुणांची गर्दी होताना दिसते. किमान यानिमित्ताने तरी का होईना मराठी तरुणाई नाट्यगृहाकडे आकर्षित होत असेल तर त्यांचे स्वागतच आहे. अभिजात संगीताची ‘आउई’ अशी कुचेष्टा करणारी तरुण मंडळी ‘बालगंधर्व व कट्यार’नंतर ‘म्हातार्‍यांची गाणी’ यू ट्यूब व वारंवार ऐकताना व गुणगुणतांना दिसते तद्वतच अशा नवनवीन संकल्पना जर तरुणाईला नाट्यगृहाकडे खेचत असेल तर ही केवळ एक प्रशंसनीय बाब नसून ‘रंगभूमीच्या भविष्याची चिंता’ हा राग आळवणार्‍या जमातीस चोख आणि आश्‍वासक उत्तर होय.
– एनसी देशपांडे /९४०३४९९६५४