नाग पूजन

0
77

विष्णूचं आणि नागांचं एक अनोखं नातं आहे हे नक्की. नाहीतर वासुकी नागाची दोरी आणि मेरू पर्वताची रवी करून समुद्रमंथन करणार्‍या देव आणि दानवांच्या मदतीसाठी विष्णूनं कूमकर्मावतार घेतलाच नसता. तसंच कृष्णावतारात कालियामर्दनही केलं नसतं.
उन्हाळ्याची सुट्‌टी संपून शाळा उघडली की नव्या कोर्‍या पुस्तकांना नाकलावून वास घेत आषाढसरत असायचा आणि बाई निबंधाचा विषय द्यायच्या नागपंचमी. पंधरा दिवस आधी पासूनच गारुड्यांच्या पुंग्या ऐकू येऊ लागायच्या आणि इतर वेळी रात्री ज्याचं नावही घेण्याची परवानगी नसायची अशा लांबे महाराजांच्यापूजेची गाणी पाठ केली जायची. त्यातलं ‘चल गं सखे वारुळाला, नागोबाला पुंजायला…’ हे तर घरोघरी म्हटलं जायचं. मोठमोठ्या फांद्यांवर झोके बांधले जायचे.कर्त्या बायका दुपारच्या वेळी परसदारी असलेल्या मोठ्या चुलीवर ज्वारीच्या लाह्या आणिवाटणे फोडण्याचं काम काढून बसायच्या. गारुड्याच्या परडीत फणा काढलेला नाग बघून या सरपटणार्‍या प्राण्यांविषयी असलेलं भीतियुक्त गूढ आकर्षण सर्वांगावर काटा फुलवून जायचं.
प्राचीन भारतीय परंपरेत नाग आणि साप ही दोनही प्रकार विविध संदर्भात जागोजागी आढळतात.ज्या अर्थी विभूतियोगात श्रीकृष्ण म्हणतात, ‘सर्पाणामस्मि वासुकिः’ ‘अनन्तश्‍चास्मि नागानां’ १०. २८-२९ त्या अर्थी सर्प आणि नाग या दोन वेगवेगळ्या प्रजाती म्हणून ओळखल्या जात हे नक्की.
वेदात ‘अहिर्बुध्न्य’ नावाच्या पातालनागाचा उल्लेख येतो. ‘अहि:’ म्हणजेनाग आणि बुध्न्य म्हणजे आधार किंवा पायवा. ज्याच्या आधारे ही पृथ्वी उभी आहे असा नाग. त्यानंतर वैष्णव मताचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणून इतिहासकार ‘अहिर्बुध्न्य’ संहितेकडे बघतात. पुराणांत हाच नाग आपल्याला भेटतो तो पृथ्वीला धारण करणार्‍या विष्णूची शैय्या होऊन वेटोळं घालून बसलेला अनंतशेष या नावानं. विष्णूच्या प्रत्येक अवतारात त्याच्या बरोबरीनं अवतार घेणार्‍यात हा अनंतशेष अव्वल आहे. कधी तो आदर्श लहान भाऊ लक्ष्मण होऊन रामाबरोबर वनवास भोगतो तर कधी मोठा भाऊ बलराम होऊन कृष्णाच्या मुत्सद्देगिरी, राजकारण आणि समाजकारणाला राज्यशक्तीची जोड देतो.
विष्णूचं आणि नागांचं एक अनोखं नातं आहे हे नक्की. नाहीतर वासुकी नागाचीदोरी आणि मेरू पर्वताची रवी करून समुद्रमंथन करणार्‍या देव आणि दानवांच्या मदतीसाठी विष्णूनं कूमकर्मावतार घेतलाच नसता. तसंच कृष्णावतारात कालिया मर्दनही केलं नसतं.
आणखी एका प्रसंगी कृष्णाचा संबंध तक्षक सर्पाशी येतो. वैदिकांनी यज्ञाचा अतिरेक केल्यामुळे अग्नीला अपचन होतं. त्यावर इलाज करण्यासाठी अग्नी कृष्णाकडे मदत मागतो. कृष्ण विविध वनौषधीयुक्त खांडववन अर्जुनाला हाताशी घेऊन जाळू लागतो. त्यात वसतीला असलेलं तक्षक सर्पाचं सारं कुटुंब अनावधानानं भस्मसात होतं. सूड घेण्यासाठी तक्षक कर्णार्जुन युद्धाच्या वेळी कर्णाच्या भात्यातल्या एका बाणावर चढून बसतो. कर्णानं तो बाण धनुष्यावर चढवताच श्रीकृष्ण तक्षकाच्या मनातलं ओळखून ऐनवेळी घोड्यांना बसण्याची खूण करतो. अचानक बसणार्‍या घोड्यांमुळे अर्जुनाचा तोल जातो आणि कर्णाचा नेम चुकतो. तक्षक भारित तो बाण अर्जुनाच्या मुकुटाचा वेध घेतो.
हाच तक्षक पुढे अर्जुनाचा नातू असलेल्या परीक्षित राजाला मिळालेल्या शापानुसार चावतो. त्यात परीक्षित राजाचा मृत्यू होतो. पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी जनमेजय ‘सर्पमेध’ यज्ञ करतो. एक एक सर्प आहुतीच्या वेळी येऊन यज्ञकुंडात पडतो. सर्व सर्पांची आहुती दिल्यानंतर तक्षकाची पाळी येते, तेव्हा तो त्याचा जीवश्‍च कंठश्‍च मित्र, इंद्राच्या पाठीमागे जाऊन लपतो. शेवटी ‘जनमेजय इंद्राय स्वाहा! तक्षकाय स्वाहा!’ अशी आहुती देतो, आणि यज्ञकुंडाच्या दिशेनं ओढल्या जाणार्‍या तक्षकासह इंद्र देखील फरफटत येतो. आस्तिक ऋषींनी केलेल्या मध्यस्तीनंतर हा सर्पमेध यज्ञ थांबवण्यात येतो.
विष्णूचं वाहन असलेल्या गरुडाचा मात्र नाग जमातीशी उभा दावा आहे. खरं तर गरुड आणि नाग एकमेकांचे सावत्र भाऊ. गरुडाची आई विनिता आणि नागांची आई कद्रू या दोघीही कश्यप ऋषींच्या पत्नी. पण त्या दोघींचं एकमेकींशी पटत नव्हतं म्हणून या सावत्र भावंडंही एकमेकांचा दुस्वास करतात. गरुड महापराक्रमी असल्यामुळे त्याच्यासमोर नागांचा निभाव लागत नाही आणि ते त्याचं भक्ष्य होतात अशी एक पौराणिक कथा आहे.
शंकराच्या गळ्यात नाग असतातच, तसंच त्याचं यज्ञोपवीत देखील नागाचंच असतं. शिवशंकराचं आनंदतांडव नृत्य बघता यावं म्हणून नाग लोकातून पतंजली मुनी पृथ्वीवर अवतरले आणि त्या अनुभवातूनच त्यांनी योगशास्त्राची रचना केली, अशीही दक्षिण भारतात मान्यता आहे.
गणपतीच्या तुंदिल पोटाला आवळून धरण्याची एक मोठी जबाबदारीही या नागांवरच आहे. रामदासस्वामींनी लिहिलेल्या ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ या आरतीमध्ये गणपतीचं एक विशेषण ‘फणिवरबंधना’ आहे. भाविक अगदी हमखास फणीवर वंदना किंवा फळीवर वंदना म्हणतात.
अनंत, वासुकी कालीया मणिभद्रशंख शंखपाल कर्कोटक धनंजय धृतराष्ट्र ही नऊ नावं असलेलं नवनाग स्तोत्र भाविकांत प्रसिद्ध आहेकाही ठिकाणी हीच यादी शेष अनंत, वासुकी, तक्षक, कालिया, पद्मनाभ,कम्बल, महिपाल आणि धृतराष्ट्र अशीही आहे. तसंच यात पाठभेदही आहेत.
परंतुप्राचीन भारतीयांनी नाग हे प्रतीक दोन तर्‍हेनं वापरल्याचं दिसून येतं. त्याच्या एकाच दिशेनं होणार्‍या सळसळत्या हालचालीला नागमोडी चाल म्हटलं जातं. नागाला काळाचं म्हणजेच समयाचं प्रतीक म्हणून योजण्यात आलं हे आपण मागे पाहिलंच.
तसंच आध्यात्मिक क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्ती सांगतात की मातेच्या गर्भाशयात गर्भाचा विकास पूर्ण केल्यानंतर परा नावाची शक्ती थकूनभागून गर्भाच्या मूलाधार चक्रात शिरते आणि नागासारखे साडेतीन वेढे घेऊन विसावते. तिलाच योगशास्त्रात कुंडलिनी शक्ती असं म्हणतात. गुरुकृपेमुळे ती डिवचल्या जाते आणि शिष्याच्या अखंड साधनेमुळे मेरूदंडातून एक एक चक्र भेदत सहस्त्रारचक्र अर्थात तालूकडे प्रवास करते. आध्यात्मिक उन्नतीची एक एक पायरी ओलांडली जाते आणि शेवटची पायरी म्हणजे चित्त-वृत्ती निरोध करून साधलेली संपूर्ण समाधी. अशा योगीजनांना नागाच्या फण्याच्या छायेत नागाच्या वेटोळ्यावर पद्मासनात ध्यानस्थ बसलेलं दाखवलं असतं बुद्धावतारात गौतम बुद्धाची समाधी-अवस्था अशीच दाखवण्यात येते.
पतंजली मुनींनी योगसूत्रात याचा विस्तारानं उहापोह केला आहे आणि म्हणूनच त्यांची मूर्ती कमरेवरचं शरीर पुरुषाचं आणि उरलेलं शरीर नागाच्या रूपात घडवलेली असते.
आंध्रप्रदेशांतील मदनपल्ली गावी आश्रम असलेल्या श्री एम. (मुश्ताक़अलि उपाख्य मधुकरनाथ) यांनी लिहिलेल्या हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन नावाच्या पुस्तकात त्यांनी त्यांच्या गुरूंशी सल्लामसलत करण्याकरता नागलोकातून पृथ्वीवर आलेल्या नागवंशीय राजकुमाराला भेटल्याचा जो अनुभव सांगितला आहे, तो मुळातून वाचण्यासारखा आहे.
तर अशा या पराक्रमी नागांना आणि सर्पांना आठवण्याचा, पूजण्याचा हा दिवस, नागपंचमी!
– डॉ. रमा गोळवलकर ९४२२११४६२०