इंटेलेक्चुअल पत्रकारिता

0
124

विश्‍वसंचार

जावेद नक्वी असेच एक विचारवंत पत्रकार आहेत. हे महाशय भारतात राहतात आणि पाकिस्तानातल्या ‘डॉन’ या प्रसिद्ध दैनिकात लेख लिहितात. सेक्युलरपणाचा आव आणायचा आणि सतत मुसलमानांची तळी उचलून धरायची, त्यासाठी इतिहास आणि वर्तमान यांची वाट्टेल तशी मोडतोड करायची, हा विचारवंतांचा अगदी हातखंडा प्रयोग.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच म्हणजे ४ जुलै ते ६ जुलै, २०१७ या काळात इस्रायलला भेट दिली. भारत १९४७ साली स्वतंत्र झाला. इस्रायल १९४८ साली अस्तित्वात आला. पण एवढ्या सगळ्या वर्षांत भारताच्या पंतप्रधानाने पहिल्यांदाच इस्रायलला भेट दिली. पंतप्रधानांच्या या दौर्‍याच्या बातम्या अर्थातच सर्वत्र तपशीलवार प्रकाशित झाल्या, दाखविल्या गेल्या. सर्वसामान्य भारतीय जनतेला इस्रायल देशाचं नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि बेंजामिन (किंवा बिन्यामिन) नेतान्याहू यांच्या वार्तालापाच्या बातम्या लोकांनी उत्सुकतेने वाचल्या, पाहिल्या. पण नेमक्या याच कारणामुळे निधर्मी विचारवंतांच्या पोटात कोळ उठलेला आहे. आपण काहीतरी महान इंटेलेक्चुअल तथ्ये सांगत आहोत, अशा थाटात हे विचारवंत पंतप्रधानांच्या इस्रायल भेटीची रेवडी उडवू पाहत आहेत.
जावेद नक्वी असेच एक विचारवंत पत्रकार आहेत. हे महाशय भारतात राहतात आणि पाकिस्तानातल्या ‘डॉन’ या प्रसिद्ध दैनिकात लेख लिहितात. सेक्युलरपणाचा आव आणायचा आणि सतत मुसलमानांची तळी उचलून धरायची, त्यासाठी इतिहास आणि वर्तमान यांची वाट्टेल तशी मोडतोड करायची, हा विचारवंतांचा अगदी हातखंडा प्रयोग. नुकत्याच प्रकाशित झालेल्या आपल्या डॉनमधील लेखात नक्वींनी भारतातल्या ज्यू लोकांना वेठीस धरले आहे. इस्रायलमधल्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, परागंदा ज्यू लोकांना फक्त भारतातच आश्रय, शांतता आणि प्रेममिळालं, अन्यत्र जगात कुठेही नाही.
जावेद नक्वी म्हणतात की, हे पूर्ण सत्य नाही. १२ व्या शतकात अरबांनी स्पेन जिंकून तिथे आपली राजवट स्थापन केली. ती पुढची ३०० वर्षे चालली. या अरबांना मूर असं म्हणतात. या मूर सुलतानांच्या राजवटीत स्पेनमधले ज्यू चांगले भरभराटले होते. समाजात त्यांना मुसलमानांइतकीच प्रतिष्ठा होती. उलट सन १४९२ मध्ये ख्रिश्चनांनी अरब मूरांचा पराभव करून स्पेनला पुन्हा ख्रिश्चन बनविलं. तेव्हा त्यांनी ज्यू लोकांना स्पेनमधून हाकलून दिलं.
पंतप्रधान म्हणाले की, ‘‘ज्यू लोक हे अन्य भारतीयांइतकेच देशभक्त आहेत. लेफ्टनंट जनरल जे. एफ. आर. जेकब हे या बाबतीत मोठं उदाहरण आहे. जनरल जेकब यांच्या अचूक सैनिकी डावपेचांमुळेच १९७१ च्या बांगलादेश युद्धात भारतीय सैन्याने अल्पावधीत ढाका काबीज केलं.’’
जावेद नक्वी म्हणतात, ‘हॅ! यात काय विशेष? इराण हा इस्लामी देश आहे. पण तिथे आज किमान १५ हजार ज्यू गुण्यागोविंदाने राहतात. एवढंच नव्हे, तर त्यांचा एक प्रतिनिधी इराणी संसदेवर निवडून येतो. शिवाय इराणी सैन्यातही अनेक ज्यू आहेत नि इराण-इराक युद्धात त्यापैकी काहीजण ठारही झालेत.’
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, याचा आवर्जून उल्लेख करणं नि त्यानिमित्ताने प. पू. श्रीगुरुजी यांच्या लेखनामधील कोणता तरी भाग, संदर्भ सोडून किंवा मुद्दामसंदर्भ तोडून वापरणं, असं करताना या निधर्मी विचारवंतांना हर्षाच्या अगदी उकळ्या फुटतात.
ज्यू लोकांचा वंशविच्छेद करू पाहणार्‍या हिटलरची प. पू. श्रीगुरुजींनी आपल्या लेखनात स्तुती केली होती नि हिटलरच्या ‘माईन काम्फ’ या आत्मचरित्राची भारतातल्या सगळ्या पुस्तकांच्या दुकानात तडाखेबंद विक्री चालू असते, असं नक्वी म्हणतात.
मुहम्मद सैद उर्फ सुरमद कशानी उर्फ शाह सरमद हा मूळचा आर्मेनियन ज्यू. पण त्याचे पूर्वज अनेक पिढ्यांपासून इराणमध्ये स्थायिक झाले. शाह सरमद व्यापार करण्यासाठी भारतात लाहोरला आला. पण तो व्यापार करण्याऐवजी फकीर बनला. फिरत फिरत तो दिल्लीला आला. त्यावेळी मुघल पातशाह शहाजहानची राजवट सुरू होती. शहाजहानचा मुलगा युवराज दारा शुकोह हा शाह सरमदच्या भेटीने इतका प्रभावित झाला की, त्याने सरमदकडून गुरुपदेश घेतला. सन १६६१ मध्ये औरंगजेबाने बंड पुकारून मुघल तख्त बळकावलं. दारा, शुजा आणि मुराद या तीन सख्ख्या भावांसकट त्याने एकूण ३२ नातेवाईकांना सरळ ठार मारलं. बापाला ठार न मारता आग्र्याच्या किल्ल्यात कैदेत ठेवलं. दाराचा गुरू म्हणून त्याने शाह सरमदलाही ठार केलं. दिल्लीच्या जामा मशिदीच्या लगतच शाह सरमदची कबर आहे.
आता काळ सुधारलाय्, हे एकविसावं शतक आधुनिकतेचं विज्ञानयुग आहे, वगैरे कुणीही कितीही शब्दांचे पिसारे फुलवले तरी माणसारला सुख हवंय् नि तेही कमी श्रमात, शक्यतो झटपट; हा मनुष्य स्वभाव सगळ्या जगात सारखाच आहे. त्यामुळे अमका देव नवसाला पावतो, अमका पीर अगदी खाटल्यावर धनाचा हंडा देतो नि अमकी फातिमा -मराया-मसीना मेणबत्त्या लावल्या की पावते, असं कळण्याची खोटी की, लोकांचे लोंढे तिकडे धावत सुटतात.
अगदी त्याच चालीवर शाह सरमद नवसाला पावतो, अशी हूल कुणा इसमाने उठवली. त्याबरोबर शाह सरमद हा धर्मांतरित आर्मेनियन ज्यू होता वगैरे सगळं विसरून मुसलमानांचे लोंढे त्याच्या मजारवर मन्नत मागण्यासाठी लोटू लागले. जावेद नक्वी म्हणतात, बघा औरंगजेबाच्या आजच्या वंशजांनी शाह सरमदच्या मजारेवर गर्दी करून आपल्या बादशहाच्या संकुचितपणाची चूक सुधारली आहे आणि नाही तर ते महात्मा गांधी पाहा. बिचार्‍या गोहरजानला त्यांनी कॉंग्रेसचं सभासदत्व नाकारलं, कारण ती कलकत्त्यातली सर्वात लोकप्रिय तवायफ होती. गोहरजानचा बाप इंग्रज होता, पण तिची आई ज्यू होती.
नक्वी पुढे म्हणतात, ‘भारतातल्या मुघल आणि पुढे इंग्रजी राजवटीत ज्यू जमातीची खूप भरभराट होती. पर भारताचं स्वातंत्र्य आणि इस्रायलची निर्मिती यामुळे भारतातल्या ज्यूंची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.’
यानंतर तर नक्वींनी आपल्या मतप्रतिपादनाची अगदी कमालच केली आहे. (टपोरी भाषेत याला चोळेगिरीची कमाल म्हणतात) ते म्हणतात, जातीय संसद भवन या नावाची बांगलादेशच्या संसदेची सुंदर वास्तू राजधानी ढाक्यामध्ये कुणी उभी केली, तर लुई काह्‌न नावाच्या अमेरिकन वास्तू विशारदाने. हा लुई काह्‌न मुळचा ज्यू होता आणि त्याला कुणी पाचारण केलं होतं, तर तत्कालीन पाकिस्तानेच राज्यप्रमुख अयुबखान यांनी.
जावेद नक्वींच्या एकंदर प्रतिपादनाचं तात्पर्य काय, तर परांगदा ज्यू जमातीला फक्त भारतानेच प्रेमाने वागविलं, हे पंतप्रधान नरेंद्र मोदीचं म्हणणं हे त्याचं भगवं अर्थसत्य असून मुसलमानांनीही ज्यूंना प्रेमानं वागवलंय्. पॅलेस्टाईनी मुसलमान अरब आणि त्यांची ज्यूविरोधी रक्तलांच्छित घातपाती चळवळ अख्खं जग, गेली ७० वर्षे अचंबित होऊन पाहतंय् आणि तरीही हे नक्वी महाशय बेधडक मुसलमानांच्या ज्यू प्रेमाचा निर्वाळा देतात! इतकं धडधडीत खोटं, अत्यंत सफाईदार इंग्रजीत, फक्त निधर्मी डावे विचारवंतच लिहू शकतात, अन्य येरागबाळ्याचे ते कामनाही! आपण नक्वींच्या महान वैचारिक विश्लेषणाकडे थोडं तपशीलवार पाहू, १२ व्या शतकातल्या स्पेनच्या मूर सुलतानांच्या राजवटीत ज्यू जमातीची तीन शतकं भरभराट झाली आणि ख्रिश्‍चन सत्ता परत आल्याबरोबर त्यांची हकालपट्टी झाली. अगदी खरं आहे. पण त्याचं कारण मूर मुसलमानांची धर्मसहिष्णुता हे नसून राजकीय स्वार्थ हे आहे. मूरिश सुलतान हे स्पॅनिश ख्रिश्चनांच्या कत्तली उडवण्यात, चर्चेस पाडून मशिदी उभारण्यात नि स्पॅनिश गोर्‍या बायका पळविण्यात इतके गुंग होते की, शेती आणि व्यापार या राज्याच्या उत्पन्नाच्या बाबींकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नव्हता. ज्यू लोकांनी ती जबाबदारी घेऊन राज्याचा खजिना भरलेला ठेवला. म्हणून मूरिश सुलतान ज्यूंवर मेहेरबान होते.
भारतीय सैन्याचे सेनापती लेफ्टनंट जनरल जेकब फर्ज राफाएल (जे. एफ. आर) जेकब हे भारताचे पूर्व विभागाचे सेनापती होते. (कमांडर- इन-चीफ ऑफ इस्टर्न कमांड) बांगलादेश विजयात तर त्यांचा सिंहाचा वाटा आहेच, पण नंतरच्या काळात भारताने अमेरिकेची सुप्रसिद्ध पेट्रियट क्षेपणास्त्र घेण्याऐवजी इस्रायलची ऍरो ही क्षेपणास्त्रं घेतली, कारण ती आपल्या सैन्याच्या गरजांना योग्य होती, हा महत्त्वाचा निर्णय जेकबसाहेबांचा होता. त्यांची नि इराणी सैन्यातून इराकशी लढताना ठार झालेल्या डझनभर इराणी ज्यू सैनिकांची तुलना करणं हास्यास्पदच नव्हे, तर केविलवाण्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन आहे.
१९६१ साली पाकिस्तानचे तत्कालिन हुकूमशहा फील्ड मार्शल मुहम्मद अयुबखान यांनी तत्कालिन पूर्व पाकिस्तानची राजधानी ढाका या ठिकाणी एक उपसंसद भवन उभारण्याचं ठरवलंय्. मुख्य संसद भवन रावळपिंडीला होतंच. ही जबाबदारी त्यांनी मुझरुल इस्लामी या ख्यातनाम वास्तुविशारदाकडे सोपवली. मुझरुल इस्लामने तत्कालिन जागतिक कीर्तीचे दोन वास्तुशिल्पी फिनलंडचे आल्वार आल्तो आणि फ्रान्सचे ला कार्बुझिए (यांनीच चंदिगढ शहर उभारलं) यांच्याकडे विचारणा केली. पण त्यांना वेळ नसल्यामुळे ही कामगिरी लुई काह्‌द यांनी स्वीकारली. ते मूळचे रशियन ज्यू, पण स्थलांतरित अमेरिकन होते. मुझरुल इस्लामने त्यांना विचारणा केली, कारण ते ज्यू होते म्हणून नव्हे, तर ते मुझरुलचे येल विद्यापीठातले प्राध्यापक होते म्हणून.
असो, तर असे हे विचारवंत आणि अशी त्यांची इंटलेक्चुअल पत्रकारिता !
– मल्हार कृष्ण गोखले