बनावट नोटांसह महिलेस अटक

0
116

नागपूर, १५ जुलै
दोन हजाराची नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्‍या एका महिलेस पाचपावली पोलिसांनी अटक केली. पद्मा अरुण चवरे (४०) माता मंदिराजवळ, टेका असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
सोनारटोली, बिनाकी येथे राहणार्‍या भाऊराव पुंडलिक मेश्राम (५१) यांचे सिद्धार्थनगर, टेका येेथे सुशांत स्टील सेंटर नावाचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास मेश्राम आपल्या दुकानात हजर होते. त्यावेळी पद्मा ही भांडे खरेदी करण्यासाठी मेश्राम यांच्या दुकानात गेली. तिने तीनशे रुपयांची भांडी खरेदी केली आणि मेश्राम यांना २ हजाराची नोट दिली. मेश्राम यांनी नोट निरखून पाहिली असता ती बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  मेश्राम यांनी पद्माला पकडून ठेवले आणि शहर नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच पाचपावली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पद्माला ताब्यात घेऊन तिची अंगझडती घेतली असता तिच्याजवळ आणखी २ हजाराच्या ४ बनावट नोटा सापडल्या. या सर्व नोटांवर एकच क्रमांक आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४८९ (ब)(क) अन्वये गुन्हा नोंदवून पद्माला अटक केली.