गोरेवाडा स्थलांतरास ‘ली’ चा नकार

0
123

आज पुन्हा प्रयत्न करणार
नागपूर, १५ जुलै
सुमारे आठ वर्षांपूर्वी आईपासून विभक्त झालेल्या महाराजबागवाशीण ‘ली’ वाघिणीने गोरेवाडा येथे स्थलांतर करण्यास आपल्या तीव्र हालचालींनी नकार दिला. त्यामुळे जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आता पुन्हा उद्या १६ जुलैला तिला गोरेवाडा येथे हलविण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. महाराजबाग प्राणी संग्रहालय आणि गोरेवाडा वनपरिक्षेत्राचे अधिकारी यांनी संयुक्त रीत्या आज १५ जुलैला ‘ली’ला हलविण्याची मोहीम चालविली होती.
ली सोबतच चेरी आणि जान या तीनही वाघिणी अवघ्या तीन ते चार आठवड्यांच्या असताना आईपासून दुरावून चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील जुनोना या तलावाजवळ २३ जानेवारी २००९ मध्ये आढळल्या होत्या. त्यानंतर या तिघींनाही नागपुरातील महाराजबागेत आणले गेले होते. तेव्हापासून येथेच त्या मोठ्या झाल्या. यापैकी चेरीला आदान-प्रदान या अंतर्गत छत्तीसगडच्या बिलासपूर येथील काननपेंढरी पार्कमध्ये नेण्यात आले होते.
सध्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटर येथे साधारणतः २०११-२०१२ मध्ये पळसगाव येथून आणलेल्या ‘साहेबराव’ या वाघाचा मुक्काम आहे. त्याला जोडीदार म्हणून ली ला गोरेवाडा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय ट्रांझिट परमिट अंतर्गत घेण्यात आला. त्यानुसार शनिवार १५ जुलैला सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधून वाहनही आणण्यात आले. दुपारी ४ वाजता गोरेवाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के, वनपाल सुरेश कडू, अमोल जाधव, डॉ. व्ही. एम. धूत, महाराजबागेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बावस्कर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार, गोरेवाडाचे सहायक वनसंरक्षक एच. व्ही. मारभुशी, डॉ. बहार बावीस्कर, डॉ. अमित मोटघरे यांच्या उपस्थितीत ली ला हलविण्याची मोहीम सुरू झाली. मात्र तिने कोणताही प्रतिसाद न देता बाहेरील उघड्या पिंजर्‍यातच फिरत राहिली. अखेरीस सायंकाळचे ६ वाजता नियमाप्रमाणे आजची मोहीम बंद करून उद्या १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता पुन्हा मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.