हिजबुलच्या चार अतिरेक्यांना अटक

0
56

श्रीनगर, १६ जुलै
भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी हिजबुल मुजाहिदीनच्या चार अतिरेक्यांना अटक करून काश्मीर खोर्‍यात या दहशतवादी संघटनेसाठी तरुणांची भरती करणारे मोड्यूल उद्‌ध्वस्त केले.
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील मुस्लिम तरुणांना दहशतवादी कारवायांकडे आकर्षित करण्यासाठी हिजबुलचे काही सदस्य सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी काही संशयित तरुणांवर बारीक नजर ठेवली. संपूर्ण खात्री पटल्यानंतर तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या, अशी माहिती बारामुल्लाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक इम्तियाज हुसेन मिर यांनी दिली.
हिजबुलचा कमांडर परवेज वाणी उर्फ मुबासिर याच्या नेतृत्वात हे मोड्यूल चालविले जात होते. तो उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील गागलुराचा रहिवासी आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे अन्सारूल्ला, अब्दुल रशिद भट, मेहराजुद्दिन काक व अन्य एक अशी असून, ते बारामुल्ला जिल्ह्यातील आहेत, असे मिर यांनी सांगितले.
गुलाम काश्मिरात जास्तीतजास्त तरुणांना दहशतवादी प्रशिक्षणाकरिता पाठविण्याची या अतिरेक्यांची योजना होती. यातील एक अतिरेकी अब्दुल रशिद भट हा याच वर्षीच्या महिन्यात पाकिस्तानला गेला होता. तिथे हिजबुलच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर गुलाम काश्मिरातील हिजबुलच्या शिबिरात त्याने दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले, असेही ते म्हणाले.
व्हिसासाठी शिफारस
धक्कादायक म्हणजे, ज्या तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये भरती केली जाते, त्यांना पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसा मिळवून देण्याची जबाबदारी काश्मीर खोर्‍यातील फुटीरतावादी नेते पार पाडत असतात. अब्दुल रशिद भटला दहशतवादी प्रशिक्षणाकरिता पाकला पाठविण्यासाठी याच फुटीरतावादी नेत्यांनी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगाला शिफारस केली आणि उच्चायोगाने त्याला व्हिसा मंजूर केला होता, अशी माहिती या तिघांच्या चौकशीतून समोर आली आहे. काश्मीर खोर्‍यातील जास्तीतजास्त तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी पाकला पाठवा, त्यांच्या व्हिसाची व्यवस्था तत्काळ केली जाईल, असे धोरणच फुटीरतावादी नेते आणि पाक उच्चायोगाने स्वीकारले असल्याचे मिर यांनी सांगितले.
शस्त्र व एक लाख जप्त
अटक करण्यात आलेल्या या तिन्ही अतिरेक्यांजवळून शस्त्र, स्फोटके आणि एक लाख रुपयांचे भारतीय चलन ताब्यात घेण्यात आले. या मोड्यूलमधील सदस्य केवळ तरुणांची भरतीच करीत नव्हते, तर काश्मीर खोर्‍यात सक्रिय असलेल्या अतिरेक्यांना शस्त्र व पैसा उपलब्ध करून देत होते, असे मिर यांनी स्पष्ट केले.