संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

0
85

विविध मुद्यांवर विरोधक सरकारला घेरणार
नवी दिल्ली, १६ जुलै
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विविध मुद्यांवरून सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची व्यूहरचना आहे. सत्ताधारी पक्षातर्फे १६ नवीन विधेयके या अधिवेशनात सादर केली जाणार आहेत.
पाकिस्तान आणि चीन सीमेवरचा तणाव, गोरक्षकांचे हल्ले, अमरनाथ यात्रेकरुंवरील दहशतवादी हल्ला, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या या मुद्यावरुन सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. दार्जिलिंगमध्ये वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाचा मुद्दाही विरोधक उपस्थित करु शकतात.
संपुआ सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना दहशतवादी ठरवण्याचे जे षडयंत्र काही मंत्र्यांनी रचले होते, तो मुद्दा भाजपा आक्रमकपणे संसदेत उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन दोन्ही वादळी ठरण्याची शक्यता बळावली आहे. या अधिवेशनात जम्मू काश्मीर जीएसटी विधेयक आणि नागरिकता संशोधन विधेयकासह एकूण १६ नवीन विधेयक सरकारतर्फे सादर केली जाणार आहे.
शेतकरी आत्महत्या, महिलांची सुरक्षा, देशातील पूरपरिस्थिती तसेच अंतर्गत सुरक्षेच्या मुद्यावर या अधिवेशनात चर्चा व्हावी, अशी आमची भूमिका असल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे, तर संसद हे चर्चेचे व्यासपीठ आहे, त्यामुळे सरकार सर्व मुद्यावर नियमानुसार चर्चेसाठी तयार असल्याचे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकबी यांनी म्हटले आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांची भूमिका सकारात्मक राहील, असा विश्‍वासही नकवी यांनी व्यक्त केला. ११ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. उद्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून सभागृहाचे कामकाज स्थगित केले जाईल. (तभा वृत्तसेवा)