राष्ट्रपतिपदाची आज निवडणूक

0
95

नवी दिल्ली, १६ जुलै
देशाचा नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी उद्या सोमवारी भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी आघाडीच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात मतदान होत आहे. या निवडणुकीची सर्व तयारी झाली आहे.
विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा उत्तराधिकारी तसेच रायसीना हिलवरील राष्ट्रपती भवनाचा नवा वारस कोण हे ठरविण्यासाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी उद्या संसद भवनात तसेच देशातील विविध राज्यातील विधानसभात मतदान होणार आहे. २० जुलैला या निवडणुकीची मतमोजणी होऊन नव्या राष्ट्रपतीचे नाव देशाला समजणार आहे.
ही निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळापेक्षा कितीतरी पटीने जास्त मते रालोआजवळ असल्यामुळे उद्याची निवडणूक म्हणजे रामनाथ कोविंद यांच्यासाठी फक्त औपचारिकता राहिली आहे. रामनाथ कोविंद यांना रालोआतील घटकपक्षांशिवाय जदयू, अण्णाद्रमुक, तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर कॉंग्रेस, बिजू जनता दल यांच्यासह अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेनेही कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. रालोआत असतानाही आतापर्यंत झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या दोन निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.
राष्ट्रपतिपद हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडचे असल्याचे रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे, तर राष्ट्रपतिपदाची निवडणूक म्हणजे आपल्यासाठी विचारधारेची लढाई असल्याचे मीराकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभेच्या माजी अध्यक्ष असलेल्या मीराकुमार यांना १८ विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. आम आदमी पार्टीही मीराकुमार यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे खासदार तसेच विधानसभेचे आमदार मतदान करत असतात. सामान्यपणे खासदार दिल्लीतील संसद भवनात मतदान करत असतात, पण क्रॉस व्होटिंगच्या भीतीने पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांना कोलकाता येथे मतदान करण्याचे निर्देश दिले आहेत.
समाजवादी पार्टीतही राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून फूट पडली आहे. मुलायमसिंह यादव यांनी रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे, तर त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांचा गट मीराकुमार यांच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे तामीळनाडूमधील अण्णाद्रमुकचे दोन्ही गट रामनाथ कोविंद यांच्या बाजूने मतदान करणार आहे.
रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी आघाडीच्या मीराकुमार यांनी देशभर फिरून प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भूमिका रामनाथ कोविंद यांचा विक्रमी मतांनी विजय व्हावा, अशी आहे, त्यादृष्टीने भाजपाने व्यूहरचना केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे नेते नितीशकुमार यांनी रालोआचे रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यामुळे विरोधी पक्षांत फूट पडली आहे. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढण्यासाठी बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे.