पंचगव्य संशोधनासाठी राष्ट्रीय सुकाणू समिती

0
120

सुनील मानसिंगका, ए. जयकुमार यांचा समावेश
नवी दिल्ली, १६ जुलै
गायीचे संरक्षण आणि तिच्या पंचगव्यावर सखोल संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारने एका समितीचे गठन केले असून त्यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचे सुनील मानसिंगका आणि विज्ञान भारतीचे महासचिव ए. जयकुमार यांचा समावेश केला आहे.
राष्ट्रीय सुकाणू समिती असे नाव असलेल्या या १९ सदस्यीय समितीचे अध्यक्ष विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन राहणार असून, महापरम संगणक मालिकेचे जनक, दिल्लीस्थित विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर हे समितीचे कार्याध्यक्ष असतील. अन्य सदस्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, नवीन आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा या मंत्रालयाचे सचिव, आयआयटी दिल्लीचे काही शास्त्रज्ञ, सीएसआयआरचे माजी संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर, आयआयटीचे ग्रामविकास आणि तंत्रज्ञान केंद्राचे प्रो. व्ही. रामगोपाल राव आणि प्रो. व्ही. के. विजय आदींचा समावेश आहे.
प्रामुख्याने गायीचे मूत्र हे विविध रोगांवर कसे लाभदायी आहे, हे रामटेकच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने पुराव्यानिशी सादर केले आहे. या केंद्राचे जयसिंगका यांनी सांगितले की, ‘आमचे सीएसआयआरसोबत फार आधीपासून परस्परसहकार्य असून आम्ही गाईच्या संशोधनावर सहा पेटेंटही मिळविले आहेत. आमच्या सभ्यतेचा पायवा ही गाय असल्याचा आमचा दृढविश्‍वास आहे.’ डॉ. विजय भटकर यांनीही जयसिंगका यांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही संस्था पंचगव्यावर संशोधन करीत आहे, असे डॉ. भटकर यांनी म्हटले आहे.
स्वरोप : या संशोधन समितीला केंद्राने ‘स्वरोप’ (सायंटिफिक व्हॅलिडेशन ऍण्ड रिसर्च ऑन पंचगव्य) असे नाव दिले आहे. यात पंचगव्य हे औषधी आणि आरोग्याला कसे लाभदायक आहे, त्यापासून होणार्‍या उत्पादनांना कायदेशीर रीत्या कशी मान्यता प्राप्त होऊ शकते याचा शास्त्रीय अभ्यास आणि संशोधन, अन्न आणि सकस आहाराला पंचगव्य कसे उपयोगी आहे आदी बाबींचा या संशोधनात समावेश आहे.
अलीकडे गाईच्या नावावर जो हिंसाचार आणि उन्माद दिसून येत आहे, त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र विरोध केला असून अशा गोरक्षकांवर कडक कारवाई करण्याचे तसेच गाईची होणारी तस्करी रोखण्याचेही आदेश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. देशवासीयांना गाईचे महत्त्व कळावे, याबाबत लोकजागृती व्हावी हा उद्देश असल्याचे पत्रकात म्हटले आहे. (तभा वृत्तसेवा)