कथित गोरक्षकांची गय करू नका : मोदी

0
110

•सर्वपक्षीय बैठकीत विभिन्न विषयांवर चर्चा
•भ्रष्टाचाराच्या बाबतीत कठोर कारवाई हवी
नवी दिल्ली, १६ जुलै
गोरक्षेच्या नावावर कायदा हातात घेणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सरकारची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे, त्यानिमित्त आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते.
गोरक्षेच्या नावावर हिंसाचार करणार्‍यांविरुध्द कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांना या संदर्भात योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोरक्षेच्या नावावर हिंसाचार पसरवणार्‍यांवर तसेच गुन्हे करणार्‍यांवर राज्य सरकारांनी कठोर कारवाई केली पाहिजे, या मुद्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र यातून देशाचा कोणताही फायदा होणार नाही. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहनही मोदी यांनी केले.
गोमातांची रक्षा झाली पाहिजे, अशी देशवासीयांची भावना आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, यात गैर काही नाही. मात्र यासाठी कायदा आहे. गोरक्षेच्या नावावर कायदा हातात घेणे खपवून घेतले जाणार नाही, राज्य सरकारांनी याप्रकरणी कारवाई केली पाहिजे.
भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून जी लढाई सुरू आहे, ती यापुढेही चालूच राहील, असा निर्वाळा देत भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. मोदी यांनी नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांच्याकडे होता. भ्रष्ट नेत्यांना दूर ठेवण्याचे आवाहन राजकीय पक्षांना करत मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जी कायदेशीर कारवाई सुरू आहे, ती पुढे नेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याची गरज आहे.
ईशान्य भारतातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करत हिंसाचाराच्या घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचा निर्वाळा मोदी यांनी दिला.
राष्ट्रपतिपदाची निवडणूक सर्वसहमतीने झाली असती तर बरे झाले असते, याकडे लक्ष वेधत मात्र आज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रचाराचा जो स्तर आहे, त्यात आतापर्यत कुठेही कटुता न आल्याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केले. सर्व खासदार आणि आमदारांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत योग्य पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. जीएसटी लागू करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मोदी यांनी सर्व विरोधी पक्षांचे आभारही मानले. या बैठकीत मोदी यांनी केलेल्या भाषणाची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी नंतर पत्रकारांना दिली.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांच्यासह माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, सपाचे मुलायमसिंह यादव, बिजू जनता दलाचे भर्तुहरी मेहताब, अकाली दलाचे गुजराल, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, राजदचे जयप्रकाश यादव यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. तृणमूल कॉंग्रेसने मात्र या बैठकीवर बहिष्कार घातला होता.