सुभाषबाबू १९४७ मध्ये जिवंतच होते!

0
78

पॅरिसच्या इतिहासकाराचा दावा
चेन्नई, १६ जुलै 
आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ च्या विमान अपघातात झालाच नव्हता. ते १९४७ मध्येही जिवंतच होते, असा दावा पॅरिसमधील प्रख्यात इतिहासकार जे. बी. पी. मोर यांनी केला आहे.
सुभाषचंद्र बोस यांच्या बेपत्ता होण्यामागील रहस्य जाणून घेण्यासाठी भारत सरकारने शाह नवाझ समिती (१९५६), खोसला आयोग (१९७०) आणि मुखर्जी आयोग (१९९९) असे तीन आयोग नेमले आहेत. शाह नवाझ समिती व खोसला आयोगाने सुभाषचंद्र बोस यांचा १८ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या तैहोकू विमानतळावर मृत्यू झाल्याचा निर्वाळा दिला, तर मुखर्जी आयोगाने त्यांचा मृत्यू या अपघातात झाला नसल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे मोर यांचा दावा खळबळजनक असाच आहे.
सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता. ते १९४७ मध्येही जिवंत होते. या अपघातामधून वाचल्यानंतर त्यांनी त्यावेळच्या इंडोचायनामध्ये (आताचे व्हिएतनाम) आश्रय घेतला होता, अशा आशयाचा फ्रेन्च गुप्तचर खात्याचा अहवाल मोर यांच्या हाती लागला आहे. बोस यांचा या अपघातात मृत्यू झाल्याच्या वृत्तावर फ्रेन्च गुप्तचर खात्याने विश्‍वास ठेवला नव्हता, हेच या दस्तावेजांवरून स्पष्ट होत असल्याचे मोर यांचे मत आहे.
इंडोचायना १९४० च्या दशकात फ्रेन्च वसाहत असल्याने फ्रान्सच्या या भूमिकेविषयी कायमच उत्सुकता होती. सुभाषचंद्र बोस विमान अपघातात ठार झाल्याचे ब्रिटिश व जपान सरकारतर्फे सांगण्यात आले होते. मात्र फ्रेन्च सरकारने यावर नेहमीच मौन पाळले आहे. (वृत्तसंस्था)