अमरनाथ भाविकांची बस दरीत कोसळली, १६ मृत

0
71

२७ जण जखमी
रामबान/जम्मू, १६ जुलै
अमरनाथ भाविकांच्या बसवरील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आज रविवारी जम्मूच्या रामबान जिल्ह्यातील एका खोल दरीत अमरनाथ भाविकांची बस कोसळली. या अपघातात १६ भाविकांचा मृत्यू, तर अन्य २७ जण जखमी झाले आहेत.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून ही बस जात असताना ती अचानक अनियंत्रित झाली आणि रामबानच्या नचलाना भागातील दरीत कोसळली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती रामबानचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मोहनलाल यांनी दिली. सर्व जखमींना नजीकच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून, यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाल करीत मदत व बचावकार्य हाती घेतले. भारतीय लष्कराचे जवानही घटनास्थळी पोहोचले आणि जखमी व मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम उघडली. काही रुग्णवाहिकाही तातडीने तिथे दाखल झाल्या. सोमवारी अनंतनागमध्ये अमरनाथ भाविकांच्या बसवर अतिरेक्यांनी गोळीबार केला होता. यात सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. (वृत्तसंस्था)