॥ श्रीगुरुकृपादृष्टी॥

0
62

शतश्‍लोकी
तद्ब्रह्मैवाहमस्मीत्यनुभव उदितो यस्य कस्यापि चैेद्वैपुंसः
श्रीसद्गुरुणामतुलितकरुणापूर्ण पीयूषदृष्ट्या|
जीवन्मुक्तः स एव भ्रमविधुरमना निर्गतेऽनाद्युपाश्चौ|
नित्यानन्दैकधाम प्रविशति परमं नष्टसंदेहवृत्तिः|
श्रीगुरूंच्या अपार कृपेने भरलेल्या दृष्टिपाताने जर कोण्या पुरुषाच्या ठायी, मी ब्रह्मच आहे असा अनुभव उदित झाला, तर तो भ्रान्तिमुक्त मनाचा पुरुष, निःसंशय वृत्तीचा होऊन जीवन्मुक्ततेला प्राप्त होतो. (असा हा) जीवन्मुक्त (प्रारब्धाचे भोग संपल्यानंतर) अनादी (अशा अविद्येच्या) उपाधीने मुक्त होऊन उपाधीरहित, अविनाशी, आनंदरूप, एकमेवाद्वितीय परब्रह्माच्या ठायी प्रवेश करतो.
विवेक चूडामणि नामक आपल्या नितान्त रमणीय प्रकरण ग्रंथात पू. आचार्यश्रींनी देवानुग्रहकारक अर्थात ईश्‍वरीकृपेशी कारणीभूत रूपात तीन महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख केला आहे. नुसता उल्लेखच केला नाही, तर त्यांना ‘दुर्लभम्’ म्हटलेले आहे. त्या तीन बाबी आहेत- १) मनुष्यत्व, २) मुमुक्षूत्व, ३) महापुरुषसंश्रय.
प्रथम श्‍लोकापासून, अधिकारी कोण? हे सांगताना आचार्यश्रींनी मनुष्यत्वाचा विचार मांडला. या मार्गात उन्नती करून घेण्याची इच्छा असलेला, जन्माला येऊन केवळ आहार, निद्रा, भय, मैथुनात न संपलेला ‘मनुष्यच’ येथे अधिकारी आहे. हे सांगण्याच्या निमित्ताने अशी आस आहे तोच ‘माणूस’ हे सांगत दोन्हींचे विवेचन केले. केवळ शरीराने माणूस असून काय फायदा. अर्थात ते असायला पाहिजेच. कारण त्याशिवाय तर गुरुवचन शास्त्रवचन समजून घेण्याची सामान्य पात्रताही येणार नाही. बैलाला कितीही तत्त्वमसि सांगितले तरी उपयोग काय? आणि किमान श्रीगुरूंनी तत्त्वमसि म्हटल्यावर असे माझे स्वरूप आहे का? इतकाही तरंग अंतरी उठणार नसेल, तर त्याच्यात आणि बैलात फरक तो काय? अशी ही मजेदार रचना आहे.
त्यामुळे मूलतः श्रवणाधिकारी स्वरूपात माणूस असणे दुर्मिळ. कारण ८४ लक्ष जीवयोनींपैकी केवळ याच योनीत ती संभावना आहे. या अर्थाने ते दुर्मिळ.
असा मनुष्य असला तरी त्याला मोक्षाची इच्छा असणे, हे आणखी दुर्मिळ. त्यामुळे दुसरी बाब वर्णिली मुमुक्षत्व. अनेकांना ही इच्छाच नसते. अशी काही संभावना असते, हेच ज्ञात नसते. या अर्थाने ती इच्छाही दुर्मिळ.
या दोन्ही गोष्टी जुळल्यावरही तिसरी गोष्ट लागते महापुरुष संश्रय. येथे पूज्यपाद आचार्यश्री या तिसर्‍या बाबीचा विचार मांडत आहेत. त्या श्रीगुरूंच्या कृपेचे माहात्म्य वर्णन करून आचार्यश्री त्या कृपेचे स्वरूप वर्णन करताना ‘दृष्टी’ हा फार महत्त्वाचा विचार मांडत आहेत. ‘श्रीगुरूंची कृपादृष्टी प्राप्त होते त्या वेळी श्रीगुरुकृपेने दृष्टी प्राप्त होते.’
काय असतो या दृष्टीचा परिणाम? पू. आचार्यश्रींनी भ्रमविधुरमन आणि उपाधीरहितत्व अशा दोन शब्दांत व्यक्त केला आहे. श्रीगुरुकृपेने भ्रमाचा पूर्णत: निरास होतो तथा उपाधींचा विलय होतो. भ्रमनिरासातून बाह्य कारण तथा उपाधी निरासातून अंतर्गत कारणरूपात दु:खाच्या समग्र कारणांचा समूळ विनाश, हीच खरी गुरुकृपा!
अर्थात, हाही झाला केवळ एक टप्पा. दु:ख निमाले इथवर ठीक. पण, त्यापायी जर नुसतीच पोकळी तयार झाली, तर ती निरर्थकच आहे. केवळ निरास ही काही प्राप्ती नाही, तर श्रीगुरुकृपा प्राप्ती करून देते. कशाची? तर पू. आचार्यश्री म्हणतात- नित्यनंदैकधामं प्रविशति!
श्रीगुरूंच्या कृपादृष्टीला पुण्यपीयूषपूर्णा का म्हटले, त्याचे स्पष्टीकरण येथे प्राप्त होते. ती दृष्टी अमृतमयी आहे. त्यांची कृपा अमृतरूपी आहे. कारण ते स्वत: अमृतस्वरूप आहेत. आत ते अमृतत्वच ओतप्रोत भरले असल्याने दृष्टीतून ते अमरत्वच पाझरते. केवळ पाझरते असेच नाही, तर ज्याच्यावर ती दृष्टी पडते त्याच्यात तीच वृत्ती पारेषित करते. समोरच्यालाही अमरत्वाचे वरदान मिळते.
त्या अमरत्वाची, अमृतत्वाची प्राप्ती तत्कालिक नाही. तात्पुरती नाही. शाश्‍वत स्वरूपाची आहे. तेथे कायमस्वरूपी निवास आहे. हे सांगण्याकरिताच नित्यानंदधामीचा उल्लेख आला आहे. धाम शब्दातच निवास अभिप्रेत आहे. थकल्याभागल्याने येऊन आराम करण्याची खास जागा, हा अर्थ आहे त्यात.
– प्रा. स्वानंद गजानन पुंड