काश्मिरियतची परीक्षा

0
53

वेध
अमरनाथच्या यात्रेकरूंवर बेछूट गोळीबार करून काश्मिरातील दहशतवाद्यांनी आठ जणांना ठार केले, या घटनेने, आश्‍चर्य म्हणजे काश्मीर खोरे हादरून गेले आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर गोळीबार २००६ नंतर प्रथमच झाला. काश्मिरातील राजकीय नेत्यांनी तर या घटनेचा तीव्र निषेध केलाच, पण फुटीरतावादी हुर्रियतच्या नेत्यांनीदेखील या घटनेचा धिक्कार केला आहे. ही लक्षणीय बाब आहे. या घटनेने काश्मिरियतला काळे फासले गेले, असे या लोकांनी म्हटले आहे. म्हणजे यांच्या दृष्टीने काश्मिरियत हिंदुस्थानियतपेक्षा वेगळी आहे. ठीक आहे. तेही मान्य करायला हरकत नाही. पण, आता ही काश्मिरियत वेळोवेळी प्रदर्शित झाली पाहिजे. ज्यांनी गोळीबार केला, त्यांना तर भारतीय जवान सोडणार नाहीतच. लवकरच त्यांचा गोळ्यांनी चाळणी झालेला देह, आपल्या सर्वांना बघायला मिळणार, यात शंका नाही. नंतर त्यांचे दफन होईल. त्या अन्त्ययात्रेला किती काश्मिरी जमतात ते बघावे लागेल. गोळीबाराच्या घटनेने काश्मिरियतला काळे फासले गेले असेल, तर या दहशतवाद्यांच्या अन्त्ययात्रेला काळे कुत्रेही जायला नको! तसे घडले तरच, या काश्मिरी नेत्यांच्या शोकसंदेशाला अर्थ आहे. घोडामैदान जवळच आहे. लवकरच यांचे मनातील भाव व ओठांवरचे शब्द यातील अंतर कळून चुकेल. अमरनाथ यात्रेकरूंच्या मरणामुळे काश्मिरी लोकांना खरोखरच वेदना झाली असेल, तर यापुढे काश्मीर खोर्‍यात, दहशतवाद्यांना मिळत असलेला वाढता पाठिंबा हळूहळू का होईना पण कमी व्हायला हवा. असे म्हणतात की, या घटनेनंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची राज्यातील स्थिती बळकट झाली आहे. असे असेल तर तो एक शुभसंकेत मानायला हवा. कारण मेहबुबा यांची स्थिती जितकी बळकट होईल, तितका काश्मिरातील हिंसाचार व ढासळलेली सुव्यवस्था कमी होण्यास मदत होईल. काही जण काश्मिरात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी करीत आहेत. ती साफ चुकीची आहे. काश्मिरातील परिस्थिती अधिक चिघळावी, या मनीषेपोटी ते ही मागणी करीत आहेत, असे समजले पाहिजे. या राज्यात लोकप्रिय सरकार सत्तेवर असतानाच, जे काही करायचे ते केले पाहिजे. एकदा का येथील प्रशासन केंद्र सरकारच्या हातात गेले की, येथील लोकांना केंद्र सरकारच्या विरुद्ध भडकविणे फुटीरतावाद्यांना सोपे जाणार आहे. ती चूक केंद्र सरकार करणार नाही, अशी आशा आहे. जानेवारीपासून १०५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. अशा वेळी लहानशी चूकदेखील खूप महागात पडू शकते, याचे भान इतर भारतीयांनी आपली मते व्यक्त करताना ठेवले पाहिजे.
लालूंच्या स्वप्नात मोदी!
२०१४ नंतर लालूप्रसादांच्या स्वप्नात मोदी येत असतात. पण, आजकाल आणखी एक मोदी त्यांच्या स्वप्नात येऊ लागला आहे. या मोदीलापण दाढी आहे. तो म्हणजे सुशीलकुमार मोदी! बिहारमधील भाजपाच्या या नेत्याने गेल्या तीन महिन्यांत ३० हून अधिक पत्रपरिषदा घेऊन, लालूप्रसादांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. तरीही इतका मालमसाला आहे की, अजून २० पत्रपरिषदा ते घेऊ शकतात! सुशीलकुमार मोदींचे म्हणणे आहे की, लालूप्रसादांचा भ्रष्टाचार कुणीही उघडकीस आणू शकतो, इतका तो प्रचंड व उघड आहे. त्यातच लालूंचा भ्रष्टाचाराबाबतचा व्यवहार निष्काळजीपणाचा असतो. ते इतके बेफिकीर आहेत की, त्यांना त्यांच्या मुलांची अधिकृत नावेदेखील कदाचित सांगता येणार नाहीत! त्यांना त्यांची किती संपत्ती आहे, हेदेखील ठाऊक नसावे. अशा या लालूप्रसादांना, सुशीलकुमार मोदींनी पुरते घेरले आहे. सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यामुळे आता यातून यादव कुटुंबीयांची सुटका होणे कठीणच दिसते. सुशीलकुमारांनी एकाच दगडात दोन पक्ष्यांची शिकार केली आहे. दुसरा पक्षी म्हणजे नितीशकुमार. नितीशकुमारांची लोकप्रियता ते रालोआ सरकारात रेल्वेमंत्री असताना शिखरावर होती. त्यानंतर ती घसरत आहे. लालूप्रसादांच्या मदतीने मुख्यमंत्री झाल्यावर तर त्याला अधिक वेग आला आहे. त्यामुळेच, नितीशकुमार द्विधा मन:स्थितीत आहेत. आपली घसरती लोकप्रियता थांबवायची असेल, तर त्यांना लालूंची साथ सोडणे आवश्यक आहे. सुशीलकुमारांच्या मते, हे सरकार एवढ्यात कोसळणार नाही. राजद व कॉंग्रेस हे घडू देणार नाहीत. तेजस्वी यादवचा राजीनामा घेतला, तरी नितीशकुमार यांना राज्यकारभार करणे कठीणच जाणार. लालू स्वस्थ बसणार नाहीत. आज विधानसभेत जदयूचे ७१, तर राजदचे ८० आमदार आहेत. आपल्या ८० आमदारांचा तोरा, राजदवाले वारंवार दाखवीत असतात. सुशीलकुमार मोदींचा दावा आहे की, या सर्व प्रकरणाचा राज्यात भाजपाला सर्वाधिक फायदा होणार आहे. आज बिहारमध्ये ४० पैकी ३२ खासदार रालोआचे आहेत. २०१५ साली नितीश मुख्यमंत्री झाले असले, तरी लालूप्रसादांशी युती असल्यामुळे राज्यातील वातावरण ठीक नाही. लालूंचे काळे धंदे पूर्ववत् सुरू आहेत. त्यामुळे नितीशकुमारांचे मतदार नाराज आहेत. ही नाराजी भाजपाच्या पथ्यावर पडणारी आहे. नितीशकुमारांनी लालूंची साथ सोडून भाजपाचा हात हातात घेतला, तरी भाजपाचीच लोकप्रियता वाढणार आहे. नुकतीच दरभंगा येथे योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. मुसळधार पावसातही ४० हजार लोक सभेला उपस्थित होते. संपूर्ण मैदान पाण्याने भरले होते आणि लोक ‘मोदी मोदी’ व ‘योगी योगी’ घोषणा देत होते. बिहारचे वारे कुठल्या दिशेने वाहात आहेत, याचा यावरून अंदाज येतो. सुशीलकुमारांनी इतक्या चलाखीने चाली खेळल्या आहेत की केवळ लालूच नाही, तर नितीशकुमारांच्याही स्वप्नात मोदी येत असावेत, अशी शक्यता आहे!
श्रीनिवास वैद्य
९८८१७१७८३८