काश्मीरच्या रंगमंचावरील हॅम्लेट आणि हैदर!

0
104

दिल्ली दिनांक
एकदा रात्री अचानक ‘हैदर’ हा हिंदी चित्रपट पाहण्यात आला. हैदरचे कथानक काश्मीरसमस्येभोवती फिरणारे आहे. नंतर कळले की हा चित्रपट, प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’वर आधारलेला आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी बारामुल्लाचा युवा आमदार व सत्ताधारी पीडीपी पक्षाच्या युवा शाखेचा पदाधिकारी यावर मीरला दूरध्वनी करून, हैदरचे कथानक काश्मीरच्या सध्याच्या समस्येशी खरोखरीच जुळणारे आहे काय, असा प्रश्‍न केला. त्याने उत्तर दिले, होय! बर्‍याच प्रमाणात!
हैदरचे कथानक
हैदर हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. खोर्‍यातील वातावरणाचा आपल्या मुलावर परिणाम होऊ नये म्हणून आई त्याला शिकण्यासाठी अलिगढ विद्यापीठात पाठविते. हैदरचे वडील डॉक्टर असतात. सुरक्षा दळांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या एका अतिरेक्यास उपचार करण्यासाठी हैदरच्या घरी आणले जाते. नंतर हैदरचा काका पोलिसांना ही माहिती पुरवितो. पोलिस हैदरच्या वडिलास पकडून नेतात. नंतर हैदरचा काका हैदरच्या आईशी लग्न करतो. हैदर सुटीत घरी परततो, तेव्हा वडील घरी नसतात. वडिलांचा शोध सुरू करतो. वडील एका बंदिगृहात सापडतात. त्यांच्याकडून त्याला सत्य कळते. आणि यानंतर सुरू होतो, हैदरचा सूडाचा प्रवास! बुरहान वानीचे असेच झाले. तो २२ व्या वर्षी चकमकीत ठार झाला. वयाच्या १७ व्या वर्षी तो अतिरेकी झाला. आपल्या मोठ्या भावासोबत तो बाहेर गेला होता. सुरक्षा दळांनी भावाला पकडले. मोठा भाऊ नंतर ठार झाला. त्याचा बदला घेण्यासाठी १७ वर्षांच्या बुरहानने हाती एके-४७ रायफल घेतली.  ‘हैदर’ चित्रपट काश्मीरसमस्या हाताळणार्‍यांनी पाहावा असा आहे. हैदरचा शेवट शोकान्त आहे,   हॅम्लेटसारखाच. काश्मीरचाही घटनाक्रम त्याच दिशेने जात आहे काय?
यात्रेवर हल्ला 
अनेक वर्षांनंतर अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला. या हल्ल्याचे पोस्टमॉर्टम केले जात आहे. याला अर्थ राहात नाही. यात्रेवर हल्ला झाला यावरून, कोणतीही सुरक्षाव्यवस्था कधीच कडेकोट नसते, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने ज्या सलाउद्दीनला जागतिक अतिरेकी घोषित केले आहे, त्याने दोन-तीन दिवसा अगोदर आपण भारतात कुठेही हल्ला करवू शकतो, असे विधान केले होते. जागतिक अतिरेकी घोषित होणे त्याच्या पथ्यावर पडले आहे. त्याला पाकिस्तान सरकारने अधिक सुरक्षा दिली आहे. त्याला अधिक पाठिंबा मिळत आहे. सलाउद्दीनला जागतिक अतिरेकी घोषित करण्याने काहीही साध्य झालेले नाही.
गंभीर स्थिती
सुरक्षा दळांकडून अतिरेक्यांविरुद्ध जोरदार मोहीम राबविली जात आहे आणि याने खोर्‍यातील स्थिती सुधारण्याऐवजी ती अधिक गंभीर होत आहे. याचे मुख्य कारण आहे, बदलते काश्मिरी मानस! शेक्सपियरचे एक सुभाषित आहे, या जगात चांगले-वाईट काहीही नाही. तुमचे विचार काय, यावरून चांगले-वाईट ठरत असते. खोर्‍यातील स्थितीला हे नेमके लागू होत आहे. सार्‍या देशात ज्यांना अतिरेकी मानले जाते, काश्मिरी जनता त्यांना हीरो मानत आहे. एखादा कुख्यात अतिरेकी ठार झाल्यावर देशात जल्लोष साजरा होतो, तर काश्मीरमध्ये मातम म्हणजे  दु:ख!
माध्यमांचे तेल
काश्मीरच्या आगीत तेल ओतण्याचे काम टी.व्ही. चॅनेलवाल्यांनी नकळत केले आहे. काश्मीर खोर्‍यात पूर्वीही चकमकी झडत होत्या. सुरक्षा दळे आपले काम करत होती. अतिरेकी मारले जात होते. त्याची फार चर्चाही होत नव्हती. आता वेगवेगळ्या चॅनेल्सवर प्रत्येक चकमकीला जसे रंगवून दाखविले जात आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम खोर्‍यात झाला आहे. सारा भारतच आमच्या विरोधात आहे, मग भारतासोबत कशाला राहावयाचे, ही मानसिकता खोर्‍यात तयार झाली आहे. जी पूर्वी नव्हती. आमच्या गावातील मुलगा ठार होतो आणि सार्‍या भारतात जल्लोेष होतो. चॅनेलवरून आम्हाला शिव्या घातल्या जातात, तर मग भारताबद्दल प्रेम कशासाठी, यापेक्षा पाकिस्तान ठीक आहे. तो आमच्या दु:खात आमच्यासोबत  उभा राहतो. या मानसिकतेेने काश्मीर खोर्‍यात घर केले आहे. याला जोड आहे ती भौगोलिक परिस्थितीची. काश्मीर खोर्‍यासाठी दिल्ली म्हणजे फार दूर. याउलट ‘उसपार’ म्हणजे दोन डोंगर ओंलाडले की पाकव्याप्त काश्मीर!
मोठी पोकळी  
काश्मीरच्या राजकारणात- दिल्लीची भूमिका महत्त्वाची राहात गेलेली आहे- चांगल्या आणि वाईट दोन्ही कारणांसाठी. राज्यपाल हे दिल्लीचे प्रतिनिधी मानले जातात. आज जे राज्यपाल आहेत त्यांचा काश्मिरी जनजीवनाशी कवडीचाही संबंध नाही. लेफ्ट. जनरल सिन्हा नावाचे एक राज्यपाल काश्मीरमध्ये होते. त्यांनी स्वत:ला काश्मिरी जनतेच्या सुखदु:खांशी जोडून घेतले होते. आज राज्यपाल निष्क्रिय आहेत, मुख्यमंत्री निष्प्रभ आहेत. मग, काश्मिरींना भारताशी जोडणारे माध्यम कोणते?
तिरंगावाले
काश्मीर खोर्‍यात सुरक्षा दळांचा उल्लेख ‘तिरंगावाले’ असा केला होता. सुरक्षा दळे आपले प्राण धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावीत आहेत. पण, त्यातून निमार्ंण होणार्‍या समस्या हाताळणारी यंत्रणा तेथे अस्तित्वात नाही. काश्मिरी जनतेने कुणाकडे दाद मागावयाची? राज्यात भाजपा- पीडीपी यांचे सरकार आहे. भाजपाचे अस्तित्व जम्मू भागात आहे, तर पीडीपीचे काश्मीर खोर्‍यात. आज पीडीपीचे आमदार आपल्या घराबाहेर पडू शकत नाहीत, अशी स्थिती तेथे तयार झाली आहे. बहुतेक आमदार जम्मू, नवी दिल्ली वा अन्य भागात वास्तव्यास आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची ही स्थिती, मग जनतेशी संवाद कोण साधणार?
समस्या समजण्याची गरज 
काश्मीर समस्येत आता चीनने उडी मारली आहे. अतिशय शालीन भाषेत त्याने मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. भारत जर अमेरिकेला हाताशी धरून सलाउद्दीनला जागतिक अतिरेकी घोषित करू शकतो, तर चीनही मागे राहणारा नाही. त्याने मसूद अजहरला अतिरेकी घोषित करण्याची मागणी रोखून धरली आहे. काश्मीरसमस्या अतिशय नाजूक टप्प्यात दाखल झाली आहे. काश्मीरसमस्येचे आंतरराष्ट्रीयीकरण होऊ देणे भारताच्या हिताचे नाही. भारत अमेरिकेकडे गेला की पाकिस्तान चीनकडे गेलाच! चीनला तेच हवे आहे. भूतानमध्ये भारतीय सैन्य असल्याने चीनला तेथे फार हालचाली करणे जड जात आहे. त्याचा बदला म्हणून तो पाकिस्तानला अधिकाधिक पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारणार आहे, असे दिसते.
अनिश्‍चिततेकडे
अतिरेक्यांना कठोरपणे हाताळीत असताना, स्थानिक जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे  काम  आव्हानात्मक आहे. विद्यमान राज्यपाल वोरा वा मुख्यमंत्री मेहबुबा यांच्या आवाक्यातील हे काम नाही. याचा विचार केव्हा केला जाईल? आज काश्मीरमध्ये सुरक्षा दळांचे जवान मारले जात आहेत आणि अतिरेकीही ठार होत आहेत. सुरक्षा दळाच्या जवानांवर तीन बाजूंनी हल्ले होत आहेत- पाकिस्तानकडून, पाकिस्तानने पाठविलेल्या अतिरेक्यांकडून आणि स्थानिक अतिरेक्यांकडून. कधीकाळी काश्मीर हे पृथ्वीकरील नंदनवन मानले जात होते. आज दररोजच्या हिंसाचाराने काश्मीरचा चेहरा विद्रूप झाला आहे. ही काश्मीरची शोकान्तिका आहे. याचा शेवट काय होईल, हे मात्र कुणालाही ठाऊक नाही. आज श्रीनगरच्या दाल सरोवराचे पाणी संथ असले, तरी काश्मीर खोरे अनिश्‍चिततेच्या भोवर्‍यात सापडले आहे…
रवींद्र दाणी