मोकाट जनावरांमुळे जीवहानी झाल्यास मालकाला कारावास

0
36

नागपूर, १६ जुलै
शहरात पाळीव जनावरे मोकाट सोडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण तर होतातच, शिवाय अपघाताचीही शक्यता असते. व्हीआयपी रोड आणि हिंगणा रोडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी महामार्गावर मोकट जनावरे हमखास दिसून येतात. या मोकाट जनावरांमुळे अपघात होऊन एखाद्याला जीव गमवावा लागला तर जनावराच्या मालकाला कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल, असे मनपा प्रशासनातर्ङ्गे एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोकाट जनावरांमुळे अपघात होऊन एका इसमाला जीव गमवावा लागला. शिवाय याआधी अनेक भीषण अपघातही घडलेत. रात्रीच्यावेळी जनावरे वाहनचालकांनी दिसत नाही. भर रस्त्यावर ठिय्या मांडणार्‍या जनावरांना वाहने त्यांना धडकून अपघात होतात. असे प्रकार यापुढे घडल्यास मुंबई पोलिस कायदा १९५१ मधील कलम ९० (अ) व ११८ नुसार प्राणघातक अपघातासाठी मोकाट जनावरांच्या मालकांना एक महिन्यापर्यंत कारावास किंवा तीन हजार रुपये दंड वा दोन्ही शिक्षा ठोठावली जाऊ शकते. तसेच पाळीव जनावरे रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी बांधून ठेवल्यास त्या जनावरांचे पालक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २३३ नुसार कारवाईसाठी पात्र राहतील, असेही मनपाने कळविले आहे.
संबंधित जनावरांच्या मालकांनी हीच नोटीस समजून अवैधरीत्या जनावरे पाळणे, त्यांना मोकाट सोडून वाहतुकीला अडथळे निर्माण करणे त्वरित बंद करावे. तसेच सार्वजनिक आरोग्याला धोकादायक असलेले जनावरांचे मलमूत्र हटवून १५ दिवसांच्या आत संबंधित मनपा झोन कार्यालय किंवा संबंधित पोलिस ठाण्याला लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथा हे कृत्य जाणीवपूर्वक करीत असल्याचे गृहित धरून प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, याची गंभीरपणे दखल घ्यावी, असे मनपा आणि पोलिस आयुक्त कार्यालयातर्ङ्गे कळविण्यात आले आहे.

तभाच्या थेट भेटचा परिणाम
जनतेच्या समस्यांना तभाने थेट भेटच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमात गेल्या आठवड्यात शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी आले असताना त्यांना या मोकाट जनावरांच्या समस्येबाबत अवगत करण्यात आले. तसेच रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळेही अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. याची दखल घेऊन परदेशी यांनी वेळीच कारवाई करीत मनपा प्रशासन व पोलिस आयुक्त कार्यालयाच्या सदर बाब निदर्शनास आणून दिली. परदेशी यांनी या भेटीच्या वेळीही जनावरांमुळे प्राणघातक अपघात झाल्यास मालकास कठोर कारावासाच्या शिक्षेचा इशारा दिला होता.