विकृत वागण्यातच खरे अपंगत्व : डॉ. राणी बंग

0
60

– अपंग, महिला-बालविकास संस्थेचा रजतजयंती महोत्सव
नागपूर, १६ जुलै
मनुष्याला व्यंगत्व येणे ही प्रकृती आहे. पण, आज समाज विकृतीकडे चालला आहे. धडधाकट लोक आपल्या बुद्धीचा वाईट कामासाठी वापर करत आहे. त्यामुळे कुठलेही व्यंग नसताना विकृतपणे वागणे हेच खर्‍या अर्थाने समाजातील अपंगत्व असल्याचे प्रतिपादन गडचिरोली येथील शोध ग्राम संस्थेच्या संचालिका व ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी केले.
दक्षिण अंबाझरी मार्गावरील अंध विद्यालय परिसरातील प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात १६ जुलै रोजी अपंग, महिला-बालविकास संस्था, नागपूरच्या रजतजयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दीपप्रज्वलन व गायत्री मंत्र पठणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
अध्यक्षस्थानी आयकर विभागाच्या उपसंचालिका डॉ. कौमुदी पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून रामदेवबाबा कमला नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील मानव्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विनोद आसुदानी, ब्लाईंड रिलिङ्ग असोसिएशनच्या सहसचिव माया ठोंबरे, आशादीप संस्थेचे अध्यक्ष एल. बी. पाटील, रजतजयंती महोत्सव समितीच्या सचिव डॉ. प्रतिमा शास्त्री, सुहासिनी प्रधान, वनिता पाटील आदी उपस्थित होत्या.
डॉ. बंग म्हणाल्या, दिव्यांग बाळाचे पालकत्व येणे ही दुर्दैवाची नव्हे, तर सुदैवाची बाब आहे. तुम्ही पालक विशेष आहात. तुम्ही या बालकांचा सुंदरपणे सांभाळ करू शकता, त्यांच्यात नवचेतना व विश्‍वास निर्माण करू शकता आणि म्हणूनच दिव्यांग बाळ परमेश्‍वराने तुमच्या पोटी जन्मास घातले आहे. अलीकडेच गर्भाशय नसलेल्या मुली जन्मास येण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा मुलींना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मुलींचा दिव्यांगांच्या परिभाषेत समावेश करण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी या व्यासपीठावरून केली. आयुष्यात कधी निराश होऊ नका, तुम्हा दिव्यांगांच्या सहवासात मी अधिक ऊर्जावान झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. आसुदानी म्हणाले, समाजाला पुढे नेण्यासाठी संवेदनशील हृदयाची गरज आहे. आशादीपने या दीर्घ प्रवासात अनेकांना मदतीचा हात देऊन मोठे कार्य केले आहे. आजचा तरुण भरकटत चालला आहे. समाजासाठी काही केले पाहिजे, ही भावना बोथट होत चालली आहे. दिव्यांगांना मदतीचा हात दिल्यास ते उत्तुंग भरारी घेऊ शकतात, याचे उदाहारण पुरस्कार विजेती पूनम इटकरे होय. सशक्त लोकशाहीसाठी लोकशाहीच्या मंदिरात दिव्यांगांचे प्रतिनिधी निवडून जाण्याची गरज असल्याचे आग्रही मत त्यांनी यावेळी मांडले. त्यांच्या उत्स्ङ्गूर्त आणि प्रेरणादायी भाषणाने यावेळी सभागृह मंत्रमुग्ध झाले होते.
डॉ. कौमुदी पाटील यांनी, मनाने पंगू असणारे व्यक्ती अपंग आहे. दिव्यांगांच्या कणखरपणाचे कौतुक करत त्यांनी संस्थेच्या दीर्घ यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्व. उषाताई संत स्मृती पुरस्कार दिल्ली येथे झालेल्या २०१६ च्या राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती दृष्टिबाधित धावपटू पूनम भीमराव इटकरेला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. राणी बंग, डॉ. विनोद आसुदानी व डॉ कौमुदी पाटील यांचा संस्थेतर्ङ्गे सत्कार करण्यात आला. तसेच २०१७ मधील यशस्वी दिव्यांग गुणवंतांचा सत्कार झाला. संचालन अपर्णा कुळकर्णी व अरुंधती पांढरीपांडे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.