नागपूरचे प्रेक्षक अभिरुचिसंपन्न

0
66

– न्या. विकास सिरपूरकर यांचे प्रतिपादन
– रमेश अंभईकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
नागपूर, १६ जुलै
दारव्हेकर मास्तरांसारख्या महासूर्याच्या तालमीत अंभईकर तयार झाले. मास्तरांच्या वर्तुळातून बाहेर निघत त्यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली. अंभईकरांनी नाटकाची त्रिवेणी जोपासून दिग्दर्शन केले. नागपूरकर रसिकांनीही त्यांना भरभरून साथ दिली. नागपूरकरांनी नाटक, नाट्य कलाकारांइतकेच प्रेम दिग्दर्शकावरही केले. नागपुरी प्रेक्षक हा अभिरुचिसंपन्न आहे. तो चांगल्या नाटकासाठी तळमळतो. अंभईकरांनी त्यांना चांगले नाटक दिले, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. विकास सिरपूरकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि रमेश अंभईकर अमृत महोत्सव सत्कार समितीच्या वतीने रमेश अंभईकर यांचा अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी, विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ कथाकार आशा बगे, आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे, सत्कारमूर्ती रमेश अंभईकर, चित्रा अंभईकर, प्रेम लुनावत, समीर सराङ्ग, दीपक निजावार आणि प्रभाकर आंबोणे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मल्हार अंभईकर, कांचन घाटोळे आणि नीलेश घाटोळे यांनी सादर केलेल्या नांदीने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रमेश अंभईकर यांचा शाल, श्रीङ्गळ, मानपत्र आणि मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सिरपूरकर म्हणाले, नाट्य इतिहासात अनेकांनी मानाची पाने कोरून ठेवली. त्यातील दारव्हेकर मास्तरांनंतरचे अंभईकर हे एक. अंभईकरांनी नियमांचे पालन करून मात्र, नवीन्यपूर्ण प्रयोग सादर केले. त्यांनी संहिता लेखनाच्या इतिहासात स्वत:चे नाव कोरले. दारव्हेकर मास्तर ही नागपुरातील संस्था होती. तशीच संस्था म्हणजे अंभईकर आहेत. ही संस्था नागपूरकर कधीच विसरणार नाहीत. आशा बगे म्हणाल्या, दारव्हेकर मास्तरांनी तयार केलेल्या सुवर्ण काळाच्या खांद्यावर उभे राहूनही अंभईकरांनी वेगळेपण जपले. आपले ताजेपण इतरांना बहाल केले. रंजन कला मंदिराची धुरा आणि नाट्यचळवळ चालविण्यामध्ये अंभईकरांचे योगदान मोठे आहे. नव्या आणि जुन्याची समन्वय दृष्टी अंभईकरांनी नागपूरच्या अजाण, भाबड्या प्रेक्षकांसमोर ठेवली.
अध्यक्षीय भाषण करताना डॉ. गिरीश गांधी म्हणाले, अंभईकर यांचे जीवन व्रतस्थ आहे. प्रत्येक नाटकाचा गांभीर्याने पाठपुरावा करणे आणि तो शेवटपर्यंत कायम ठेवणे हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. जो स्वत:विषयी योग्य निर्णय घेतो, त्याला जीवनाचा मार्ग मिळतो. असाच मार्ग अंभईकरांना मिळाला. सध्या नाट्य वैभवाचे दिवस लयाला जात आहे. म्हणून नवीन रंगकर्मींनी सहभाग घ्यायला हवा. नवीन संहिता लिहायला हव्यात. मास्तरांची नाट्य चळवळ पुन्हा सुरू करायला हवी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर आंबोणे, संचालन प्रकाश एदलाबादकर आणि आभारप्रदर्शन डॉ. अंजली भांडारकर यांनी केले. मानपत्राचे वाचन मृणाल पुराणिक यांनी केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

सत्काराविषयी मत व्यक्त करताना अंभईकर म्हणाले, मराठी रंगभूमीने मला जगण्याचे प्रयोजन दिले. नाटकासाठी भाषा चांगली असणे महत्त्वाची असते. मला बाळशास्त्री हरदास आणि ग. त्र्यं. माडखोलकर यांच्यामुळे भाषेचा लळा लागला. त्यानंतर मास्तरांची शिकवण, प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्‍यांची साथ यामुळे दिग्दर्शनात पाऊल टाकले. मुंबईत बाहेरून नवीन कलाकार येतात. त्यामुळे ती समृद्ध झाली आहे. मुंबई ही बाजारपेठ आहे. तिथे गेल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही. नाटक हा माझा प्राण आहे. त्यामुळे त्याच्याशी मृत्यूपर्यंत मी ङ्गारकत घेणार नाही.

सद्य:स्थितीत दूरचित्रवाणीवर दाखविण्यात येणार्‍या मालिकांमध्ये भाषेचे विकृत सादरीकरण केले जाते. नागपुरी भाषा ही व्याकरणशुद्ध आहे. मात्र, काही मालिकांमध्ये ती अतिशय वाईट पद्धतीने मांडण्यात आली आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. विकास सिरपूरकर यांनी यावेळी व्यक्त केले.