मधुरने अनुभवली ‘आणिबाणी’

0
103

– नागपुरात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी
– ‘इंदु सरकार’चे प्रोमोही झोंबले
नागपूर, १६ जुलै
प्रख्यात दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता मधुर भांडारकर आगामी ‘इंदु सरकार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपुरात आला असताना त्याला अक्षरश: आणिबाणीचा अनुभव आला. भारतीय इतिहासातील ‘त्या’ २१ महिन्यांची कथा आपल्या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करणार्‍या मधुर भांडारकरला कॉंग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी माध्यमांसोबत बोलूही दिले नाही. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित व्हायचा असून त्याचे प्रोमो देखील प्रमुख विरोधी पक्षाला झोंबल्याचे दिसत आहे.
‘इंदु सरकार’ गेल्या काही दिवसांपासूनच वादाच्या भोवर्‍यात आहे. रविवारी सकाळी नागपुरात मधुर भांडारकर पत्रकारांना भेटून या चित्रपटाविषयीची आपली भूमिका मांडणार होते. मात्र, नियोजित स्थळी दाखल झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रशांत धवड, अभिजित वंजारी आणि इतरही ‘जनाधार’ नसलेल्या नेते-कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. परिणामी, भांडारकर यांनी परिषद रद्द करण्याचा निर्णय घेत नागपूरचा निरोप घेतला. ‘मधुर भांडारकर हा सत्तारूढ पक्षाचा दलाल असून तेच या चित्रपटाचे प्रायोजक आहेत,’ असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट अद्याप कुठेही प्रदर्शित झालेला नसताना, केवळ प्रोमो बघून त्यात आक्षेपार्ह दृश्ये दाखविल्याचा आरोप कॉंग्रेसकडून व्हावा, हे हास्यास्पद आहे. या चित्रपटामुळे कॉंग्रेसची बदनामी होत असल्याची मुक्ताङ्गळेही कॉंग्रेसमंडळींनी उधळली आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे ढोल बडविणार्‍या कॉंग्रेसजनांना आपल्या व्यक्तिपूजेपलीकडे कलाकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची जाणीवच राहिली नाही.
विशेष म्हणजे कधीकाळी आपल्या कार्यक्रमात ‘ग्लॅमरस चेहरा’ म्हणून मधुरला बोलविणार्‍या नेतेमंडळींच्या आंदोलनातील सहभागामुळे त्यांचे सपशेल ‘घूमजाव’ नागपूरकरांना बघायला मिळाले. दोन मिनिटांचा प्रोमो बघून जर कॉंग्रेसचा इतका तिळपापड होत असेल तर आणिबाणीची धग प्रत्यक्ष सोसणार्‍यांनी काय करावे, अशी चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती. शनिवारी पुण्यातही मधुर भांडारकर यांना अशाच विरोधाला तोंड द्यावे लागले होते. चित्रपट निर्मिती ही कला आहे आणि कलाकाराला अभिव्यक्तिस्वातंत्र्य द्यायला हवे, याचा विसर नागपूर कॉंग्रेसला पडला की काय, अशी शंका आल्यावाचून राहात नाही. येत्या २८ जुलैला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

पक्षश्रेष्ठींची परवानगी आहे का?
‘इंदु सरकार’चे प्रमोशन आणि पत्रकार परिषद, पुण्यापाठोपाठ नागपुरातही गोंधळ घातल्याने होऊ शकली नाही. कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे हे प्रकार पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि इतर पक्षश्रेष्ठींच्या परवानगीनेच होत आहे काय? मला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे का? असा प्रश्‍न नाराज मधुर भांडारकर यांनी उपस्थित केला आहे. नागपुरात झालेल्या गोंधळानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘अशा प्रकारे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. इंदु सरकार हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक आणि ३० टक्के वास्तवावर आधारित आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. हा भाजपा प्रायोजित चित्रपट नाहीच आणि जर प्रायोजित असता तर २०१९ मध्ये काढला असता. माझे कॉंग्रेससह सर्वच पक्षात मित्र आहेत. कलाकारांना विरोध करण्याच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीला पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची परवानगी आहे का?’ असा सवाल मधुर भांडारकरने उपस्थित केला. त्यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी अत्यल्प संवाद साधला. त्यांच्या सोबत असलेली अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने या दोन दिवसांतील घटनाक्रमामुळे आपण खूप घाबरलो असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
तत्पूर्वीही आज आपण नागपुरात असून पत्रकारांशी ‘इंदु सरकार’ हा चित्रपट आणि त्या विषयावर चांगली चर्चा होईल, असे ट्विट मधुर यांनी रविवारी सकाळी केले होते.