पावसाची दडी; पिके धोक्यात

0
106

– अनेक ठिकाणी दुबार पेरणी
नागपूर, १६ जुलै
हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतरही पाऊस मात्र पडतच नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. जूनच्या उत्तरार्धात रजेवर गेलेला पाऊस जुलै महिन्यातही पडण्यास तयार नाही. वेधशाळांचे सर्व अंदाज ङ्गोल ठरवत पावसाने दडी मारली आहे. बाजूच्या गोंदिया जिल्ह्यात शनिवारी पावसाने हाहाकार उडवून दिला. मात्र, नागपूर जिल्ह्यात अवर्षणच जाणवत आहे.
जुलैच्या सुरुवातीला किमान १५ दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, चार-दोन सरी सोडल्या तर समाधानकारक असा पाऊस कोसळलाच नाही. जूनच्या उत्तरार्धात पावसाने दडी मारली. त्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, सारे अंदाज खोटे ठरवत पावसाने आपल्या लहरीपणाचा पुन्हा एकदा परिचय दिला. मागील पंधरा दिवस काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. मात्र, त्यात सातत्य नसल्याने नागपूर जिल्ह्यातील नदी-नाल्यांमध्ये आजही ठणठणाट आहे.
जुलै महिन्याचा पंधरवडा उलटल्यानंतरही जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने आजही अनेकांच्या पेरण्याच झालेल्या नाही. बुधवारी विदर्भात मान्सूनचे पुनरागमन झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, यवतमाळचा काही भाग आणि नागपूर व वर्धा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळला नाही. दिवसभर गाभुळलेल्या ढगांची दाटी आकाशात दिसते. मात्र, पाऊस कोसळत नसल्याने शेतकर्‍यांसह शहरी नागरिकही त्रस्त झाले आहेत. पेरणीचा हंगाम संपला; मात्र, पावसाअभावी अनेक ठिकाणी पेरणीच होऊ शकलेली नाही. १२ जुलै रोजी नागपूरसह विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, पावसाची वाटचाल सरासरी २५ मिमीच्या पुढे सरकू शकली नाही. आता हवामान खात्याने दुसर्‍या टप्प्यातील मान्सून १६ जुलैनंतर सक्रिय होईल, असे भाकित वर्तविले आहे. हा अंदाजही चुकल्यास जिल्ह्यातील शेती धोक्यात येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.