भारताच्या गोळीबारामुळे  ४ पाकी सैनिक नदीत बुडाले

0
222

इस्लामाबाद, १७ जुलै 
जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गेल्या दोन दिवसांपासून गोळीबार सुरू आहे. प्रत्युत्तरादाखल भारतीय सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात पाकच्या चार सैनिकांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
रविवारी गुलाम काश्मिरात नियंत्रण रेषेजवळ रेकी करत असलेल्या पाक सैनिकांच्या एका वाहनावर भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारामुळे ते वाहन नदीत कोसळले आणि चार सैनिक बुडाल्याचा दावा पाकने केला आहे. मुजफ्फराबादपासून ७३ किलोमीटर दूर नीलम नदीजवळ असलेल्या एका वाहनावर भारतीय जवानांनी तुफान गोळीबार केला. त्यामुळे चार सैनिक नदीत बुडाले, असे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफुर यांनी म्हटले आहे. यापेकी एका सैनिकाचा मृतदेह शोधण्यात यश आले असून इतर तिघांचा शोध सुरू असल्याचे वृत्त आहे. रायटर या वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे.
नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या पाकिस्तानकडून गेल्या दोन दिवसांपासून गोळीबार सुरू आहे. शनिवारी संध्याकाळी उशिरा थोड्या वेळासाठी पाकिस्तानकडून गोळीबार बंद झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला. रविवारी दिवसभरही नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. आज सोमवारी उरी सेक्टरमध्ये पाकी सैन्याच्या गोळीबारात एक भारतीय जवान जखमी झाला. पुंछ येथील बालाकोट आणि राजौरी येथील तरकुंडी सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.  (वृत्तसंस्था)