तोयबाच्या अतिरेक्याला मुंबईत अटक

0
91

उत्तरप्रदेश, महाराष्ट्र एटीएसची कामगिरी
मुंबई, १७ जुलै 
पाकधार्जिण्या लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात् एटीएसने आज सोमवारी मुंबई विमानतळावर अटक केली.
सलीम खान असे या अतिरेक्याचे नाव असून, त्याचा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सलीम खान उत्तरप्रदेशच्या हाथ गावचा रहिवासी आहे. अलीकडेच फैजाबादमधून अटक करण्यात आलेल्या आयएसआयच्या हस्तकाचा तो फायनान्सर होता.
भारतीय लष्कराची तैनाती आणि देशातील संवेदनशील केंद्रांची माहिती पाकिस्तानमधील आपल्या म्होरक्यांना पुरविण्याचे काम करणार्‍यांना सलिमकडूनच पैसा उपलब्ध करून दिला जायचा. गुलाम काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथील तोयबाच्या शिबिरांमध्ये त्याने २००७ मध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले आहे, अशी माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी सलिमची संयुक्त चौकशी करणार असून, यातून बरीच माहिती समोर येण्याची शक्यता या अधिकार्‍याने वर्तवली आहे.
सलीम खान २००८ पासूनच सुरक्षा यंत्रणांच्या रडावर होता. २००८ मध्ये रामपूर येथील सीआरपीएफवरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला दहशतवादी कौसर आणि शरीफ या दोघांनी सलिमनेही आपल्यासोबत मुझफ्फराबादेत प्रशिक्षण घेतल्याची कबुली दिली होती. तर, नुकताच अटक झालेला आयएसआयचा हस्तक आफताब यालाही सलिम विदेशातून सूचना देत होता. तसेच वित्तपुरवठाही करीत होता. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सलिमविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. तो आज भारतात येत असल्याची माहिती मिळाल्यावर एटीएसने विमानतळावरच त्याला बेड्या ठोकल्या. (वृत्तसंस्था)