व्यंकय्या नायडू रालोआचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार

0
122

आज उमेदवारी अर्ज भरणार
नवी दिल्ली, १७ जुलै 
केंद्रीय शहरी विकास तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू रालोआचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार राहणार आहेत. भाजपा संसदीय मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत उपराष्ट्रपतिपदासाठी नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
११ अशोका रोड या भाजपा मुख्यालयात सायंकाळी झालेल्या भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नंतर पत्रपरिषदेत रालोआचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून व्यंकय्या नायडू यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. रालोआच्या सर्व घटक पक्षांनी उपराष्ट्रपतिपदासाठी रालोआचे उमेदवार म्हणून नायडू यांच्या नावाचे स्वागत केल्याचे अमित शाह यांनी सांगितले. उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्याची शेवटची तारिख आहे. उद्या सकाळी ११ वाजता व्यंकया नायडू आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो, राज्यसभेत सध्या भाजपा अल्पमतात आहे. त्यामुळे अनेकवेळा राज्यसभेत भाजपाची कोंडी होते. आता मात्र उपराष्ट्रपतिपदी पर्यायाने राज्यसभेच्या सभापतीपदी नायडू निर्वाचित होणार असल्यामुळे राज्यसभेत भाजपाला मोठा दिलासा मिळणार आहे. भाजपाच्या मार्गातील अडचणी दूर होणार आहेत.
उपराष्ट्रपतिपदासाठी कॉंग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी पक्षांच्या आघाडीने डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत व्यंकय्या नायडू यांचा मुकाबला डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी होणार आहे. रालोआजवळ स्पष्ट बहुमत असल्यामुळे उपराष्ट्रपतिपदी नायडू यांची निवड निश्‍चित मानली जात आहे.
राष्ट्रपतिपदासाठी उत्तर भारतातील रामनाथ कोविंद यांची निवड केल्यामुळे क्षेत्रीय संतुलन कायम राखण्यासाठी भाजपा उपराष्ट्रपतिपदासाठी दक्षिण भारतातील नेत्याची निवड करेल, अशी चर्चा होती, व्यंकय्या नायडू यांच्या निवडीने ती खरी ठरली आहे. नायडू आंध्रप्रदेशातील आहेत. दक्षिण भारतात भाजपाच्या कामाचा पाहिजे तेवढा विस्तार झाला नाही, नायडू यांच्या निवडीने दक्षिण भारतात भाजपाला आपले पाया मजबूत करण्याची संधी मिळणार आहे.
अल्पपरिचय
व्यंकय्या नायडू यांचा जन्म १ जुलै १९४९ रोजी आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात झाला. १९७० च्या दरम्यान त्यांचा रा. स्व.संघाशी संबंध आला. विद्यार्थी परिषदेतही नायडू यांनी काम केले. आणिबाणीच्या काळात नायडू यांनी तुरुंगवासही भोगला. १९७८ ते ८३ या काळात नायडू नेल्लोरमधून आमदार म्हणून निवडून आले. १९९८ पासून नायडू सलग चार वेळा राज्यसभेवर निवडून आले. २००२ ते २००४ याकाळात ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षही होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री म्हणून नायडू यांनी काम केले. सरकारचे संकटमोचक म्हणून नायडू यांची ओळख आहे.