विरोधकांमध्ये फाटाफूट; गुरुवारी फैसला

0
157

कोविंद, मीरा कुमार यांचे भवितव्य मतपेटीत बंद
नवी दिल्ली, १७ जुलै 
देशाचा १४ वा राष्ट्रपती निवडण्यासाठी आज झालेल्या मतदानाने रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी आघाडीच्या उमेदवार मीराकुमार यांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. देशाचा पहिला नागरिक कोण होणार याचा निकाल २० जुलैला लागणार आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी दहापासून संसदभवन आणि देशातील विविध राज्यातील विधानसभाभवनात मतदान झाले. संसदभवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी मतदान केले.
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लोकसभेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनीही मताधिकार बजावला.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संसदभवनाच्या पहिल्या मजल्यावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. खासदार आणि आमदारांसाठी या निवडणुकीत वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका ठेवण्यात आल्या होत्या.
संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि एस.एस. अहलुवालिया भाजपा खासदारांनी मतदान केले की नाही, यावर लक्ष ठेऊन होते. सकाळी दहानंतर मतदान कक्षासमोर खासदारांची रांग लागली होती. राष्ट्रपतिपदासाठी मतदान करत असल्यामुळे पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांमध्ये चांगला उत्साह दिसत होता. राष्ट्रपतिपदाची निवडणूक म्हणजे विचारधारेची लढाई असल्याचे सांगत मीराकुमार यांनी अंतरात्माच्या आवाजानुसार या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले होते, तर राष्ट्रपतिपदाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी हे पद आपण पक्षीय राजकारणाच्या वर नेणार असल्याचे रामनाथ कोविंद यांनी स्पष्ट केले होते.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद  यांचा विजय निश्‍चित मानला जात असल्यामुळे भाजपा तसेच रालोआमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते, तर आपल्या उमेदवाराचा पराभव स्पष्टपणे समोर दिसत असल्यामुळे विरोधी पक्षांचे नेते आणि खासदार औपचारिकता म्हणून मतदान करत होते, पण त्यांच्यात कुठेच उत्साह दिसत नव्हता. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी पक्षादेश (व्हीप) जारी करता येत नाही, त्यामुळे या निवडणुकीत काही प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा होती.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यासह भाजपाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आपआपल्या राज्यांच्या राजधानीत मतदान केले.
आदित्यनाथ, केशवप्रसाद, उमा भारती यांचे लखनौमध्ये मतदान
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी विधानसभा संकुलातील टिळक सभागृहात मतदानाचा हक्क पार पाडला.
पर्रीकरांचे गोव्यात मतदान
माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत मतदान केले. राज्य विधानसभेत एकूण ४० आमदार असून, यातील ३८ आमदारच मतदानासाठी पात्र होते. कॉंगे्रसचे विश्‍वजीत राणे आणि भाजपाचे सिद्धार्थ कुनकोलिंकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
मतदानासाठी भुजबळ, कदम तुरुंगाबाहेर
भारताचे १४ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी आज मतदान झाले. घोटाळ्यांप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदम यांनीही येथील विधानभवनात जाऊन मतदान केले.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईत विधानभवनात महाराष्ट्रातील आमदारांनी मतदान केले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ व तर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अटक झालेले रमेश कदम यांना मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना तुरुंगातून पोलिस सुरक्षेत विधानभवनात नेण्यात आले आणि येथे त्यांनी मतदान केले.
निवडणूक अधिकार्‍यांना 
आश्‍चर्याचा धक्का 
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संसदभवनात सकाळी १० वाजता मतदान सुरू होणार होते. निवडणूक अधिकारी मतदानाच्या तयारीवर शेवटचा हात फिरवत असतांनाच सकाळी ९.५० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान कक्षासमोर आले. त्यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहही होते. मोदी यांना रांगेत पाहून निवडणूक अधिकारी गोंधळले, कारण दहाच्या आधी मतदान सुरू करणे, त्यांच्यासाठी शक्य नव्हते. मोदी यांना रांगेत कसे उभे करायचे, असा प्रश्‍न निवडणूक अधिकार्‍यांना पडला. मात्र हा प्रश्‍न मोदी यांनीच सोडवला. कुठेही वेळेच्या आधी पोहोचायची मला सवय आहे, शाळेत असतांनाही शाळा सुरू व्हायच्या कितीतरी वेळ आधीच मी शाळेत पोहोचत असे, असे सांगून मोदी यांनी वातावरण हलकफुलके केले आणि निवडणूक अधिकार्‍यांवरचा तणाव दूर केला. एवढ्यात घड्याळात बरोबर दहा वाजले आणि मोदी यांनी सर्वप्रथम मताधिकार बजावला.
मोठ्या प्रमाणात 
क्रॉस व्होटिंग
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा संसदभवन परिसरात होती. या क्रॉस व्होटिंगमुळे रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या विजयाचे मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे. तृणमूल कॉंग्रेस, मीराकुमार यांच्यासोबत असताना पक्षाचे त्रिपुरा प्रदेशाध्यक्ष आशिष साहा यांनी सहा आमदारांसोबत  कोविंद यांच्या बाजूने मतदान केल्याचे वृत्त आहे. माकपने ज्या उमेदवाराला पाठिंबा त्या उमेदवाराला आम्ही मतदान करू शकत नाही, असे साहा यांनी स्पष्ट केले.
समाजवादी पार्टीतील अखिलेश यादव गट मीराकुमार यांच्यासोबत असतांना मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वातील शिवपाल यादव गटाने कोविंद यांच्या बाजूने मतदान केले. विशेष म्हणजे मुलायमसिंह यांच्या आदेशाने आपण आणि सपाच्या काही आमदारांनी कोविंद यांना मतदान केल्याचे शिवपाल यांनी सोशल मीडियावरून जाहीर करून खळबळ उडवली. बसपाच्या आमदारांनीही क्रॉस व्होटिंग केल्याचे वृत्त आहे. आपच्या पंजाबमधील आमदारांनीही क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे.