शशिकलाचे बिंग फोडले;  महिला अधिकार्‍याची बदली

0
78

बंगळुरू, १७ जुलै 
अमाप बेहिशेबी संपत्तीप्रकरणी सध्या येथील मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या अण्णाद्रमुकच्या (अम्मा गट) सरचिटणीस शशिकला यांना कारागृहात मिळत असलेल्या व्हीव्हीआयपी वागणुकीचा पर्दाफाश करणार्‍या महिला पोलिस अधिकारी डी. रूपा यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांची बदली करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कारागृहातील इतका मोठा भ्रष्टाचार उघड केल्यानंतर सरकार रूपा यांचे कौतुक करेल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. पण, तसे न करता सरकारने त्यांच्या हातात बदलीचे पत्र ठेवले. रूपा यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांना कोणतीही माहिती किंवा पूर्वसूचना न देता प्रसारमध्यांमध्ये माहिती उघड करण्याचा ठपका रूपा यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकारी कारागृहात बेकायदेशीर गोष्टी करण्यास परवानगी देत असतात आणि पैसे घेऊन राजकारणातील कैद्यांना व्हीआयपी वागणक उपलब्ध करतात, असा खुलासा त्यांनी केला होता.
शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र कक्ष देण्यात आला आहे. तसेच, स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यालाही विशेष सुविधा मिळत असल्याचा खुलासा रूपा यांनी केला होता. त्यांनी यासंबंधी पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांना तसेच कारागृह पोलिस महासंचालक सत्यनारायण राव यांना पत्र लिहिले होते. कर्नाटक सरकारलाही याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला होता.  (वृत्तसंस्था)