पाकमध्ये राजकीय हालचालींना वेग

0
258

पनामागेट खटल्याची सुनावणी सुरू
पुन्हा एकदा लष्करशाहीची शक्यता
इस्लामाबाद, १७ जुलै 
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि कुटुंबीयांच्या कथित भ्रष्टाचार आणि बेनामी मालमत्ता प्रकरणाची आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात पनामा पेपर्स प्रकरणात संयुक्त तपास पथकाद्वारे (जेआयटी) सादर चौकशी अहवालावर प्रामुख्याने युक्तिवाद झाला.
या अहवालानुसार, १९९२-९३ मध्ये शरीफ कुटुंबीय आणि शरीफांची कन्या मरियम हिची मालमत्ता अचानक २१ पटीने वाढली. शरीफ कुटुंबीयांच्या वकिलांनी त्या विरोधात युक्तिवाद केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी एका दिवसासाठी तहकूब करण्यात आली. मात्र, या गोंधळात पाकिस्तानचे लष्करच सत्ता काबिज करण्यासाठी शरीफ कुटुंबीयांच्या विरोधात षडयंत्र करत असल्याची चर्चा आहे. वाढते आरोप पाहता लष्कराला माध्यमांसमोर येऊन यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि कुटुंबीयांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि बेनामी मालमत्तेचे आरोप सिद्ध झाल्यास शरीफांचे पद जाऊ शकते. अशात पाकिस्तानचे लष्करप्रमुख अर्ध्या रात्रीत सत्ता काबिज करून लष्करशाही लागू करू शकतात, अशी भीती सुद्धा वर्तवली जात आहे. राजकीय अस्थैर्याचा फायदा घेत यापूर्वी अनेकदा पाकिस्तानच्या तत्कालीन लष्करप्रमुखाने देशाची सत्ता हातात घेऊन हुकूमशाही सरकार चालविल्याचे उदाहरण आहे. त्यातच पाकिस्तानच्या लष्कराने माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान शरीफ किंवा सरकार विरोधात लष्कर काही षडयंत्र रचत आहे का, या प्रश्‍नाचे उत्तरसुद्धा देणे मला महत्त्वाचे वाटत नाही, असे पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफुर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. लष्कराकडून शरीफ सरकारला अस्थिर करण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही आहे, असेही ते पुढे म्हणाले.  (वृत्तसंस्था)