निसर्ग व मानव

0
101

दर्पण
बरेच दिवसांनी माझा मित्र कुमार घरी आला. मी झाडांना पाणी घालत होतो. बगीचा बघून तो आनंदला व म्हणाला, अरे! आत्ता आम्ही सुंदर निसर्गदर्शन करून आलो. मी त्याला विचारले, कुठे गेला होतास? तो म्हणाला, आम्ही आत्ताच लेह-लडाख व त्यालाच जोडून काश्मीरची ट्रीप करून आलो. त्यामुळे आमचे भारत दर्शन पूर्ण झाले. मी त्याला म्हटले, अरे!, वा!, तुझा भारत दर्शनाचा अनुभव कसा काय? तो तात्काळ उत्तरला, मला सर्व ठिकाणी निसर्गाने भुरळ पाडली. वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळा निसर्ग. मनाला मोहविणारा. कुठे हिरवेगार पर्वत-दर्‍या तर कोठे बर्फाच्छादित पर्वत, डोंगर, दुथडी भरून वाहणार्‍या नद्या, त्यांच्या पाण्याचे रंग वेगळे, डोंगर-दर्‍यातील विविध प्रकारचे वृक्ष, झरे, धबधबे, जंगले, विविध प्रकारचे पशु-पक्षी, विस्तीर्ण जमीन, पठारे, विविध रंगी फुले-पाने इ. असा मनाला मोहविणारा निसर्ग. असे तो वर्णन करून सांगत असताना माझ्यासमोर निसर्गाचे रूप आले आणि माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले-
निसर्गा केलीस तू ही कमाल, पांघरूण आपली ही सुंदर शाल, बघता रंग शालीचे दिसती अनेक, करिता तुलना वाटे सरस एकाहून एक, पाहता भरुनी डोळे, मनी उडे गुलाल, किती सुंदर हा समुद्र किनारा, देती साथ येथे, लाटा अन् धुंद वारा, हिरवी झाडे अन् निळे-निळे पाणी, करी मन हिरवे, सुख नयनी आणी, पाहता रूप तुझे होई जीवन सफल|
नंतर, मनात आले, निसर्गाचा मानवाशी जवळचा व वेगवेगळ्या स्वरूपाचा संबंध असतो. आपण कधी त्याचे सुखद, आनंदमय तर कधी रौद्र स्वरूप अनुभवतो. उत्तराखंड, काश्मीरमधील निसर्गाने केलेला कहर अनेकांनी टी.व्ही., वर्तमानपत्रे या माध्यमांद्वारे वा काहींनी प्रत्यक्ष अनुभवला असेल. वास्तविक जमीन, जंगल, पाणी, शुद्ध हवा, पशु-पक्षी यांचे मनुष्याच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची एकमेकांना पूरकता असली पाहिजे. पण, मनुष्य निसर्गाशी कसा वागतो? अनेक कारणांमुळे तो निसर्गाचे शोषण करतो. तसेच कधी कधी तो संवर्धन व संरक्षणही करताना दिसतो.
शेजारचे काका-काकू बाहेरगावी गेले असता, लगतच्या घरातील एका मुलाने झाड कापणार्‍याला बोलावून ४० वर्षे जुने झाड कापले. आजूबाजूच्या लोकांनी विचारले असता, या झाडाचा पालापाचोळा आमच्या अंगणात पडतो म्हणून कापले. कुणीतरी महापालिका व पोलिसात तक्रार केली. पोलिस आले व त्या मुलाला पकडून नेले. त्या मुलाला घरच्यांनी वृक्षाचे महत्त्व सांगितले नसल्याने हे घडले.
वृक्षांचे मानवावर अनेक उपकार आहेत. वृक्ष हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक संतांनीही आपल्याला वृक्षांकडून शिकण्यासारखे आहे, असे सांगितले आहे, तर संत तुकाराम महाराजांनी वृक्षांना आपले नातलग मानले आहे. ते म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. जर आपल्याला पर्यावरणाचे संतुलन साधायचे असेल तर झाडे जगविणे, नवीन झाडे लावणे गरजेचे आहे. विकासासाठी झाडे, जंगले तोडली जातात, पण त्याच वेळी वृक्षारोपण, वृक्षसंरक्षण व वृक्षसंवर्धनाचा प्रयत्न केला पाहिजे तरच पर्यावरणाचे संतुलन साधेल. सरकारने तशी मोहीम हाती घेतली आहे
पण संवर्धन व संरक्षणाची जबाबदारीही उचलली पाहिजे. झाडे जगली पाहिजेत.
वृक्षांप्रमाणे पाणी हीदेखील नैसर्गिक बाब व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाची आहे. पाणी हेच जीवन म्हटले जाते. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पाण्याच्या अभावाचे व प्रभावाचे परिणाम वेगवेगळे दिसतात. शेतकर्‍यांसाठी तर पाणी नेहमीच आवश्यक असते. पण, योग्य वेळी योग्य प्रमाणात शेतीला पाणी मिळाले तरच शेतीतून उत्पादन घेता येईल. पावसाचा अंदाज करणेच मानवाच्या हाती आहे. त्याची कृपा कधी व कशी होईल हे सांगता येत नाही. त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. पाण्याचे संग्रहण, वितरण याची ग्रामीण व शहरी क्षेत्रात व्यवस्था केली जाते. पण, त्यातही काही व्यक्तींच्या वृत्तीमुळे असंतुलन निर्माण होते. यासाठी करावे लागणारे प्रयत्न करताना वर्तमान व भविष्याच्या आवश्यकतेचा विचार केला पाहिजे.
मानवाला निसर्गदत्त प्राप्त बाबींमध्ये जमीनही आहे. जमिनीवरून समाजात संघर्ष होतो. जमिनीचाही उपयोग मानवाला वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. पण, जमिनीची उपयुक्तता टिकवून ठेवण्याची जबाबदारी मनुष्याची आहे. अन्नधान्य, निवास इ. अनेक गरजांसाठी या घटकांचे योग्य संवर्धन केले पाहिजे.
निसर्गाचे सौंदर्य टिकविणे, त्याचे संरक्षण करणे, त्याचे संवर्धन करणे मनुष्याचे कर्तव्य आहे. त्यासाठीच अलीकडच्या काळात व्यक्ती व संस्था स्तरावर प्रयत्न होत असल्याचे दिसते. एका कार्यक्रमाला गेलो असताना तिथे अध्यक्ष व वक्ता यांचे स्वागत तुळशीची रोपे देऊन केले. एका विवाह प्रसंगी यजमानांनी सर्वांना विविध प्रकारच्या झाडांची रोपे देऊन स्वागत केले. ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.
काही दिवसांपूर्वी फुटाळा तलावाचे सुंदर छायाचित्र वर्तमानपत्रात पाहिले. पण हाच तलाव गणेश विसर्जनानंतर कसा दिसतो हे तुम्हाला माहिती आहेच. तेथेही स्वयंसेवक निर्माल्य गोळा करण्यासाठी तयार असतात पण…, नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तरच निसर्गाचे सौंदर्य टिकेल. माझे घर, माझा परिवार, माझी शाळा, माझे शहर, माझा देश जर सुंदर बघायचा असेल तर त्याची जबाबदारीदेखील माझीच आहे, ही भावना वाढीस लागली पाहिजे.
भालचंद्र देशपांडे
९८५०३१३३२९