कौतुक

0
71

प्रबोधन
प्रेम, वात्सल्य आणि कौतुक याचा एक सुंदर आविष्कार अनुभवाला आला, तो असा की, रेल्वेगाडीतून प्रवास करीत असताना एका छोट्याशा रेल्वेस्टेशनच्या फलाटावर गाडी काही वेळासाठी स्थिरावली आणि वेळ घालविण्यासाठी इकडेतिकडे बघत असताना लक्ष खिडकीबाहेरील दृश्याकडे गेले. ते दृश्य असं होतं की, फलाटावर कोपर्‍यातल्या जागेत, अस्ताव्यस्त आणि केसांच्या जटा झालेली, फाटकी आणि घाणेरडी साडी घातलेली भिकारीण, आपल्या काळ्या कुळकुळीत शेंबड्या पोराला दुधासाठी पदराआड घेण्यापूर्वी त्याचे प्रेमाने मुके घेत होती, त्याला लाडवीत होती आणि विशेष म्हणजे त्या मुलाच्या गालावर काळी तीट स्पष्टपणे दिसत होती. हे वात्सल्य, प्रेम आणि आपल्या पोटच्या गोळ्याचं कौतुक, मग ते सुस्वरूप असो की नसो, स्वच्छ असो की नसो, राजबिंडा दिसो की न दिसो, केवळ त्या मातेच्याच ठायी निर्माण होत असते. या प्रेमाची, वात्सल्याची आणि कौतुकाची सर इतर कुठल्याही प्रसंगातील दृश्यांना येणे केवळ आणि केवळ अशक्यच आहे.
आपल्यापैकी प्रत्येकच जणाने आपल्या आईच्या या स्वाभाविक स्वभावाचा आनंद अनुभवलेला आहे आणि क्वचितच काही दुर्दैवी यापासून वंचित राहिलेले असावेत. हे प्रेम, हे वात्सल्य आणि हे कौतुक इतर कुणाकडूनही प्राप्त होणे अशक्यच आहे. आपल्या मातृहृदयाने केलेले आपले कौतुक हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि या कौतुकाची शिदोरी आयुष्याच्या पुरचुंडीत ठेवून समाधानाची प्रचीती आपण घेत असतो. या कौतुकामध्ये भेसळ नसते तर हे कौतुक निर्भेळ, स्वच्छ, निर्मळ आणि नि:स्वार्थ असते. या कौतुकानेच आपल्या प्रत्येक क्षणांचे संगोपन आणि संवर्धन होत असते. या कौतुकाची सवय आपल्याला पडते ती तेव्हापासूनच.
कौतुक हे अवाजवी, अवास्तव आणि अनैसर्गिक नसावे. कारण अशा कौतुकाने ती व्यक्ती शेफारण्याचा, वाईट प्रवृत्तीच्या आहारी जाण्याचा किंवा अविवेकी होण्याचा संभव जास्त असतो.खोटे आणि स्वार्थी कौतुक हे किती वाईट आणि धोक्याचे ठरते, याबद्दल एक गोष्ट सांगाविशी वाटते. अर्थात, ती बहुतेकांना माहितीही असेल. ती अशी की, एक मुलगा आपल्या आईला इतरांकडून चोरून आणलेल्या नवनवीन वस्तू आणून देत असतो. आपल्या मुलाने आपल्यासाठी आणलेल्या वस्तू, मग त्या चोरी करून का होईना, याचे त्या माउलीला भारीच कौतुक वाटते. आपल्या मुलाचे आपल्यावर प्रेम आहे त्यामुळे तो आपल्यासाठीच हे करतो आहे, या भावनेतूनच ती त्याच्या या वाईट कृत्याला समर्थन देत जाते. आणि एक दिवस जेव्हा तो मुलगा अट्‌टल गुन्हेगार होतो आणि त्याला शिक्षा होते, तेव्हा आपल्या या अवस्थेसाठी तो आपल्या आईला दोष देतो. हे जे घडले ते केवळ अविचारी, अविवेकी आणि स्वार्थभरल्या कौतुकामुळेच. त्यामुळे अशा कौतुकाचे समर्थन करणेही अयोग्यच.
सद्गुणाचे, सामर्थ्याचे, सद्विचारांचे आणि सद्वर्तनाचे कौतुक हे नकळतच होत असते. त्यासाठी कुणाचे शाब्दिक सहकार्य, संबोधन आणि प्रसिद्धी मिळविण्याची आवश्यकता नसते. सुयश मिळविणारा कौतुकास पात्र ठरत असतो. अभ्यासातील, खेळातील, कार्यातील नैपुण्याने त्या व्यक्तीची कीर्ती आणि कौतुक होते आणि अशा व्यक्ती अथवा व्यक्तिमत्त्वे समाजात आपल्या कर्तृत्वाने जग जिंकण्याचे ध्येय गाठत असतात.
कर्तृत्वाचा, कर्त्यव्याचा आणि कुशलतेचा आलेख जसजसा वर जात असतो, तसतसा कौतुकाचा आलेखही उंचावत जातो. जग अशांकडे कौतुकाने बघत असते, त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असते. अर्थात, कौतुकाचा वर्षाव झेलताना, त्यात चिंब भिजताना, त्या कौतुकाने फुगून न जाता आपले यश कितीही उत्तुंग असले, तरी आपले पाय मात्र जमिनीवरच राहतील, याची काळजीही अशा व्यक्तिमत्त्वाने घ्यावयाची असते. आज आलेले यश हे केवळ आपल्यामुळेच आलेले आहे, यासाठी केवळ आपणच केलेले कष्ट कारणीभूत आहेत, दुसरं कुणीही नाही, हे विचार एकदा का डोक्यात घुसले ना, की त्याचा पाचोळा होईल आणि आज आपले कौतुक करणारे आपल्यापासून केव्हा दूर निघून गेले, हे लक्षातही येणार नाही. विशेष म्हणजे आपल्या यशाबद्दल आपल्या सभोवतालच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करणे आणि एवढेच नव्हे, तर आपल्या पराजयाने खजील न होता आपल्या प्रतिस्पर्ध्याचे कौतुक केल्याने मिळणारा आनंद हा तेवढाच महत्त्वाचा आणि समाधान देणारा असतो, हे ध्यानात ठेवायला हवे.
– मधुसूदन (मदन) पुराणिक 
९४२००५४४४४