मोदींच्या परदेश यात्रा ः एक वास्तव

0
116

प्रासंगिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी देवदूतस्वरूप असून विश्‍वशांती, परस्परप्रेम, सलोखा, सद्भाव, सर्वांगीण प्रगती, विकास, दहशतवादाचे जगातून उच्चाटन… हे त्यांचे मिशन आहे. ‘सर्वे भवन्तु सुखिनः| सर्वे सन्तु निरामया’ यातच त्यांच्या विदेश दौर्‍यांचे मर्म, गमक अधोरेखित होत आहे. मोदींच्या ज्ञात व अज्ञात विदेश दौर्‍याचे कुतूहल, कौतुक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वत्र होत असतानाच, भारतातील विरोधकांना ते अनावश्यक वाटत आहे. त्यावर टीकाटिप्पणी होत आहे. ‘प्रवासी पंतप्रधान’ म्हणून संभावना होत आहे. जे कॉंग्रेसच्या सत्ताकाळात घडलं नाही ते मोदी करून दाखवीत आहेत. जो सन्मान आजपावेतो भारताला मिळाला नव्हता तो मोदींच्या परराष्ट्र धोरणात मिळत आहे. याचे शल्य विरोधकांना बोचत आहे. मोदींच्या प्रत्येक उक्ती व कृतीवर प्रहार, ही विरोधकांची मोदीविरोधातील विद्वेष व मानसिक विकृतीचे द्योतक आहे. धडाकेबाज, वर्चस्ववादी, आत्मकेंद्री, टोकाचे राष्ट्रवादी अशा अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन इत्यादी बड्या राष्ट्रांशी राजनैतिक संबंध ठेवण्यातच आजपावेतो भारताने धन्यता मानली होती.
नरेंद्र मोदींनी मात्र या बड्या राष्ट्रांशी सलोख्याचे, मित्रत्वाचे, विश्‍वासाचे संबंध निर्माण करून जगाला आजवर अज्ञात असलेल्या घनिष्ट मित्रांचा परिचय आपल्या झंझावाती परदेशी दौर्‍यांद्वारे करून दिला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेकदा विसंगतीला सकारात्मक दृष्टिकोनातून बघायचे असते; तर आंतरराष्ट्रीय व्यवहारात वैयक्तिक व वैचारिक मतभेद दूर ठेवून काम करावे लागते. या संकेताची जाण ठेवून मोदींनी अनेक छोट्या-छोट्या राष्ट्रांचे दौरे करून मित्रत्वाचे नातेसंबंध दृढ केले. जेथे नव्हते तेथे नव्याने प्रस्थापित केले. प्रत्येक देशाची संस्कृती भिन्नभिन्न असते. विकासाच्या संकल्पना व ते साधण्याचे तंत्र भौगोलिक आर्थिक उपलब्धतेनुसार वेगळे असते. विविध राष्ट्रांत पर्यटन केल्यामुळे त्या त्या देशातील संस्कृती, औद्योगिक-वैज्ञानिक विकास, त्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान यांचे आकलन करण्याची सुवर्णसंधी लाभते. ‘देश लहान कीर्ती महान’ असे अनेक राष्ट्र आहेत, ज्यांनी स्वबळावर लक्षणीय प्रगती केली आहे. स्वयंसिद्ध झाले आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावरील भौतिक विकास, सोयी-सुविधांचा सखोल अभ्यास करून भारतविकासासाठी त्याचा किती व कसा उपयोग करता येईल, आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी तांत्रिक, आर्थिक मदत मिळविता येईल, याचे चिंतन करण्यास वाटाघाटी करून त्या प्राप्त करून भारताचा विकास साधण्यास मदत होते. याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे मोदींची इस्रायल भेट! भारत व इस्रायल यांच्यासंबंधांना प्रदीर्घ इतिहास आहे. इंदिरा गांधींपासूनच्या सर्वच पंतप्रधानांच्या कारकीर्दीत इस्रायलबरोबर गाजावाजा न करता राजनैतिक, लष्करी, वैज्ञानिक, औद्योगिक पातळीवर व्यवहार होत राहिला. पण, या संबंधांना दृढ मैत्रीच्या बंधनात गुंफण्याचे काम कुणी केले नाही. त्यामुळे मोदींची इस्रायल भेट दोन्ही देशांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध घट्‌ट सलोख्याचे, मित्रत्वाचे, विश्‍वासाचे व आपुलकीचे करण्यास साहाय्यक ठरली. इस्रायलमध्ये पंतप्रधान मोदींचे उत्स्फूर्त भव्य स्वागत झाले. ‘‘भारत से आया मेरा दोस्त, दोस्त को शालोम (सलाम),’’ या भावपूर्ण शब्दांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोदींचे भावपूर्ण स्वागत केले. इतकेच नव्हे, तर मोदी आणि नेतान्याहू यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात दहशतवादाविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या ३-४ महिन्यांनी इस्रायल अस्तित्वात आले. आज इस्रायलने कृषी, वैज्ञानिक, औद्योगिक, सामरिक क्षेत्रात जी उत्तुंग प्रगती गाठली आहे, ती निश्‍चितच वाखाणण्यासारखी, कौतुकास्पद व अनुकरणीय आहे. आज इस्रायल स्वयंसिद्ध, आत्मनिर्भर असून दहशतवादापासून आपल्या सीमांचे संरक्षण करण्यात समर्थ व सक्षम आहे. भारतातील भाजपेतर सरकारांनी मुस्लिम मतदार दुखावू नयेत यासाठी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आणि इस्रायलची उपेक्षा केली, असा (गैर)समज दूर करण्यात मोदींच्या भेटीचा फार मोठा फायदा झाला आहे. इस्रायलचे जन्मापासून इस्लामी देशाशी वैर, तर भारताची इस्लाममुळेच फाळणी झाली. त्यामुळे मुस्लिम देशाच्या वेढ्यातील इस्रायल भारताकडे समदुःखी म्हणून पाहत आहे. त्या भावनेतूनच मान्यता नसतानाही इस्रायल भारताला मदत करीत आला आहे. मोदींच्या भेटीने इस्रायलमध्ये सकारात्मक विश्‍वास निर्माण झाला आहे. उभयतांमधील संबंध अधिक मित्रत्वाचे व दृढ झाले आहेत. ही या दौर्‍याची फार मोठी उपलब्धी आहे. याचा भारतीय सीमांच्या संरक्षणासाठी आज नाही तर उद्या उपयोग होऊ शकतो.
संपूर्ण जगाला भेडसावणार्‍या दहशतवादाविरोधात अनेक राष्ट्रांना एकत्र करण्यात नरेंद्र मोदींच्या परदेश दौर्‍याने बहुमोल कामगिरी केली आहे. आज अनेक राष्ट्र दहशतवादाविरोधात एकवटले आहेत. संघटित होऊन मुकाबला करण्याचा निर्धार करीत आहेत. योगाला यूएनओ व आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभर मान्यता प्राप्त करून देण्याचे श्रेय मोदींच्या दौर्‍यांनाच द्यावे लागेल. यामुळे निरोगी, स्वस्थ जीवन जगण्याचा बहुमोल संदेश सर्व जगभर गेला आहे. भारत हा कृषिप्रधान देश असला, तरी सर्वांच्या उपजीविकेचे ते साधन होऊ शकत नाही. भौतिक विकासाच्या स्पर्धेत बर्‍याच कृषी जमिनीचा र्‍हास झाला आहे. शेतीची उत्पादकता घटलेली आहे. शेती हा आतबट्‌ट्याचा व्यवसाय झाला आहे. शेतकरी सातत्याने आत्महत्या करीत आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे. अगदी लहानलहान राष्ट्रांनी वाळवंटात कमी पाण्यात शेतीचे आधुनिक तंत्र विकसित केले आहे. त्याचा अभ्यास करून भारतीय शेतीला ऊर्जितावस्था देण्याचे महान काम या परदेशी दौर्‍याच्या माध्यमातून होणे अभिप्रेत आहे.
३५ कोटी नवयुवक आज नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ‘हाताला काम, पोटाला दाम’ची आतुरतेने वाट बघत आहेत. त्यामुळे औद्योगिकीकरणास प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. मोदींच्या परदेश दौर्‍यामुळे भारतात निवेश येण्यास मदतच होणार आहे. बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविता येईल. आंतरराष्ट्रीय जगतात मोदींमुळे भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. प्रतिमा उजळली आहे. भारत हा विश्‍वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कधी नव्हे तो सन्मान आज भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळत आहे. मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वमान्य प्रभावी नेता म्हणून ओळख होत आहे. त्यामुळे केवळ हस्तांदोलन करून मैत्रीची औपचारिकता उरली नाही. आता आलिंगनाने सहजीवनात परावर्तित होत आहे.
आलिंगन हे प्रेमभाव, मैत्री व विश्‍वासाचे द्योतक आहे. वॉशिंग्टनमध्ये मोदी व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच इस्रायलमध्ये पंतप्रधान मोदी व पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची आलिंगने, गळाभेट हे भारतासाठी सन्मानाचेच नव्हे, तर दृढ मैत्रीचे, सहकार्याचे द्योतक आहे. बड्या राष्ट्राचे बोट धरून चालण्याचे दिवस आता गेले आहेत. भारताच्या विचारांना, शब्दांना वजन आले आहे. मोदींच्या परदेशवारीमुळे विकसनशील, भ्रष्टाचारमुक्त नवीन भारताची ओळख जगाला होत आहे. प्रगत राष्ट्र भारताकडे आकृष्ट होत आहेत. मदतीचा हात पुढे करीत आहेत. ही सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपलब्धी मोदींच्या यशस्वी परदेशगमनाची फलश्रुती आहे. विरोधकांनी विफल टीका करून संकुचित मनोवृत्तीचे राजकारण करू नये, मोदींचा अभिमान बाळगावा, यातच देशाचे हित सामावलेले आहे.
दिगंबर शं. पांडे 
९४०३३४३२३९