असा मी असामी!

0
69

शतश्‍लोकी
नो देहो नेन्द्रियाणि क्षरमतिचपलं नो मनो नैव बुद्धि:|
प्राणो नैवाहमस्मीत्यखिलजडमिदं वस्तुजातं कथं स्याम्‌|
नाहंकारो नदारा गृहसुतसुजनक्षेत्रवित्तादि दूरं|
साक्षी चित्प्रत्यगात्मा निखिलजगदधिष्ठान भूत: शिवोऽहम्‌॥
मी स्थूल देह नाही, इंद्रियेही नाही, नाशवंत आणि अत्यंत चंचल मनही नाही आणि बुद्धीही नाही. मी प्राणही नाही, तर मग या (जड जगतातील) जड वस्तूंचा समुदाय कसा असणार? ना मी अहंकार आहे, ना पत्नी, ना घर, ना पुत्र, ना शेत, ना पैसा या सगळ्यांपासून दूर (अर्थात वेगळा असा) साक्षी, चिन्मय, प्रत्यगात्मा, या सकलजगाचा अधिष्ठान असा मी शिवस्वरूप आहे.
श्रीगुरुकृपादृष्टीने सकल भ्रम, उपाधीने रहित झालेला जीवन्मुुक्त निजानंद धामात शांत राहतो. अशा अवस्थेत त्या जीवन्मुक्ताची अंतरंग अवस्था नेमकी कशी असते? वृत्ती तर पूर्ण निमालेल्या असतात. आता मिळवायचे तर काहीच नसते. इच्छा नाही, अपेक्षा नाही, आकांक्षा नाही, हे सर्व तर स्पष्टच आहे. पण, तरी अंतरी चैतन्य आहे म्हटल्यावर त्याला अस्तित्वाची जाणीव तर असणारच आहे. समाधिदशेत मनोबुद्धी विलयकारी अवस्थेत असेल तेव्हा ठीक आहे की, कशाचेच भान नसेल. पण, प्रारब्धवशातील जागृतीत असेल तेव्हा त्यांच्या अंतरी जाणीव कशी असेल? वृत्ती भलेही नसतील, त्या अवस्थेत जाणीव कशी असेल? याचे निरूपण पू. आचार्यश्री येथे करीत आहेत.
थोड्या वेगळ्या शब्दांत सांगायचे तर हे एखाद्या जीवन्मुक्ताचे एकश्लोकी आत्मचरित्र आहे. या ‘असण्याची’ अद्भुतरम्यता अशी आहे की, त्यात काय आहे, हे सांगण्यापेक्षा ‘काय नाही’ हेच सांगितले जात आहे.
सहज थोडा विचार करा. पू. आचार्यश्री किंवा सगळ्याच ग्रंथातील सगळेच जीवन्मुुक्त स्वत:चे वा जे कोणी अशा जीवन्मुुक्ताचे वर्णन का करीत असावेत? मी कसा आहे हे शेवटी अगदी एकाच शब्दात- ‘शिवोऽहम्‌|’
मात्र ‘नाही’ची यादी पाहा केवढी मोठी आहे. मी देह नाही, इंद्रिय नाही, मन नाही, बुद्धी नाही, जड स्वरूपातील काहीही नाही, अहंकार नाही, बायको नाही, पुत्र नाही, नातेवाईक नाहीत, शेत नाही, पैसा नाही इ. इ. इ. अबब! केवढी सूची. त्यातही जमेल तेवढेच घेतले अन्यथा जगातील प्रत्येकच पदार्थ या सूचित घेता येईल. पण हे असे वर्णन का? हा खरा मूलभूत प्रश्‍न आहे.
तर या विवेचनाचे एकमेव कारण हेच आहे की, हे विवेचन त्या जीवन्मुुक्ताकरिता थोडेच आहे, विवेचन तर आपल्यासारख्या वाचकांसाठी आहे ना? त्यामुळे त्या दिव्यतम अवस्थेचे ‘काय आहे’ हे वर्णन करणे म्हणजे आंधळ्यासमोर निसर्गदृश्याचे तासभर वर्णन करण्यासारखे निरर्थक नाही का?
याच कारणाने जे जे आपल्या आयुष्यात आपल्याला ज्ञात आहे आणि ज्या ज्या पदार्थांच्या योगे आपण दु:ख भोगीत आहे, त्या सगळ्याच्या पारची अवस्था सांगण्यात ती कशी आहे, हे सांगण्यापेक्षा ती अवस्था आपल्यासारखी दु:खाची नाही, हे सांगणेच अधिक उपयुक्त आहे. कारण सगळ्या ग्रंथरचनेचा उद्देश आपल्या समान वाचकांना प्रेरित करणे हा आहे. त्याकरिता हे असे नकारात्मक, त्यागात्मक वर्णन आहे.
त्यागात्मक म्हणण्याची कारणमीमांसा ही की, या सगळ्यांचा त्याग केल्याशिवाय ती ‘आहे’वाली अवस्था मिळणारच नाही. या सगळ्याठायी गुंतलेली वृत्ती जोवर तिथेच असेल तोवर वृत्तीरहित अवस्था मिळेल कशी? या सगळ्या आसक्ती स्थानांचा माझ्याशी संबंध नाही. हे मी नाही म्हटल्यावरच मी काय आहे, हे कळू शकेल.
या सगळ्याच्या त्यागानंतर उरते ती आहे स्वरूप अवस्था. हे सगळे नाही याचा साक्षी, चिन्मय, प्रत्यगात्मा ‘तो शिव मी आहे’ हेच आहे ‘आहे’स्वरूप आत्मकथन.
प्रा. स्वानंद गजानन पुंड