सुरक्षित मातृत्व केव्हा?

0
66

वेध
गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा आणि योग्य पोषण, हाच सुरक्षित मातृत्वाचा मुख्य आधार आहे. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. एका अंदाजानुसार, भारतात एक लाख प्रसूतींमागे ४०७ घटनांमध्ये मातांना मृत्यूला कवटाळावे लागते. अर्थात, गेल्या काही वर्षांत परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे आणि सुरक्षित मातृत्वाच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे; परंतु तरीही मातांची सुरक्षितता आणि आरोग्य याबाबतीत भारत विकसित देशांपेक्षा खूपच मागे आहे. एवढेच नव्हे, तर नेपाळ आणि बांगलादेश यांसारख्या आपल्यापेक्षा कमी विकसित देशांमधील आकडेवारीही आपल्यापेक्षा अधिक उजवी ठरते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, २०१३ मध्ये प्रसूती आणि गर्भधारणेतील गुंतागुंत या कारणास्तव जगभरात सुमारे पावणेतीन लाख महिलांना जीव गमवावा लागला. यातील एकतृतीयांश मृत्यू नायजेरिया आणि भारतात झाले. गर्भावस्थेशी संबंधित गुंतागुंतीच्या कारणांमुळे दरवर्षी भारतात मृत्युमुखी पडणार्‍या महिलांची संख्या सुमारे एक लाख इतकी प्रचंड आहे. प्रसूती आणि गर्भधारणा यांच्याशी संबंधित एवढ्या अडचणी आपल्या देशात जाणवतात की, केवळ बाळाला जन्म देतानाच महिलांचे मृत्यू होतात असे नव्हे, तर गर्भधारणेनंतर योग्य पोषण, आरोग्यसुविधा, योग्य सल्ला आणि लसीकरण नशिबी नसल्यामुळेही अनेक महिलांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळेच रुग्णालयात प्रसूती आणि जननी सुरक्षा योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न सरकार प्रदीर्घ काळापासून करीत आहे; परंतु प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी योग्य वाहतूक साधने आपल्याकडे बर्‍याच भागांत उपलब्ध नसतात. त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्याप्रती जाणीवजागृतीही खेडोपाडी फारशी नाही. सुरक्षित प्रसूती आणि आरोग्यपूर्ण मातृत्वाच्या मार्गातील हे मोठे अडसर आहेत. त्यामुळेच मातृत्वाच्या काळात महिलांना केवळ अर्थसाह्य देण्याबरोबरच त्यांना शिक्षित करायला हवे. जागरूक करायला हवे. आपल्याकडील असंघटित क्षेत्रात महिला मजुरांची संख्या प्रचंड मोठी आहे. या महिला सुरक्षित मातृत्वासाठी सरकारतर्फे राबविण्यात येणार्‍या योजनांपासून अनभिज्ञ आहेत. मातृत्व लाभ अधिनियम (१९६१) अस्तित्वात असूनही, महिलांच्या एका मोठ्या वर्गापर्यंत या अधिनियमाची माहितीसुद्धा अद्याप पोहोचू शकलेली नाही. रुग्णालयातील प्रसूतींच्या संख्येत वाढ करणे, हा प्रसूतिकाळातील आणि प्रसूतिदरम्यानचे मृत्यू टाळण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे.
पुन्हा एकदा इसिस!
आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे नाव घेताक्षणी ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया’ (इसिस) हे नाव अपरिहार्यपणे समोर येते! बड्या देशांनी या संघटनेला आपापल्या सोयीनुसार आणि सोयीपुरताच विरोध केला. या सार्‍याचा गंभीर परिणाम सीरियापाठोपाठ इराकमध्ये पाहायला मिळाला. दहशतवाद हा एक भस्मासुर असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक प्रगत देशांनी कळत-नकळत त्याला खतपाणी घालून वाढविल्याचे इतिहास सांगतो. परंतु, दहशतवादाने एकदा अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले की, तो आटोक्यात येत नाही आणि आपलेही घर जळू शकतेे, हे दहशतवाद पोसणार्‍यांनाही आता कळू लागले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इराकमधील मोसूल शहरात या संघटनेला नामोहरम करण्यासाठी इराकी फौजा लढत आहेत. बरेच दिवस युद्ध खेळून आणि मोठी किंमत मोजून मोसूलमधून इसिसच्या दहशतवाद्यांना पिटाळण्यात इराकी फौजांना नुकतेच यश मिळाले आहे. या घटनेचा विजयोत्सव इराकमध्ये साजरा केला जात असला, तरी संपूर्ण जगाच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी आहे. जगभरातील दहशतवादाचा केंद्रबिंदू बनलेल्या इसिसचे स्वरूप दिवसेंदिवस उग्र बनत गेल्याचे जगाने पाहिले आहे. मोसूल हे इराकमधील एक ऐतिहासिक शहर असून, २०१४ च्या जून महिन्यात इसिसने या शहराचा ताबा घेतला होता. संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल् बगदादी याने जगभरातील मुस्लिमांना आपल्या झेंड्याखाली येण्याचे आवाहन करून इस्लामिक राज्याची घोषणाही केली होती. मुस्लिमांनी आपापल्या देशातील सरकारविरुद्ध बंड करावे, असेही आवाहन तो वारंवार करीत राहिला. आपल्याला मुस्लिमांचे राज्य म्हणजेच इस्लामिक स्टेट निर्माण करण्याच्या कार्याचा प्रमुख म्हणून त्याने घोषित केले होते.  त्याच्या आवाहनांनी भारून अनेक तरुण इसिसमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असल्याचे देशोदेशी दिसून आले आहे. बगदादी मोसूलमध्ये बसून सगळी सूत्रे हलवीत असतानाच इराकी सैन्याने कुर्द लढवय्ये, सुन्नी अरब कबाईली लढवय्ये आणि शिया बंडखोरांना सोबत घेऊन मोसूलवर चढाई केली. मोसूल शहर इसिसपासून मुक्त करण्याची निर्णायक लढाई सुरू झाली आणि अमेरिकेच्या वायुदलाने इराकी फौजांना मदत सुरू केली. इराकचे पंतप्रधान अल् अबादी यांनी मोसूल शहर इसिसपासून मुक्त करण्यात आल्याची घोषणा नुकतीच केली आणि जगभरात अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. अर्थात, या विजयामुळे इसिसचा आणि दहशतवादाचा अंत झाल्याचे समजून लगेच आनंदोत्सव साजरा करण्याची परवानगी इतिहास आपल्याला देत नाही. मूळ मुद्दा असा आहे की, ज्या परिस्थितीतून इसिसचा जन्म झाला, ती अजून कायमच आहे. २००३ मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला चढविला तेव्हा या शियाबहुल देशात सुन्नी सरकार अस्तित्वात होते. सद्दाम हुसेन यांना सत्तेवरून खेचल्यानंतर तिथे शिया शासकांनी कारभार हाती घेतला. सीरियामध्येही शिया अलावी पंथाचे शासन आहे. परंतु, इराकपासून सीरियापर्यंत किमान अडीच कोटी सुन्नी मुस्लिम वास्तव्यास आहेत.
अभिजित वर्तक 
९४२२९२३२०१