अमरनाथ यात्रा आणि देशापुढील आव्हाने…

0
92

कटाक्ष
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या पर्वतराजींमध्ये एका गुहेत, जिथे श्रीशिवशंकरांनी माता पार्वतीला अमरत्वाची कथा सांगितली होती, त्याच गुहेत गेल्या कित्येक वर्षांपासून, बर्फाचे शिवलिंग (बाबा बर्फानी) तयार होते आहे आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक तिथे जात आहेत. या गुहेला ‘अमरनाथ’ असे नाव पडले आहे आणि अमरनाथला जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेण्याची पंरपरा बनली आहे. या दर्शनमोहिमेला यात्राच म्हटले जाते. कारण, शिवभक्त एवढ्या मोठ्या संख्येत या ठिकाणी येतात, की त्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते! यात्रा सुरू होण्याच्या चार दिवस आधीच मी काश्मीरला गेलो होतो. या यात्रेसंबंधी तिथे जी माहिती मिळाली, ती ऐकून थोडे आश्‍चर्यच वाटले. कारणही तसेच होते. अमरनाथच्या गुहेत जिथे बर्फाचे शिवलिंग तयार होते, त्याची माहिती सर्वप्रथम एका मुस्लिम दाम्पत्यानेच हिंदू बांधवांना दिली, असा दावा अनेकांनी केला. या दाव्यातील तथ्य मला माहिती नाही. पण, काश्मीरभेटीत अनेकांनी तसा दावा केल्याने आश्‍चर्य वाटणे स्वाभाविक आहे.
दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अमरनाथची यात्रा भरते. लाखो भाविक देशभरातून जम्मूला येतात अन् तिथे नोंदणी केल्यानंतर बालटाल किंवा पहलगाममार्गे अमरनाथ गुहेकडे रवाना होतात. २०११ साली तर तब्बल ६ लाख ४० हजार भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले होते. पण, त्यानंतर यात्रकरूंची संख्या कमी कमी होत गेली. अमरनाथच्या पवित्र गुहेकडे जाण्याचा मार्ग हा अतिशय खडतर आहे. प्रवास सोपा नाही. ही यात्रा पूर्णपणे हिंदू धार्मिक परंपरेनुसारच होते. असे असले तरी यात्रेचे स्वरूप हे सर्वसमावेशी असे आहे.
यात्रेकरू जरी हिंदू असले, तरी या यात्रेकरूंना स्वत:च्या खांद्यावरून आणि घोड्यावर बसवून सुरक्षितपणे बाबा बर्फानीपर्यंत घेऊन जाणारे काश्मिरी मुस्लिम बांधव आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. ही यात्रा म्हणजे एक आव्हानच असते. पण, हे आव्हान पेलण्यासाठी काश्मिरी बांधव सज्ज असतात. यंदाही सुमारे चार लाख काश्मिरी बांधव यात्रेकरूंच्या सेवेसाठी सज्ज आहेत. यंदा यात्रा अर्ध्यापेक्षा जास्त आटोपली असताना परवा, रविवारी यात्रेकरूंची एक बस दरीत कोसळून जी दुर्घटना झाली ती दुर्दैवीच म्हटली पाहिजे. त्याआधी अतिरेक्यांनी यात्रेकरू असलेल्या बसवर गोळीबार करून सहा यात्रेकरूंना ठार केल्याने अमरनाथला जाणार्‍यांच्या मनात दहशत निर्माण झाली होती. यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी काश्मिरी बांधव सगळी व्यवस्था करतात, हेही खरे आहे. त्यांच्याही मनात भगवान शंकराप्रती श्रद्धाभाव निर्माण झाला आहे. पुण्य तर आम्हालाही मिळते, असे ते म्हणतात. आणखी एक गोष्ट अशी की, या यात्रेमुळे काश्मिरी बांधवांच्या रोजीरोटीची सोय होते. यात्रेसाठी लाखो भाविक येत असल्याने जुलै-ऑगस्ट या दोनच महिन्यांमध्ये असंख्य काश्मिरी बांधवांच्या वर्षभराच्या उपजीविकेची सोय होते, असे जे म्हटले जाते, तेही खरेच. ही यात्रा तिथल्या पर्यटन अर्थव्यवस्थेचे एक अविभाज्य अंग आहे. यात्रेसाठी जम्मूहून रस्त्याने मोठे अंतर पार करावे लागते. मग, पहलगाम (चंदनबाडी) वा बालटाल इथे मुक्काम करावा लागतो. त्यानंतर पवित्र अमरनाथ यात्रा प्रारंभ होते. परंतु, ही यात्रा होऊ नये आणि गुण्यागोविंदाने नांदणार्‍या हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडावी, या दुष्ट हेतूने पाकिस्तानने गेल्या अनेक वर्षांपासून घातपाती कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या २८-३० वर्षांपासून पाकिस्तानने जे छुपे युद्ध पुकारले आहे, त्यामुळे दुर्दैवाने हिंदू-मुसलमान यांच्यात एक अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीर खोर्‍यातील शांततापूर्ण सहअस्तित्व पाकिस्तानला खुपत आहे. भारतात सहिष्णुता आहे आणि स्वभाव सर्वसमावेशी आहे, हेच पाकिस्तानला नको आहे. पाकिस्तानची स्वत:ची संस्कृती ही केवळ आणि केवळ इस्लामवर आधारित आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद आणि दुष्प्रचार या माध्यमातून भारतात, विशेषत: काश्मीरमध्ये दोन समुदायांत वैर निर्माण कसे करता येईल, या दिशेनेच पाकिस्तानचे काम चाललेले आहे. पाकिस्तानचे हे खतरनाक इरादे मोडून काढण्याचे आव्हान भारत सरकारला आणि आपणा सर्वांनाच पेलायचे आहे. स्वत:चा स्वार्थ साध्य करण्यासाठीच पाकिस्तानकडून अमरनाथ यात्रेवर हल्ला करविला गेला. अमरनाथ यात्रा उधळून लावण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करीत असतो. पाकचा हा प्रयत्न यशस्वी होऊ नये यासाठी आपल्यालाच सतर्क राहावे लागणार आहे.
अमरनाथ यात्रेच्या मार्गात अनेक ठिकाणी भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली असते. सुरक्षा दलाचा तगडा पहाराही असतो. परंतु, पर्वतराजी असल्याने कुठून कधी अतिरेकी येईल आणि यात्रेकरूंना लक्ष्य बनवेल, याचा काही नमे नसतो. पाकप्रशिक्षित या अतिरेक्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा असतो. यंदा अमरनाथ यात्रेदरम्यान घातपात करण्याची पाकी अतिरेक्यांची योजना असल्याची माहिती गुप्तचर विभागाने आधीच दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. अतिरेक्यांकडून एखादे मोठे हत्याकांड घडवून आणले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. म्हणूनच यात्रा सुरू असेपर्यंत बारीरसारीक गोष्टींकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. २००० साली अतिरेक्यांनी यात्रेकरूंवर हल्ला केला होता. तेव्हा लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी पहलगाम येथील यात्रेकरूंच्या शिबिरावर अंदाधुंद गोळीबार केला होता. अनेक यात्रेकरू त्यात मारले गेले होते. २०१६ पासून भारतविरोधी शक्ती अधिक प्रबळ झाल्या आहेत आणि दहशतवादाच्या माध्यमातून भारतातील सर्वसमावेशकतेची परिस्थिती बदलवण्यासाठी हे लोक मोठे कटकारस्थान करीत आहेत.
आता, १० जुलैला अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर अतिरेक्यांनी जो हल्ला केला तो सुनियोजित होता, असे म्हणतात. ज्या बसला लक्ष्य करण्यात आले, त्या बसची नोंदणी झालेली नव्हती, ती बस सुरक्षा बंदोबस्तात नव्हती, असे जे सांगितले जात आहे, त्यापेक्षा वेगळी माहिती समोर आली आहे. त्यात तथ्य किती मला माहिती नाही. पण, ही बस बालटालवरून यात्रेकरूंना घेऊनच निघाली होती आणि या बसलाही सुरक्षा व्यवस्था होती. पण, या बसचा टायर पंक्चर झाल्याने ती मागे राहून गेली आणि पंक्चर दुरुस्त करून उशिरा निघाली. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला जी सुरक्षा व्यवस्था असते ती काढून घेण्यात आली होती. तसेही सकाळी सहा वाजता रस्त्यावर येऊन उभे राहणारे सशस्त्र जवान रात्री सात-साडेसातपर्यंतच ड्युटीवर तैनात असतात. हीच संधी साधून नेमका अतिरेक्यांनी डाव साधला आणि निष्पाप यात्रेकरूंचे जीव घेतले. आपण हल्ला केला तर यात्रेकरूंमध्ये दहशत निर्माण होईल, यात्रा स्थगित केली जाईल, वातावरण तणावपूर्ण होईल अन् हिंदुस्थानात जो संदेश जाईल, त्यामुळे आपला हेतू साध्य होईल, असा पाकिस्तानचा होरा होता. पण, ना यात्रेकरू घाबरले ना यात्रा स्थगित झाली. यात्रा सध्या अधिक उत्साहात सुरू आहे आणि सुरू राहील, यात शंका नाही. असे असले तरी पावलोपावली सतर्कता बाळगणे आवश्यकच आहे.
हिंसाचार करून संपूर्ण भारताचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पाकिस्तानी अतिरेकी कुठल्याही थराला जाऊ शकतात. कुठल्याही प्रकारचे क्रौर्य ते करू शकतात. नि:शस्त्र पोलिस, सुटीवर असलेले लष्करातील जवान यांनाही अतिरेक्यांकडून लक्ष्य केले जात आहे. संपूर्ण भारतात दहशत पसरली पाहिजे, अशा प्रकारचे कृत्य करण्यासही अतिरेकी मागेपुढे पाहणार नाहीत. कारण, त्यांचा हेतू स्पष्ट आहे. अतिरेकी कशा प्रकारे हल्ला करू शकतात, याचा अंदाज सुरक्षा दलांनी घेणे क्रमप्राप्त आहे. आपल्या गुप्तचर संस्थांनाही अधिक सतर्क राहावे लागणार आहे. रस्त्यारस्त्यांवर उभे असलेले शस्त्रसज्ज जवान रात्री जेव्हा माघारी फिरतात, त्यानंतर रस्त्यांवरून प्रवासी वाहनं धावणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. नागरिकांनाही नियमांचे पालन करण्यास आणि कुठे काही गडबड दिसत असेल, तर ती बाब पोलिसांच्या लक्षात आणून देण्यास सांगितले पाहिजे. एक चांगले झाले, १० जुलै रोजी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण जम्मू-काश्मिरात निषेध झाला. वैमनस्य फैलावण्याचे अतिरेक्यांचे षडयंत्र असफल ठरले. काश्मीर खोर्‍यातील नागरिकांना त्यांचे हित कशात आहे, हे जर लक्षात आले तर प्रश्‍न जटिल होणार नाही. असे असले तरी पुढल्या काळात आपल्या सगळ्यांनाच अधिक सतर्क राहावे लागेल, हेच खरे…!
गजानन निमदेव