लग्न रद्द करून बेघरांना देणार मेजवानी

0
251

वॉशिंग्टन, १७ जुलै
भावी नवर्‍यासोबत ब्रेक अप झाल्यामुळे लग्न रद्द केलेल्या वधूने त्याच ठिकाणी बेघर लोकांना मेजवानी देण्याची घटना अमेरिकेत घडली. साराह कमिन्स असे या वधूचे नाव असून तिचे वय २५ वर्षे आहे. लोगान आरॉजो याच्याशी तिचे लग्न ठरले होते.
या दोघांनी मिळून त्यांच्या लग्नावर ३० हजार डॉलर्सचा खर्च केला होता. मात्र ऐन लग्नाच्या आठवडाभर आधी लोगान आणि तिच्यात मतभेद झाले. त्यामुळे त्यांचे लग्नही मोडले.
ही बातमी तिने आपल्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना कळविली. मात्र रिसेप्शनसाठी तिने ठरविलेल्या कॅटररने लग्नस्थळ किंवा जेवणाची बुकिंग रद्द करण्यास नकार दिला.
त्यामुळे त्या जेवणाचा आस्वाद दुसर्‍या लोकांना घेऊ देण्याचे तिने ठरविले. मी रडले, अनेकांना विनवणी केली आणि त्यानंतर एवढे सगळे अन्न फेकून देण्याची मला लाज वाटू लागली, असे तिने एका वृत्तपत्राला सांगितले.
त्यानंतर तिने इंडियानापोलिस आणि नोबल्सव्हिला भागातील बेघर लोकांना आमंत्रणे पाठविली. अद्याप ही पार्टी व्हायची आहे. ही मेजवानी लग्न जिथे होणार होते, त्याच जागी होणार आहे. मात्र तिथे भेटवस्तू, केक आणि वधूवरासाठीचे मुख्य मेज नसेल.(वृत्तसंस्था)