श्रीलंकेला अजून २१८ धावांची गरज

0
76

पहिल्या कसोटी विजयासाठी झिम्बाब्वे आसुसलेला
कोलंबो, १७ जुलै 
श्रीलंकेविरुद्ध आपला पहिल्या कसोटी विजयसाठी झिम्बाब्वे ७ गडी दूर आहे. प्रेमदासा स्टेडियम येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेने यजमान श्रीलंकेपुढे ३८८ धावांचे आव्हान ठेवले. चौथ्या दिवसअखेरीस श्रीलंकेने दुसर्‍या डावात ३ गडी गमावित १७० धावा काढल्या असून झिम्बाब्वेवर मात करण्यासाठी त्यांना अजून २१८ धावांची गरज आहे.
श्रीलंकेच्या हातात अजून सात गडी शिल्लक आहे. झिम्बाब्वेला आपला पहिला कसोटी विजय नोंदविण्यासाठी सात गडी झटपट बाद करणे अगत्याचे आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कुशल मेंडिस नाबाद ६०, तर माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज नाबाद १७ धावांवर खेळत होते. पहिल्या डावात पाच बळी टिपणारा झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रीम क्रीमर याने दुसर्‍या डावात ६७ धावात २ गडी बाद केले. तत्पूर्वी, सिकंदर रझाच्या पहिल्या कसोटी शतकाच्या बळावर झिम्बाब्वेने दुसर्‍या डावात ३७७ धावांचा डोंगर रचला. चौथ्या दिवशी झिम्बाब्वेने ६ बाद २५२ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली होती. रझाने १२७ धावांची शतकी खेळी केली व माल्कम वॉलरसोबत सातव्या गड्यासाठी १४४ धावांची दमदार भागीदारी केली. वॉलरने ६८ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेराथने ११६ धावा देत ६ बळी टिपले. (वृत्तसंस्था)