श्रीलंका दौर्‍यासाठी शिखर धवनची वर्णी

0
125

दुखापतग्रस्त मुरली विजय बाहेर
मुंबई, १७ जुलै 
श्रीलंकेच्या दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला धक्का बसला आहे. कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणारा सलामीवीर फलंदाज मुरली विजय दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडणार्‍या शिखर धवनची निवड करण्यात आली आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धची एकदिवसीय मालिका ३-१ ने जिंकल्यानंतर भारतीय संघ २६ जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध कसोटी, वनडे मालिका व एकमेव टी-२० क्रिकेट सामने खेळण्यासाठी जात आहे. अनिल कुंबळे सोबतचा करार संपल्यानंतर भारतीय संघ नव्या प्रशिक्षकासह श्रीलंका दौर्‍यावर जात आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी खेळण्यात येत असलेल्या सराव सामन्याच्यावेळी मुरली विजयच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी विजयला आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे मुरली विजयने श्रीलंका दौर्‍यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी शिखर धवनला संधी देण्यात आली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यासाठी १६ सदस्यांची निवड ९ जुलै रोजी करण्यात आली होती. यात के.एल. राहुल व रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले आहे. अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे. श्रीलंकेच्या दौर्‍यात भारतीय संघ तीन कसोटी, ५ वनडे व एक टी-२० सामना खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांसाठी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ व २२ जुलै रोजी हे सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील पहिली कसोटी २६ जुलैपासून कॅण्डी येथे, दुसरी कसोटी ३ ऑगस्टपासून गॅले, तर तिसरी व शेवटची कसोटी १२ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. २० ऑगस्टपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील एकमेव टी-२० सामना ६ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)