संजय गांधी खदान तलावाच्या जागेवर होणार हुडकेश्‍वर पोलिस ठाणे

0
70

– नागरिकांना जागा सोडण्याबाबत नोटीस
नागपूर, १७ जुलै
तलाव मानवनिर्मित असला तरी त्यात दरवर्षी परिसरातील नागरिक गणपती बाप्पाचे विसर्जन करीत. ही परंपरा जवळपास मागील २५ वर्षांपासून सुरू होती. मात्र आज त्या जागी हुडकेश्‍वर पोलिस ठाणे उभारले जात आहे. संजय गांधी खदान तलावाची ही व्यथा असून, त्या परिसरातील नागरिकांना दोन महिन्यांपूर्वी जागा सोडण्याबाबत प्रशासनाच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे. मात्र अन्यत्र पुनर्वसन केल्याशिवाय जागा सोडायची नाही, असा निर्धारही परिसरातील नागरिकांनी केला आहे.
पोलिस ठाणे उभारले जात असलेली जागा २५०० चौ. फू. आहे. जागा पडित असल्यामुळे प्रारंभी डबक्याचे स्वरूप आले होते. नंतर दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचू लागले आणि हळूहळू परिसराला छोट्या तलावाचे स्वरूप आले. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने लहानमोठ्या आजारांचाही प्रादुर्भाव होऊ लागला. पण बाप्पाच्या विसर्जनाची सोय होत असल्याने गेल्या २० वर्षांपासून नागरिकांनी समस्येकडे डोळेझाक केली. आज हा परिसर तलाव म्हणूनच ओळखला जातो.
जवळपास ३० ते ३५ घरे तलावाच्या चारही बाजूला तयार झाली आहेत. त्यामुळे नेहरूनगर झोपडपट्टी वसाहत असेही स्वरूप परिसराला मिळाले. आज येथे वीज व पिण्याच्या पाण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांकडून नागपूर महानगरपालिका रीतसर दरवर्षी संपत्ती कर देखील वसूल करीत आहे. यानंतरही आता अतिक्रमणधारक म्हणून घोषित करून नागरिकांना जागा सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
जुमडे या महिलेने सांगितले की, पोलिस ठाणे तयार होत आहे, ही चांगली बाब आहे. पण त्यासाठी आम्हाला जागा सोडण्यास सांगितले जात आहे, हे योग्य नाही. कारण पोलिस ठाण्यासाठी जागा आहेच. परिसरातीलच ज्येष्ठ नागरिक यशवंत गायकवाड म्हणाले, ऐन पावसाळ्यात घर सोडून जायचे कुठे? शिवाय आम्ही रीतसर कर भरतो. पोलिस ठाण्यासाठी पुरेशी जागा असताना आम्हाला येथून अन्यत्र जाण्यास सांगणे आमच्यावर अन्यायकारकच आहे.

आतापर्यंत १५०० ट्रक मुरूम भरला
हे तलावसदृश डबके २५०० चौ. फू. क्षेत्रात पसरले असून, जवळपास २० फूट खोल आहे. पोलिस ठाणे उभारण्याचे ठरल्यानंतर आतापर्यंत १५०० ट्रक्स मुरूम टाकून डबके बुजवण्यात आले आहे. शिवाय आता बारीक गिट्टी टाकण्यात येत असल्याची माहिती संबंधित जेसीबीधारकाने दिली.