उपराजधानीने पिछाडले राजधानीला 

0
80

-रेकॉर्ड तोड निकालगती
-९९ टक्के निकाल पंचेचाळीस दिवसांत
– ऑनस्क्रीन मूल्यांकन यशस्वी
नागपूर, १७ जुलै
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ऑनस्क्रीन मूल्यांकन चांगलेच यशस्वी ठरले आहे. कारण कधी नव्हे ते विद्यापीठाचे ९९ टक्के निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीतील मुंबई विद्यापीठात निकालावरून गोंधळ सुरू असताना, नागपूर विद्यापीठाच्या सुपरफास्ट मूल्यांकनाच्या गतीने अनेकांनी तोंडात बोटे घातली आहेत. मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाकडून नागपूर विद्यापीठाला त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी विचारणा केल्याचे कळते.
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचा पहिला टप्पा ७ मार्चपासून सुरू झाला. यात ११२ परीक्षा होत्या. यातील १११ निकाल ३० दिवसांच्या आत घोषित झाले. दरवर्षीची तुलना करता विद्यार्थ्यांना व पालकांना हा मोठा धक्काच होता. दुसर्‍या टप्प्याच्या परीक्षा २१ मार्चपासून सुरू झाल्यात. यात ३३२ परीक्षा होत्या. यातील  ३०९ निकाल ३० दिवसांत तर २१ निकाल ४५ दिवसांत लागले. १ निकाल ४५ दिवसांनंतर लागला. त्यानंतर ११  एप्रिल, २० एप्रिल, २८ एप्रिल अनुक्रमे तिसर्‍या, चौथ्या व पाचव्या टप्प्याच्या परीक्षा सुरू झाल्या. या टप्प्यामध्ये जवळपास ७५० परीक्षा पार पडल्या. यातील ४९० परीक्षांचे निकाल तीस दिवसांत लावण्यात आले. तर केवळ ७ निकालांना पंचेचाळीस दिवस लागले. या संपूर्ण सत्रात विद्यापीठातर्फे १२९४ परीक्षा घेण्यात आल्या. यात तब्बल ९१० अभ्यासक्रमांचे निकाल ३० दिवसांत जाहीर करण्यात विद्यापीठाने यश मिळविले आहे.
एकीकडे राजधानीच्या मुंबई विद्यापीठात निकालावरून गोंधळ माजला आहे.  उत्तरपत्रिका तपासणीचे काम रखडले आहे. राज्यपालांना या प्रकरणाची दखल घेणे भाग पडले. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या निकालाची चर्चा राज्यभर आहे. शैक्षणिक सत्र सुरू असताना येथे प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी जावे की महाविद्यालयात असा पेच पुढे आहे. मात्र उपराजधानीच्या नागपूर विद्यापीठाने निकालात बाजी मारली आहे. आतापर्यंत एकूण ९९ टक्के निकाल जाहीर झाले असून ३० जुलैपर्यंत १०० टक्के निकाल घोषित होतील, असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
निकालाची स्थितीवर्ष एकूण परीक्षा ३० दिवसांत निकाल ४५ दिवसांत  
२०१४   १०२० २६९ २७५
२०१५ ९७० ३३५ १२० २०१६ १०२५ ५२१ २४२
२०१७ १२९४ ९१० १७१

यावर्षीची जाहीर निकालाची स्थिती
टप्पा परीक्षा ३५ दिवसांत ४५ दिवसांत
७ मार्च ११२ १११ १
२१ मार्च ३३२ ३०९ २१
११ एप्रिल १३१ १०७ १९
२० एप्रिल ३९२ २०१ १०१
२८ एप्रिल ३२७ १८२ २९
एकूण परीक्षा : १२९४, जाहीर निकाल १०९२