‘ती’ वाघीण जंगलात परतणार

0
100

नागपूर, १७ जुलै
दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात नरभक्षक ठरलेल्या वाघिणीला सध्या नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटर येथे ठेवण्यात आले आहे. मात्र येत्या एक-दोन दिवसांत तिला परत जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती आज राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी दिली.
सदर वाघिणीला १० जुलैला नागपूर येथे आणून गोरेवाडात हलविले होते. या वाघिणीने ब्रह्मपुरी परिसरात दोन इसमांना ठार मारले होते तर काही जनावरेही तिचे भक्ष्य ठरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. नागरिकांनी या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी आंदोलनात्मक पवित्राही घेतला होता. अखेर तिला गोळी घालण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली व सुनावणीनंतर आदेश मागे घेण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यानंतर वाघिणीला जेरबंद करून नागपूरला आणण्यात आले.
मिश्रा यांनी सांगितले की, सदर वाघीण दोन वर्षांची असून, ती स्वतःचे क्षेत्र वाढविण्याइतपत सक्षम आहे. वाघिणीला जंगलात सोडायचे किंवा अन्यत्र कुठे हलवायचे याबाबत समिती नेमण्यात आली. समितीने अहवाल तयार केला असून, तो मिळताच निर्णय घेतला जाईल. तिला जंगलात सोडणे हाच उचित उपाय ठरेल. कारण पावसाळ्याचे दिवस असल्याने जंगलातील वृक्षवल्ली घनदाट आहे. या दिवसात वाघ, बिबट यांना शिकार करणे सोपी जाते. शिवाय ही वाघीण असल्याने तिला जंगलात सोडणेच अधिक योग्य राहील. तिला जंगलात सोडण्यापूर्वी रेडिओ कॉलरही लावला जाईल. जेणेकरून तिच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होईल. समितीचा अहवाल मिळताच त्यानुसार योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही मिश्रा यानी सांगितले.