पावसाचा लपंडाव संपला

0
129

– दमदार हजेरीने नागपूरकर सुखावले
नागपूर, १७ जुलै
गेल्या आठवडाभरापासून आभाळ दाटून येणे आणि नंतर स्वच्छ ऊन पडण्याचा लपंडाव सुरू होता. मात्र, सोमवारी सकाळपासूनच शहरात पावसाने दमदार हजेरी लावत नागपूरकरांना सुखावले. दुपारच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. पण, सायंकाळपासून कमी-जास्त प्रमाणात पावसाच्या सरी सुरूच आहेत.
शहराच्या बहुतांश भागात रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीची तारांबळ उडाली होती. रेनकोटची टोपी आणि त्यावर हेल्मेट असा जामानिमा केलेल्या नागरिकांसह चारचाकी गाड्यांची रस्त्यावर वर्दळ होती. सोमवार सकाळपासूनच आभाळ झाकोळून आल्याने अनेक जण तयारीत होते. पण, आभाळ रोजच येते असे म्हणून दुर्लक्ष करीत तयारीशिवाय घराबाहेर पडलेल्यांची मात्र पावसाने चांगलीच दैना केली. सकाळच्या सत्रात आलेल्या जोरदार सरींनंतर काही सखल भागांमध्ये पाणी साचले होते. पण, पावसाच्या विश्रांतीनंतर पाणी उतरले. १ जून ते १७ जुलैपर्यंतच्या कालावधीत सरासरी पर्जन्यवृष्टीत ३९ टक्के घट झाली आहे. यानंतरच्या काळात पावसाची नियमित हजेरी आवश्यक राहणार आहे.
सोमवारी नागपुरात ४२ टक्के अर्थात मध्यम ते जोरदार पर्जन्यवृष्टीसह २७ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सून नव्या जोमाने धडकला असून येत्या ४८ तासांत नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. एकूणच येत्या दोन दिवसांत नागपूरकरांना पावसापासून बचाव करावा लागणार आहे.