थकबाकीदारांच्या घरापुढे आज नगारावादन

0
120

-मनपा पदाधिकार्‍यांचा अभिनव उपक्रम
-टॉप टेनला देणार गुलाबपुष्प
नागपूर, १७ जुलै
वारंवार सूचना देऊनही शहरातील बड्या नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. या उन्मत्त थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी मनपाने अभिनव उपक्रम सुरू केला असून याचा शुभारंभ उद्या १८ जुलै रोजी होणार आहे. त्यात पाणी कर व मालमत्ता कराची थकबाकी असणार्‍या दहा धनाढ्यांच्या घरापुढे नगारावादन आणि बॅण्ड वाजवून त्यांना जागे करण्याचे काम करण्यात येणार आहे. शिवाय पदाधिकारी त्यांच्या घऱी जाऊन गुलाबपुष्प देऊन त्यांना नामोहरम करतील.
नागपूर मनपाचा ४३२ कोटींचा मालमत्ता व पाणी कर थकित आहे. या डिफॉल्टरची संख्या ३ लाख ७० हजाराच्या घरात आहे. या एकूण थकबाकीदारांनी मालमत्ताकरापोटी २७८ कोटी, तर पाणीकरापोटी १८० कोटी थकविले आहेत. यासाठी मनपातर्फे १७ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान अभय योजना राबविली आहे़ यात केवळ मूळ रक्कम भरावी लागेल़ दंड आणि व्याज माफ केले जाणार आहे़ यानंतर देखील थकबाकी उरल्यास ८ ऑगस्टपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे़ या लोकांना जागे करण्यासाठी आता महापालिका गांधीगिरी करणार असल्याची माहिती सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी दिली़
या उपक्रमात मनपाचे झोन सभापती, नगरसेवक, पदाधिकारी बॅण्ड आणि नगारे वाजवतील.
हा उपक्रम तासभर चालेल. यात लाऊडस्पीकर, बॅनर लावणे व गुलाबपुष्प देणे आदी उपक्रम राबविण्यात येतील.
थकबाकीदार
मालमत्ता कर थकबाकीदारांमध्ये सरकारजी की रसोई , कंट्री बाईड टूर ऍण्ड ट्रॅव्हल्स, प्रल्हाद पडोळे, विजय साखरकर, हरी भिसीकर व प्रमिला जैन, नागपूर हाऊ. कोहिनूर वायर ऍण्ड कोटिंग, डॉ. जुलेखा दौड यांचा आहे़ पाणी कर थकबाकीदारांमध्ये विठ्ठल भांगे, बिदलराम फुलसुंगे, श्रीधर राजगे, बिंदू तुरकेल, तानबा पाटील, एस. जी. हरदास विदर्भ पॅलेस, ललित पटेल, टिकमचंद मनकानी, मोहनसिंग पंजाबी यांचा समावेश आहे.
यात सर्वाधिक कर थकबाकी असणार्‍यांमध्ये एम्प्रेस मॉल प्रथम क्रमांकावर आहे. ३५ कोटी २३ लाखांची थकबाकी आहे. या प्रतिष्ठानापुढे मंगळवारी दुपारी १२ वा. नगारावादन होईल.
़येत्या ८ ऑगस्टनंतर उपायुक्त रवींद्र देवतळे मालमत्तेचा लिलाव करतील आणि पाणीपट्टीसाठी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यात आतापर्यंत ३५० थकबाकीदारांचे धनादेश अनादरीत झाले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.