बुडत्याचे पाय खोलात!

0
89

प्रासंगिक
नुकतेच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे मतदान आटोपले असून, एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा विजय नक्की आहे. लोकशाही असल्याने आपल्याकडे बारमाही निवडणुका चालूच असतात. गल्ली ते दिल्ली या निमित्ताने समाजमन ढवळून निघत असते. प्रत्येक निवडणुकीत जिंकण्यासाठी काही ठरावीक ताळेबंद ठरला असतो. अर्थातच, कोणताच राजकीय पक्ष याला अपवाद असण्याचे कारण नाही. तरीपण कमीतकमी जनभावना ओळखून उमेदवारी देण्याचे तारतम्य काही राजकीय पक्ष घेतील असे वाटत नाही.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कुणी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी दलित कार्ड खेळले गेले, यात वादच नाही. आता याचाच दुसरा अंक म्हणून उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत वापरून वापरून गुळगुळीत झालेले गांधी नाणे वापरण्यात येत आहे.
खरेतर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रथम उमेदवार जाहीर करून मोदींनी दिलेल्या धक्कातंत्रातून विरोधक नीट सावरले नसताना घाईघाईने कॉंग्रेसने महात्मा गांधीजींचे नातू गोपालकृष्ण गांधी यांची उमेदवारी परस्पर जाहीर करून टाकली. ७१ वर्षीय गोपालकृष्ण गांधी निवृत्त आयएएस अधिकारी (१९६८-१९९२) असून, २००४ ते २००९ पर्यंत त्यांनी प. बंगालचे राज्यपाल म्हणून कारभार पाहिलेला आहे. कॉंग्रेसने एवढा हायप्रोफाईल उमेदवार दिला असताना, शिवसेना आणि काही पक्षांनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. कारणही तसेच आहे आणि ते गंभीरही आहे. गोपालकृष्ण गांधींनी दहशतवादी याकुब मेननच्या सुटकेसाठी धडपड करणार्‍या कंपूत सामील होऊन जनतेचा रोष ओढवून घेतला होता. ‘राजनितीमे दाग अच्छे नही होते’चा हा प्रकार होता. या देशातील जनतेने आजपर्यंत भल्याभल्यांना माफ केले, परंतु देशद्रोही आणि त्यांच्या हमदर्दींना इथे अजीबात माफ केले जात नाही.
मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकुब अब्दुल रझ्झाक मेनन याला फासावर लटकवण्यापासून वाचवण्यासाठी काही बुद्धिवंत, विचारवंत, मानवतावादी आणि तथाकथित सामाजिक जंतूंनी जो अयशस्वी खटाटोप केला त्यात गोपालकृष्ण गांधी यांचा समावेश होता. बरे झाले महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकुबच्या दया अर्जाला केराची टोपली दाखवत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले व जनभावनेचा आदर केला. ज्या कॉंग्रेसने इंदिरा गांधी आणि राजीव गांधीसारखे बहुमूल्य मोहरे दहशतवादाच्या खात्म्यासाठी गमावले, तीच कॉंग्रेस याकुब मेननसारख्या खतरनाक दहशतवाद्याच्या सुटकेसाठी धडपड करणार्‍यांना उमेदवारी देते, हे पाहून हसावे की रडावे तेच समजत नाही! राष्ट्रपती निवडणुकीत पराभव अटळ दिसताच कॉंग्रेसतर्फे विवेकबुद्धी आणि अंतरात्म्याच्या आवाजानुसार मतदान करण्याच्या आरोळ्या ठोकल्या गेल्या. परंतु, उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार देताना मुंबई बॉम्बस्फोटाच्या पीडितांचा आवाज का ऐकू आला नाही? शेकडो निरपराध्यांचे बळी गेले, कित्येक जन्मभराचे जायबंदी झाले, सरकारी-खाजगी संपत्तीचे अतोनात नुकसान झाले. या बॉम्बस्फोटाने महाराष्ट्राची आर्थिक पीछेहाट झाली. परंतु, याला जबाबदार असणार्‍यांना शिक्षा ठोठावल्यावर कॉंग्रेस प्रायोजित कंपू अर्ध्या रात्री सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो! काय म्हणावे या कर्मदरिद्रीपणाला? दहशतवादी याकुब मेननसाठी आपली बुद्धिमत्ता आणि वेळ खर्च करणारा उमेदवार खरोखरच जनता स्वीकारेल काय, याचा थोडातरी विचार कॉंग्रेसने करायला हवा होता. कमीतकमी ज्या दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याचेतरी स्मरण करणे आवश्यक होते. गेल्या काही निवडणुकांत होणार्‍या धडधडीत पराभवातून कॉंग्रेस काही शिकायला तयार दिसत नाही. अन्यथा, याकुबसाठी याचना करणारे गोपालकृष्ण गांधी यांची कॉंग्रेसने उपराष्ट्रपतिपदाकरिता निवड केलीच नसती! या देशावर कधीकाळी अधिराज्य गाजवणारी कॉंग्रेस कशी काय लोप पावत आहे, याचा पक्षाने विचार करणे गरजेचं आहे. आपण जनतेची नाडी परखण्यात कुठे कमी पडतो, याचे चिंतन जरूर करावे. अन्यथा, बुडत्याचा पाय खोलात जाणार, हे नक्की! परंपरागत मानसिकतेतून बाहेर येत, एखादा निष्कलंक आणि विवादापासून दूर असलेला उमेदवार दिला असता, तर जनतेची तेवढीच सहानुभूती नक्कीच मिळाली असती!
– डॉ. अनिल पावशेकर
९८२२९३९२८७