मायावती यांच्या राजीनाम्याची नौटंकी!

0
75

दिल्लीचे वार्तापत्र
स्वत:ला दलितांच्या मसीहा समजणार्‍या बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी, दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी मायावती यांनी दलित आणि अल्पसंख्यकांवर होणार्‍या अत्याचाराचा तसेच उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथील जातीय दंगलीचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. विशेष म्हणजे हा मुद्दा उपस्थित करताना मायावती यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तरप्रदेशातील योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या दोन्ही सरकारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
दलितांवरील अत्याचाराच्या मुद्यावरून राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा मायावती यांचा निर्णय हा पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा जाणवतो. या मुद्याचे स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी मायावती भांडवल करत आहेत. राजीनामा देण्याचा त्यांचा उद्देश प्रामाणिक वाटत नाही. मुळात राजीनामा देण्यासाठी जी कारणमीमांसा मायावती करत आहे, ती पटण्यासारखी नाही. मी दलित समाजातील आहे आणि दलितांवर होणार्‍या अत्याचाराचा मुद्दा मला सभागृहात उपस्थित करता येत नसेल तर या सभागृहात राहण्यात काय अर्थ आहे, अशी विचारणा करत मायावती यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
मायावती यांचा हा राजीनामा म्हणजे नौटंकी म्हणावी लागेल! मायावती यांच्या बोलण्या आणि वागण्यात खूप विसंगती आहे. दलितांवरील अत्याचाराच्या मुद्यावर मला बोलू दिले नाही, असे मायावती म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायावती यांनी या मुद्यावर आपल्याला बोलू द्यावे, अशी विनंती राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांच्याकडे केली होती. कुरियन यांनी त्यांना तीन मिनिटांचा वेळ दिला होता. त्यानुसार मायावती तीन मिनिटे बोलल्या. दलितांवरील वाढत्या अत्याचारासाठी त्यांनी भाजपा सरकारला जबाबदार धरले. भाजपाशासित राज्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याचा त्यांचा आरोप होता.
निर्धारित वेळ संपल्यामुळे कुरियन यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण मायावती बोलतच होत्या. त्यामुळे दलितांवरील अत्याचाराच्या मुद्यावर मला बोलू दिले नाही, या मायावती यांच्या आरोपात काही तथ्य नाही. नंतर तुम्ही वेगळ्या पद्धतीने हा मुद्दा मांडू शकता, असे सांगत कुरियन यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मायावती संतप्त झाल्या आणि त्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. उपसभापती कुरियन हे कॉंग्रेसचे आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपाच्या सांगण्यावरून मायावती यांना बोलू दिले नसल्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.
सभागृहाच्या कामकाजाचे संचालन करताना सभापती वा उपसभापती अनेक वेळा सदस्यांना बोलण्यापासून थांबवत असतात. कारण दुसर्‍या विषयाची वेळ झाली असते. कोणत्या मुद्याला किती वेळ द्यायचा, याचे संसदीय कामकाजात काही नियम असतात आणि त्याचे पालन सर्वांना करावेच लागते.
दलितांवरील अत्याचाराच्या मुद्यावरून मायावती प्रामाणिक आणि गंभीर असत्या, तर वेगवेगळ्या संसदीय आयुधांचा वापर करत या मुद्यावरून सरकारला सळो की पळो करणे त्यांच्यासाठी कठीण नव्हते. या मुद्यावर अन्य विरोधी पक्षांनीही त्यांना आनंदाने पाठिंबा दिला असता. पण, मायावती यांना ते करायचे नव्हते. कारण राजीनामा देण्यामागचा त्यांचा हेतू हा शुद्ध राजकीय स्वरूपाचा आहे. ज्या दलितांच्या मसीहा असण्याचा आव मायावती आणतात, त्या दलित समाजाने त्यांना कधीच दूर लोटले आहे! कारण मायावती यांचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातून बसपाचा एकही खासदार निवडून आला नाही. उत्तरप्रदेश विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही बसपाचे पानिपत झाले. उत्तरप्रदेशात मायावती यांच्या बसपाचे यावेळी फक्त १९ आमदार विजयी झाले आहेत. मायावती यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून दलित समाजाने भाजपाला जवळ केल्याचे भाजपाला यावेळी मिळालेल्या जागांवरून दिसून येते आहे. त्यामुळे आपल्यापासून दुरावलेल्या दलित समाजाला पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी मायावती यांनी राजीनाम्याचा हा स्टंट केला आहे. हे नाटक यशस्वी होण्याची कोणतीच शक्यता नाही.
राजीनाम्याचे हे नाटक यासाठी की, मायावती यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ फक्त आठ महिन्यांचा राहिला आहे. त्यामुळे यावेळी राजीनामा देऊन त्यांचे फारकाही बिघडत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायावती स्वबळावर पुन्हा राज्यसभेत येण्याची शक्यताही फार कमी आहे. कारण त्यांच्या पक्षाजवळ तेवढे संख्याबळ नाही. राज्यसभेत निवडून येण्यासाठी किमान ४० ते ५० आमदारांची गरज असते. पण, मायावती यांच्या पक्षाकडे तर सध्या फक्त १९ आमदार आहेत. त्यामुळे जोपर्यंत दुसरा एखादा पक्ष पाठिंबा देत नाही, तोपर्यंत मायावती राज्यसभेत येऊ शकत नाहीत.
मुळात राजीनामा देऊन खळबळ उडवायची, आपण दलितांसाठी आपल्या राजकीय कारकीर्दीचे बलिदान केले असा आव आणायचा, पण राजीनामा मंजूर होणार याची काळजी घ्यायची, अशी मायावती यांची राजकीय खेळी होती. मायावती यांचा राजीनामा मंजूर होण्याची शक्यता नाही. कारण राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना त्यात कोणतेही कारण नमूद करायचे नसते, ना आपली राजकीय भूमिका मांडायची असते. मायावती यांना हे माहीत नसेल यावर छोटा मुलगाही विश्‍वास ठेवणार नाही! मायावती यांनी तीन पानांचे आपले राजीनामापत्र सादर केले असून, त्यात आपल्या राजीनाम्यामागची भूमिका तपशीलवारपणे मांडली आहे. त्यामुळे मायावती यांचा राजीनामा मंजूर होण्याची दूरदूरपर्यंत कोणतीच शक्यता नाही.
राजकारणात कुणीच कुणाचा कायमस्वरूपी मित्र वा शत्रू नसतो, असे म्हटले जाते. याची प्रचीती उत्तरप्रदेशातील ताज्या घटनाक्रमावरून येत आहे. कधीकाळी समाजवादी पार्टी आणि बसपा यांच्यात उत्तरप्रदेशात छत्तीसचा आकडा होता. राजधानी लखनौतील व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये काही वर्षापूर्वी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मायावती यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. पण, आज त्याच समाजवादी पार्टीशी मायावती सत्तेसाठी हातमिळवणी करत आहेत. भाजपा हा उत्तरप्रदेशात सपा आणि बसपा या दोघांचाही समान शत्रू आहे, त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नीतीप्रमाणे सपा आणि बसपा एकत्र आले तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.
राजदच्या कोट्यातून मायावती यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी, भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात जाऊन आलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी दर्शवली आहे. मायावती तुरुंगात गेल्या नसल्या, तरी त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आहेत. समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले आहेत. त्यामुळे भाजपाच्या विरोधात तीन भ्रष्टाचारी नेते एकत्र येण्याची ही प्रक्रिया म्हणावी लागेल.
मायावती मुख्यमंत्री असताना, सर्वाधिक अत्याचार हे दलितांवरच झाले होते. एक हजार दलित तेव्हा मारले गेले होते. त्याचा हिशेब मायावतींनी दिला नाही. पण, हे सर्वच राजकीय पक्षांना माहीत आहे आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोतही त्याची नोंद आहे. तेव्हा केवळ आपली व्होट पुनर्जिवीत करण्यासाठी दलितांवरील अत्याचाराच्या घटनांचा मायावती आपल्या राजकीय फायद्यासाठी ढालीसारखा वापर करत आहेत. पण दलित समाजाला मायावती यांचा खरा चेहरा लक्षात आला आहे. त्यामुळे दलित समाज मायावती यांच्या या राजीनामानाट्याला बळी पडणार नाही, याबाबत शंका नाही.
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७