दुर्दैवी!… मन्मथचा मृत्यू अन् समाजाचे वागणेही…!

0
382

चौफेर
समस्या असो वा मग एखादी वस्तू, ती दुसर्‍याची असेल, तर हाताळायला फार सोपी वाटते लोकांना. त्या संदर्भातील तर्क-वितर्कांचे फुगे फुगवायला सारेच सरसावलेले असतात. अनेकांमधला तज्ज्ञ, तत्त्ववेत्ता, सल्लागार जागा होतो अचानक अन् फुकटचे सल्ले देणार्‍यांची बघा कशी रांग लागते मग. दुसर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत विचार करण्याची आणि ते तडीस नेण्याचीही समाजाची स्वत:ची एक रीत असते. ‘माझा’ असेल तर चिंता अधिक गहन होत जाते. विचार सखोल होत जातात, पण तोच प्रश्‍न ‘दुसर्‍याचा’ असला तर मात्र वागण्याच्या पद्धतीत नको तेवढा फरक पडतो. महाराष्ट्र सरकारमध्ये उच्चपदस्थ सनदी अधिकारी असलेल्या एका दाम्पत्याच्या एकुलत्या एक मुलाने वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी आत्महत्या केल्याच्या, परवाच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्‍वभूमीवर, गेल्या काही दिवसांत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत सोशल मीडियावरील सर्वाजनिक चर्चेतून जो उच्छाद मांडला गेला, तो बघितल्यानंतर तर ही बाब प्रकर्षाने अधोरेखित होते. सारी सुखं दाराशी लोळण घालीत असताना ऐन उमेदीच्या उंबरठ्यावरच आयुष्य संपविणार्‍या त्या कोवळ्या जिवासाठी दु:ख व्यक्त करण्याच्या निमित्ताने कित्येकांनी जे अकलेचे तारे तोडले, कुटुंबव्यवस्थेवर, पालकांच्या कथित बेजबाबदारीवर, करीअर सांभाळण्याच्या नादात मुलांकडे होणार्‍या दुर्लक्षावर, तरुणाईच्या उच्छृंखलपणावर अगदी ठामपणे जी मतं व्यक्त झालीत, कोरडे ओढण्यात आलेत… या मुद्यावर समाज जबाबदारीनं वागत, बोलत असल्याचं जाणवलं नाही कुठेच, हा सारा तमाशा बघून!
पुढील शिक्षणासाठी म्हणून अगदी कालपरवाच पुण्यात दाखल झालेला मन्मथ मुंबईत आला असताना एका इमारतीवरून उडी घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवतो, ही बाब दुर्दैवीच. पण, त्याची कित्येक कारणं असू शकतात ना! ती सर्वांनाच ठाऊक असतील असं कुठे आहे? पण सोशल मीडियात, सकृद्दर्शनी दिसणार्‍या प्राथमिक दर्जाच्या संभाव्य कारणांवरच दर्जाहीन चर्चा करून मोकळे झाले कित्येक लोक. ‘बातमी’ सांगण्याची घाई झालेल्यांनीही तोच धिंगाणा घातला. लागलीच चर्चेच्या फेर्‍या झडल्या. ‘तो’ अशा बड्या अधिकार्‍यांच्या घरातला पोरगा असल्याने त्याच्या आत्महत्येची ‘बातमी’ होणे स्वाभाविक असेलही कदाचित. पण, त्यावरील चर्चेचा सूर आळवताना मात्र संवेदना हरवून बसल्यासारखे वागले सारे लोक. नव्हे, अजूनही तसेच वागताहेत. अशा प्रकरणात कसं वागू, बोलू नये याचं ‘आदर्श’ उदाहरण घालून देण्यासाठीच जणू धडपड चालली आहे प्रत्येकाची. इतकंच कशाला, इथे तर कारणांचा शोध घेण्यापूर्वीच निष्कर्ष काढून मोकळे झालेत लोक. त्या कुटुंबाशी संबंधित, असंबंधित, असे सारेच सहभागी झाले मग, चर्चेच्या या वारीत.
अठरा वर्षाचं पोर ज्यांनी गमावलं त्याचं दु:ख, त्या वेदनांचा दाह ज्यांनी सोसला त्यांनाच ठाऊक. समाजानं अगदीच दखल घेऊ नये वा त्यावर चर्चाही करू नये, असं कोण म्हणेल? तो एका उच्चपदस्थ अधिकारी दाम्पत्याचा मुलगा होता म्हणूनच नव्हे, तर तो अगदी एका सामान्य घरातला असता तरी या घटनेवर समाजाने चिंता वाहायलाच हवी होती. हो! अगदी खोलवर विचार करायला हवा होता. उद्ध्वस्त होत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेपासून तर आई-वडील दोघेही नोकरी करतात अशा घरातल्या मुलांच्या मानसिकतेपर्यंत, नव्या पिढीच्या विचार करण्याच्या तर्‍हेपासून तर त्यांच्या समस्यांपर्यंत, सुविधा उपलब्ध करून देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या जगावेगळ्या समस्यांपासून तर ‘मूल एकच हवं’च्या हेक्याबाबत निर्माण झालेल्या पुनर्विचाराच्या गरजेपर्यंतचे अनेक मुद्दे या निमित्तानं चर्चेत यायला हवे होते. पण, ते करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा या दाम्पत्यावर दोषारोपण करून मोकळं होणं सोपं वाटलं अनेकांना. कित्येकांनी, ‘मुलीचं प्रकरण असेल’ असा सरळ, साधा निष्कर्ष लागलीच काढून टाकला. त्यावर चर्चेच्या फेर्‍याही झडल्या. प्रेम प्रकरणापासून तर इतर वाईट सवयींपर्यंतही जाऊन पोहोचले लोक… पण, आता जी माहिती समोर येतेय्, त्यावरून इतर सर्व बाबींपेक्षा काहीशा भावनिक पातळीवर या घटनेचे संदर्भ जोडले जाताहेत. शिक्षणासाठी म्हणून आई-बाबांपासून दूर राहावे लागणार असल्याच्या विचारांनी मन्मथच्या मनात माजलेलं काहूर… ती कालवाकालव… ती घालमेल… या कारणांबाबतही तपासयंत्रणा विचार करते आहे…
पण… इथे तर या घटनेचे सामाजिक कंगोरे शोधून, त्यावर चर्चा करायची सोडून, दु:ख व्यक्त करण्याच्या निमित्ताने एखाद्याच्या खाजगी जीवनात डोकावण्याची संधी साधण्याचा प्रयत्न करून पाहिलेला दिसतोय् अनेकांनी. जे व्हायला नको होतं. कारण या प्रयत्नांत मग पातळी राखण्याचे भान राहिलेच नाही अनेकांना. परिणामी, चर्चेची दिशा भरकटत गेली. किंबहुना या निमित्ताने ज्या मुद्यांवर विचार व्हायला हवा होता, त्या मुद्यांवर तो झालाच नाही. अगदीच थातुरमातुर, वरवरची मतं व्यक्त करत थेट निष्कर्षाप्रत येण्याचीच घाई झालेली प्रत्येकाला.
हे खरंच आहे की, आई-वडील दोघेही नोकरी करतात, अशा घरातल्या मुलांची समस्या आणि मानसिकता काहीशी वेगळी असते. सारेच प्रश्‍न पैशाने सोडवता येत नाहीत. कित्येकदा हळवेपणातूनही काही समस्यांची उकल करावी लागते. हाताच्या बोटांवर उपलब्ध असलेल्या इंटरनेटच्या आडून अनेक नव्याच समस्यांनी घर केले आहे अलीकडे. पण, या वयातल्या भावनिक गुंतागुंतीचे संदर्भ तर तिथेही सापडत नाहीत. समाज प्रगत होत चाललाय् हे खरंच आहे. पण, म्हणून कालचे सारेच प्रश्‍न आज सुटल्यात जमा झाल्याचे चित्र थोडीच निर्माण झालेय् अद्याप? आर्थिक स्तर बदलले. नाश्त्यात पोह्यांच्या जागी पिझ्झा आला. खायला केएफसी, पनीनोचे ब्रॅण्डेड पदार्थ हातात आले. घरात, जराशा मोठ्या झालेल्या मुलांच्या वाट्याला स्वतंत्र बेडरूमही येऊ लागलीय् एव्हाना. हो! वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होऊ लागलोय् ना आम्ही! पण, मासिक पाळीबाबत मुलींनी आणि पौगंडावस्थेतील बदलांबाबत मुलांनी हक्कानं, विश्‍वासानं नेमकं कुणाशी बोलावं, या प्रश्‍नाचं उत्तर मात्र अजूनही गवसत नाही, त्याचं काय? घरात चर्चा व्हावी असे हे मुद्देच नसल्याचे ठाम मत असलेले लोकच उजळ माथ्याने समाजाच्या वैचारिक प्रगतीच्या गप्पा हाणण्यात मग्न आहेत अन् तेच मन्मथच्या मृत्यूवरील उथळ चर्चेतही हिरिरीने सहभागी झाले आहेत.
खरंच आपला समाज गांभीर्याने बघू शकला आहे या घटनेकडे? की समस्या ‘माझी’ नसल्याने ती अगदीच सहजपणे सोडवायला निघालोय् आपण सारे? फार खोलात न शिरता… पुन्हा कुणी मन्मथ ‘या’ मार्गाने जाऊन स्वत:चे आयुष्य संपविणार नाही, अशी व्यवस्था, तशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी कुणाची? करीअरच्या मागे धावण्याची गरज, त्यात होणारी फरफट, ‘हम दो हमारे दो’चे सूत्र झुगारून ‘एकच मूल’ होऊ देण्याच्या ठाम निर्धारामागील कटु सत्य, ते एकुलते एक मूलही जगाच्या स्पर्धेत उतरावे, टिकावे म्हणून करावी लागणारी धडपड, शिक्षणापासून तर खाद्यपदार्थांपर्यंत… त्याला सारेकाही दर्जेदारच देता यावे म्हणून होणारी कसरत, त्यामुळे होणारी दमछाक… जगाने आखून दिलेल्या मापदंडात त्याचे यश तोलण्याच्या नादात होणारी घालमेल, त्या घालमेलीत एकट्या मन्मथचीच नव्हे, तर तरुणाईचे प्रतिनिधित्व करणार्‍या, नव्या पिढीतील तमाम जनांची होणारी कुतरओढ… सारंच अजब आहे. पण, गांभीर्याने त्याच्या खोलात शिरायचेच नाही कुणाला इथे. प्रत्येक जण समस्या ‘आपली’ नसल्याच्या थाटातच तटस्थपणे बघतोय् त्याकडे. मन्मथच्या मृत्यूनंतर झडलेल्या चर्चेच्या उथळपणाला ही वृत्तीच कारणीभूत आहे, असं नाही वाटत…?
– सुनील कुहीकर
९८८१७१७८३३