रमेश पतंगे यांचा लेख ‘त्यांना’ चपराक लगावणारा

0
40

रविवारची पत्रे
१६ जुलै २०१७ च्या तभाच्या रविवारच्या अंकात, सिद्धहस्त साहित्यिक व संघविचारक रमेश पतंगे यांचा, रवींद्र भुसारी यांच्यावर लिहिलेला ‘पेढा अधिकच गोड झाला!’ हा लेख प्रसिद्ध केला याबद्दल आपणास धन्यवाद. ज्या पेपर्समध्ये ‘भुसारींचा राजीनामा की हकालपट्‌टी?’ या शीर्षकाखाली जी बातमी आली, त्यामुळे खर्‍या स्वयंसेवकांचा विश्‍वासच बसला नाही. पण, काही नतद्रष्ट लोक ती बातमी जाणूनबुजून दहा लोकांना वाचून दाखवून, संघ व भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत होते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे आमदार व खासदार यांची नाराजी होती, हे खोडसाळपणे सांगत होते. मात्र, रवींद्र भुसारी यांच्याविषयी ज्या स्वयंसेवकांना व पक्षकार्यकर्त्यांना माहिती होते, त्यांना फार वाईट वाटत होते. त्यामुळे रमेश पतंगे यांचा लेख प्रसिद्ध होताच, स्वयंसेवकांनी व पक्षकार्यकर्त्यांनी तो लेख या नतद्रष्ट लोकांना वाचावयास दिला. अर्थात, त्यांच्यावर काही परिणाम झाला असेल असे वाटत नाही. तसेच ज्या पेपरमध्ये ही बातमी कार्यालयात टेबलवर बसून लिहिली, त्याचे संपादक मुळात जाऊन खरेखोटे याची शहानिशा करून प्रायश्‍चित्त म्हणून खुलासा करतील, अशी अपेक्षा करू या.
परंतु, भुसारींनी अजून कमीतकमी दहा वर्षे संघटनात्मक काम करावयास पाहिजे होते, असे भाजपाच्या पक्षसंघटनेत संघाचे गटनायक म्हणून जे काम करतात त्यांना वाटते. अजूनही वेळ गेली नाही. संघाने पुनर्विचार करावा, असे वाटते. कदाचित आमचा विचार तर्कसंगत नसेल. पण, ती काळाची गरज आहे. रवीजी भुसारींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
ऍड. बाळ आसरकर
९८५०२६०२६५

मंदिरातील अब्जावधींची रक्कम
शस्त्रसंभार खरेदीसाठी वापरावी!
हल्ली आपल्या देशातली परिस्थिती अत्यंत स्फोटक बनलेली आहे. आत्मसंरक्षणासाठी देशाला युद्धसाहित्यावर प्रचंड खर्च करावा लागतो. वास्तविक, विकसनशील देशाला न परवडण्याएवढा खर्च करावा लागतो. कितीही आर्थिक प्रगती केली, तरी देशाच्या संरक्षणाला अग्रस्थान द्यावेच लागते. अन्यथा सर्व प्रगती क्षणात नष्ट होऊ शकते. म्हणून त्याला पर्याय नसतो.
जपानमध्ये क्वोटो शहरातल्या बुद्धमंदिरातील सोन्याच्या मूर्ती वितळवून आलेला पैसा युद्धसाहित्याच्या खरेदीसाठी वापरला गेला होता. संपूर्ण देश बुद्धभक्त असूनदेखील कुणीही त्याला आक्षेप घेतला नाही. देशाचे संरक्षण करता आले नाही, तर देव आणि देवालय तरी कसे राहणार, हे समजण्याएवढी तिथली जनता सुज्ञ आहे. माणसाच्या मदतीला देव धावून येतो म्हणतात तो असा. शिवाय देशात तथाकथित सेक्युलरवादी नसल्यामुळे विरोध कसा होणार?
आपल्या देशात तर अनेक मंदिरांत अब्जावधी रुपयांची संपत्ती पडली आहे. पैशावर मंदिरांना व्याजाचे उत्पन्न होऊ शकते. पण, जडजवाहिर्‍यांचे काय? ते विकून तो पैसा सरकारला संरक्षणसाहित्य खरेदी करण्यासाठी वापरता येणार नाही काय?
कुणी असाही प्रश्‍न उपस्थित करतील की, हिंदूंच्याच मंदिरातील पैसा का वापरायचा? इतर धर्मांची धर्मस्थळे का सोडायची? प्रश्‍न अगदी सयुक्तिक आहे. प्रश्‍न राष्ट्रभक्तीचा आहे. उलट, इतर धर्मियांना आपली राष्ट्रभक्ती प्रदर्शित करण्याची ही उत्तम संधी आहे, अर्थात राष्ट्रभक्ती असेल तरच!
त्यातही एक मार्ग सुचवू इच्छितो. मंदिरातले धन सरकारला कर्ज म्हणून द्यावे आणि सरकारने शक्य होईल तेव्हा परत करावे, जेणेकरून भक्तांनी धार्मिक भावनेने दिलेले धन मंदिरातच राहील. म्हणजेच धर्मभक्ती आणि राष्ट्रभक्ती असे दुहेरी श्रेय आणि समाधान दात्यांना मिळेल आणि देशाची अडचणही बाह्य मदतीशिवाय पूर्ण होईल.
इतर अन्य धर्मियांना जर राष्ट्रभक्ती असेल व त्यांना देशासाठी काही करण्याची खरी तळमळ असेल, तर आपली राष्ट्रभक्ती प्रदर्शित करण्याची उत्कृष्ट संधी मिळेल.
सोमनाथ मंदिर अनेक वेळा लुटून त्यातली प्रचंड संपत्ती मुस्लिमांनी लुटून नेली. त्याच संपत्तीचा वर दर्शविल्याप्रमाणे उपयोग, आपल्या हिंदू राजांना मदत करता आली असती तर आपल्या प्रचंड पराक्रमी आणि जाज्वल्य देशाभिमानी सैनिकांना मंदिराचे जतन करता आले नसते काय? मंदिरही यथास्थित राहिले असते, धर्माचे रक्षण झाले असते आणि हिंदूंची अस्मिता दुखावली गेली नसती. भाग्य एवढेच की, सरदार पटेलांसारखा एक शूर आणि जाज्वल्य देेशाभिमानी नेता उदयाला आला म्हणून आज सोमनाथ मंदिराचे दर्शन आपल्याला घडते तरी!
डॉ. किशोर पाटील
९८२२३६३६६५

रवींद्र भुसारी यांची निवृत्ती
संघाचे संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी, वयाची ६० वर्षे पूर्ण होताच निवृत्ती जाहीर करून समाजाला सुखद धक्का दिला. समाजकार्य, राजकारणी लोकांपुढे आदर्श निर्माण केला. कै. विलासजी फडणवीस यांच्यामुळे माझा व रवींद्रजीचा परिचय झाला. अतिशय कामसू, कुणाशी काय बोलावे याचे ज्ञान असणारे, आदर्श संघसेवक व अतिशय बुद्धिमान संघटनमंत्री. त्यांची, संघटनमंत्री झाल्यावर व आधीची भाषणे ऐकली. त्यात त्यांच्या ज्ञानाची, बुद्धीची चुणूक दिसली. सर्वसाधारणपणे निवृत्तीचे वय साठ समजले जाते. कदाचित त्यानंतर शारीरिक क्षमता कमी होत असेल पण कर्तृृत्व नाही. परंतु, समाजकार्य किंवा कुठलीही संघटना येथे निवृत्तीला वयाचे बंधन नसते. साठ वर्षे झाली म्हणून कामाची क्षमता असताना एखादा कार्यकर्ता निवृत्त होतो, तेव्हा त्याचा आदर्श डोळ्यांसमोर न ठेवता त्यावर टीका करणारे विघ्नसंतोषी लोक समाजात खूप आहेत. काही जण निवृत्तीनंतर दुसर्‍या दिवशी दुसरी नोकरी जॉईन करतात. पेन्शन भरपूर असते, परंतु पैशाची हाव सुटत नाही. बेकारी वाढण्याचे हेही एक कारण. राजकारणात तर सत्तेची वंशपरंपरा दिसते. कामाची क्षमता नसताना जागा अडवून ठेवतात. मुलांसाठी वेगळी जागा निर्माण करतात. काही संपूर्ण कुटुंबच राजकारणावर पोट भरीत आहे. संघकार्यकर्त्यांना पैशाची, सत्तेची हाव नसते. आपल्या कामाशी, संघाशी एकनिष्ठ असणे, हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय. अजूनही सकाळच्या संघशाखेत मा. गो. वैद्य यांच्यासारखे श्रेष्ठ स्वयंसेवक नियमितपणे येताना दिसतात. माजी सरसंघचालक सुदर्शनजी यांनीसुद्धा स्वखुशीने निवृत्ती स्वीकारली होती. त्याच परिवारातील रवींद्र भुसारींनी साठ वर्षे पूर्ण होताच निवृत्ती घेतल्यामुळे, त्यांची शान, व मान वाढला. निवृत्तीचे जू मानेवर ठेवून निवृत्त होण्यात काय फायदा? सन्मानाने निवृत्ती स्वीकारणे, हाच खरा समाजापुढील आदर्श!
निर्मला गांधी
९४२१७८०२९०

देशात एकच शिक्षणमंडळ हवे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारने या वर्षी यशस्वी ३ वर्षे पूर्ण केलीत. या ३ वर्षांत त्यांनी लोकांच्या हिताच्या, त्यांच्या सुरक्षेच्या, विकासाच्या अनेक गोष्टी केल्यात. जसे- नोटाबंदी, भ्रष्टाचार निर्मूलन, डिजिटल इंडिया, कॅशलेस व्यवहार, मेक इन इंडिया इ. व आता १ जुलैपासून जी. एस. टी. लागू झाले आहे. या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक प्रश्‍न आहे व तो म्हणजे, यांनी वस्तू व सेवा स्वस्त होणार की महागणार?
मी नुकताच एका किराणा दुकानातून काही वस्तू खरेदी केल्यात. मला संगणकीय बिल मिळाले, ज्यात कोणत्या वस्तूवर किती टक्के कर हे नमूद होते. एकूण बिल व कर मिळून आकडे होते. त्यातून मला एवढेच कळले की, दहा वर्षांपूर्वी ज्या वस्तू स्वस्त होत्या त्या आज एकतर त्याच किमतीच्या आहेत किंवा त्यात किंचित वाढ झालेली आहे.
पूर्वी २०० रु. भरून मिळणारा पूर्ण टॉकटाईम (२०० ला २००) हा आता २०० ला. १९० असा झाला आहे. तसा मला भ्रमणध्वनीवर संदेश आला. म्हणजे प्रत्येक सेवासुद्धा महागणार काय?
या जीएसटी- वन नेशन वन टॅक्सप्रमाणे आपल्या देशात एकच शिक्षण मंडळ- इंडियन एज्युकेशन बोर्ड, एकच शिक्षणपद्धती, समान अभ्यासक्रम होऊ शकणार नाही काय? पहिली ते आठवीपर्यंत भाषा व भूगोल, इतिहास सोडून इतर विषयांचे अभ्यासक्रम सारखे असावेत.
पूर्वीप्रमाणे ९ व्या वर्गातच विषय (शाखा) निवडू द्यावेत. जसे- विज्ञान (गणित/जीवशास्त्र), कला, वाणिज्य, कृषी इ. म्हणजे विद्यार्थ्यांना अधिक प्रगती करता येईल. शिक्षणक्षेत्राशी संबंधित अनेक बाबींवर, अनेक समस्यांवर विचार व्हावा, चर्चा व्हावी, असे मला वाटते.
भालचंद्र बोधनकर
९९२१५४४८७९

कोचिंग नावाच्या धंद्यातील
कोट्यवधींचा नफा!
निरनिराळ्या वर्तमानपत्रांतील फ्रंटपेजवरील पूर्ण पेजभर प्रकाशित होणार्‍या निरनिराळ्या कोचिंग सेंटरच्या जाहिराती पाहिल्या की, त्यांच्यातील व्यापारी स्वरूपाची चालू असलेली स्पर्धा सामान्य पालकांना, नागरिकांना बुचकळ्यात पाडते.
लाखो रुपये मोजून दिलेल्या या जाहिराती कोचिंगच्या धंद्यात कोट्यवधीचा नफा असल्याशिवाय शक्यतरी आहे काय?
एक साधे उदाहरण घ्या. प्रत्येक कोचिंग सेंटरमध्ये ११ वी व १२ वी चा संयुक्त अभ्यासक्रम पूर्ण करून सोबतच आयआयटी, इंजिनीयरिंग व मेडिकलच्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून देण्याच्या हमीमुळे अंदाजे तीनशे-चारशे ते हजारच्या संख्येत विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यासाठी पालक दीड लाखापासून ते दोन-अडीच लाखापर्यंत ट्युशन फी भरतात. एक हजार विद्यार्थी असणार्‍या कोचिंग सेंटरची प्रत्येकी दोन लाखाच्या हिशोबाने २० कोटी रुपये ट्युशन फी होते. दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमावर संबंधित सेंटरचा जास्तीत जास्त व्यावसायिक खर्च पाच कोटी जरी धरला, तरीही पंधरा कोटीचा निव्वळ नफा होतो.
अशा प्रकारे निरनिराळ्या कोचिंग सेंटरला अंदाजे ३ ते १५ कोटींच्या दरम्यान नफा होतो. कोणत्या धंद्यात दोन वर्षांत नुसते तोंड हालवून एवढा नफा मिळवता येतो? म्हणूनच चांदीच चांदी असणारा कोचिंग नावाचा हा धंदा दिवसेंदिवस फोफावत चालला आहे.
इन्‌कम टॅक्सवाले व शिक्षणतज्ज्ञ (?) असलेले शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांना हे उघड्या डोळ्याने दिसत नसेल काय? कोचिंगच्या या धंद्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये प्रचलित ११ वी, १२ वीच्या शिक्षणप्रणालीवर कसा विपरीत परिणाम होतो आहे, याची जाणीव यांना होत नसेल काय?
ओंकार नारायणराव जगताप
काटोल

कोणार्क
कोणार्क हे ओरिसा राज्यातील असे एक गाव आहे, जिथे १३ व्या शतकातील विश्‍वप्रसिद्ध असे सूर्यमंदिर आहे. ओरिसाची राजधानी भुवनेश्‍वर येथून ६५ किलोमीटर अंतरावर हे ऐतिहासिक स्थान आहे. या सूर्यमंदिरास नऊ विद्यांचे स्मारकरूपही मानले आहे. कारण, कोलकात्याला जाणार्‍या नाविकांनी येथे वास्तव्य करून नऊ विद्यांचे केंद्र बनविले होते. इ. स. १२३८ ते १२४१ या काळात नरसिन्हादेव प्रथमने मंदिरास पूर्ण रूप दिले. ओरिसातील शिल्पकलेच्या या अद्भुत आश्‍चर्यास सूर्य भगवानचेच रूप मानतात. सूर्याच्या या रथमंदिरास दगडांची मोठमोठी चाके लागली आहेत व ७ मोठ्या दगडांचे घोडे हा रथ ओढत आहेत, असे प्रथमदर्शनी दृश्य आहे. या विशाल मंदिराची उंची साधारणत: ३० मीटर आहे. मंदिराची आकर्षक शिल्पकला पर्यटकांना स्तंभित करते. कोणार्कच्या समुद्रकिनार्‍यावर पडणारी सूर्याची किरणे खास आकर्षण आहे. याला बघण्यासाठी देश-विदेशातील लोक लाखोंच्या संख्येने येत असतात.
केवळ सूर्याच्या किरणांनी तेथील चक्र व लोहचुंबकाची अशी रचना होती की, ते एक अचूक घड्याळच! पण, आज मात्र या दगडांच्या मंदिराची झीज व थोडी तोडमोड झालेली दिसते. ते सुधारण्याचे काम झपाट्याने चालू आहे. अनेक कारागीर सतत काम करीत असतात. भोवताली बगिचा व फोकस लाईट्‌स लावलेले आहेत, मात्र मंदिरातील मुख्य देवता अनेक वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी चोरून नेली व उरलेल्या देवता जगन्नाथपुरीच्या मंदिरात आणून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे या सूर्यमंदिरात, धार्मिकतेच्या दृष्टीने तेवढे महत्त्व नसून, शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून लोक येतात, असे येथील मार्गदर्शक सांगतात. सरकारने याकडे लक्ष पुरवावे.
डॉ. वैजयंती वसंत पागे
९४२२५०६१६४

‘इंदू सरकार’चे मधुर भांडार!
‘इंदू सरकार’ हा चित्रपट मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि मधुर त्याच्या प्रमोशनसाठी अनेक शहरात जात आहे. जी सत्य गोष्ट आहे ती एखाद्या माध्यमातून प्रकट करणे हे चुकीचे वाटत नाही. देशात लोकशाही अर्थात व्यक्तिस्वातंत्र्य असताना कॉंग्रेसचा या व्यक्तिस्वातंत्र्याला विरोध का? ज्यांना जी गोष्ट आवडते तिचा स्वीकार करतात, ज्यांना पटत नाही त्या व्यक्ती तो चित्रपट बघणार नाहीत. पण, आम्हीच देशाचे मालक, या भ्रमातून गुंडगिरी योग्य वाटत नाही. वास्तविक, कॉंग्रेसची बदनामी आणिबाणीच्या काळातच झाली. आता त्याविषयी बदनामीचा प्रश्‍नच नाही; फक्त नवीन पिढीला आणिबाणी म्हणजे काय असते व तिचे देशावर झालेले गंभीर व दीर्घ परिणाम तसेच इंदिराजींनी त्यासाठी केलेले अवाजवी प्रताप समजणे हे इतिहास म्हणून आवश्यक आहे. इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्यातील तणाव आणि त्यात झालेला संजय गांधींचा संशयास्पद मृत्यू, हा इतिहास आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील धडे, इंदू सरकार हा चित्रपट आणि अन्य काही गोष्टींबद्दल कॉंग्रेसने न हसविणारे विनोद करणे म्हणजे त्यांचा पाय अजूनही अपयशाच्या खड्‌ड्यात जातो आहे, याचे अजूनतरी भान ठेवावे आणि इंदू सरकार हा चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित होऊ द्यावा.
अमोल करकरे
पनवेल

मलिष्काचं नेमकं काय चुकलं?
वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांमधून मुंबई पालिकेवर खड्‌डे, शौचालय, स्वच्छता, वाहतूककोंडी आदी मूलभूत समस्यांवरून वेळोवेळी होणारी टीका तशी काही नवीन नाही. कधी त्याची दखल घेतली जाते, तर कधी नालेसफाईचा निधी सांगून हात झाकले जातात. तेव्हा रेडिओसारख्या हलक्या-फुलक्या माध्यमातूनही जनमत तयार होत असते. अशाच रेडिओ क्षेत्रात एक दशकाहून अधिक काळ सक्रिय असलेली मलिष्का जनमानसाच्या मूलभूत प्रश्‍नांवर भाष्य करून आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. यंदा तिने फक्त केवळ बुलंद आवाजाचा आधार न घेता, व्हिडीओचाही कल्पक वापर तिने केला आणि मलिष्काच्या या टीकेने सेनेच्या पोटात गोळा आला! कारण, रोज फारसा गांभीर्याने रेडिओ न ऐकणार्‍या मुंबईकरांच्या मोबाईलपर्यंतदेखील मलिष्काच्या या व्हिडीओने मजल मारली. मग आपली नाचक्की होऊ नये, अजून बेअबू्र होऊ नये म्हणून सेनेला त्यांच्या हल्लीच्या आक्रस्ताळ्या स्वभावानुसार प्रत्युत्तर देणे भाग पडले. पण, त्याला काही अर्थ तरी आहे का?
विजय कुलकर्णी
मुंबई