साप्ताहिक राशिभविष्य

0
495

२३ जुलै ते २९ जुलै २०१७
सप्ताह विशेष ः सोमवार, २४ जुलै- श्रावण मासारंभ, श्रावण सोमवार (शिवमूठ- तांदूळ), द्वारयात्रा- चिंचवड (पुणे); मंगळवार, २५ जुलै- मंगळागौरी पूजन, जिल्काद (मुस्लिम ११ मासारंभ); बुधवार, २६ जुलै- विनायक चतुर्थी, नागचतुर्थी (उपवास), भद्रा (प्रारंभ १९.३२), शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश (१७.०७); गुरुवार, २७ जुलै- नागपंचमी, नवनाग पूजन, श्रावणी, भद्रा (समाप्त ८.०३), श्री नाना महाराज तराणेकर जन्मदिन- इंदूर, पूज्य आगाशेकाका जन्मदिन, श्री मुद्गलभारती महाराज पुण्यतिथी- अंबाडा, मोर्शी (अमरावती); शुक्रवार, २८ जुलै- जरा-जीवंतिका पूजन, सूपौदन, वर्णषष्ठी, कल्की जयंती; शनिवार, २९ जुलै- नरसिंह-पिंपळ-मारुती-शनि पूजन, श्रियाळषष्ठी, सितला सप्तमी;संक्षिप्त मुहूर्त ः साखरपुडा-१६,२० जुलै; बारसे- १६,१८,२० जुलै; जावळे- १६ जुलै; गृहप्रवेश- २०.
मेष- आर्थिक क्षेत्रात यश
या आठवड्यात आपला राशीस्वामी मंगळ कर्क या स्वतःच्या नीच राशीत रविसोबत अस्तंगत आहे. तेथे आतापर्यंत त्याच्यासोबत असलेला बुध पुढे पंचम स्थानी सिंहेत गेला आहे. चंद्र कर्क राशीत मंगळासोबत धनयोग करीत असून तो आठवडा अखेर सप्तमात तुला राशीत जाईल. या राशीच्या मंडळींनी शेअर बाजार, वायदे बाजार, कमिशन व एजन्सीची कामें यात आठवड्यात प्रयत्न करून बघावयास हरकत नाही. कला क्षेत्रातील मंडळींना देखील या काळात उत्कृष्ट यश मिळावे. तसेच हा काळ नोकरी करणार्‍या मंडळींना तसेच व्यावसायिकांना लाभाचा ठरेल.  शनि मात्र आपल्या लाभाचा वेग काहीसा अडवून धरीत असल्यामुळे सध्या जे काही केले त्याचे यश थोडेसे उशीराच पदरी पडणार आहे, त्यामुळे सध्या दूरगामी प्रकल्पांना हात घालावयास पाहिजे.   शुभ दिनांक- २३,२५,२६,२७.
वृषभ- अपेक्षित यश मिळावे
आपला राशीस्वामी शुक्र या आठवड्याच्या सुरुवातीला स्वतःच्या राशीत असून त्याच्यावर व शनिची दृष्टी आहे. आठवड्याच्या मध्यात तो राश्यंतर करून धनस्थानी मिथुन राशीत जाईल. चंद्र या आठवड्यात पराक्रमातून निघून षष्ठ स्थानापर्यंत प्रवास करणार आहे. या आठवड्यात उत्तम आत्मविश्‍वास लाभून आपण अडचणींतूनही मार्ग काढू शकाल. आपला संघर्ष निश्‍चितच अपेक्षित यश पदरी पाडणार आहे. राशीस्वामी शुक्र व्यवसायात व नोकरीत यश देईल. आर्थिक प्राप्ती देखील उत्तम राहू शकेल. शेअर व वायदे बाजारात गुंतवणूक करणार्‍यांनी जरा सावध पवित्रा घेणे आवश्यक आहे. सप्तमातील शनि मात्र आपणांस प्रकृतीची साथ मिळू न देण्याच्या प्रयत्नात आहे. दगदग व चिंता यांचा प्रकृतीवर पि?रणाम होऊ शकतो. जुने आजार डोके वर काढू शकतात. शुक्राच्या राश्यंतरानंतर अग्नि व विजेच्या उपकरणांचा वापर सावधपणे करावा. वाहने सांभाळून चालवावीत. शुभ दिनांक- २४,२७,२८,२९.
मिथुन- जिद्दीने अडचणींवर मात
आपला राशीस्वामी बुध या आठवड्यात पराक्रम स्थानात आलेला आहे. आतापर्यंत आपल्या राशीत असलेला रविदेखील राश्यंतर करून धनस्थानी अस्तंगत मंगळासोबत आहे. चंद्र या आठवड्यात धनस्थानातून प्रवास सुरू करीत आठवडाअखेर पंचम स्थानात जाईल. षष्ष्ठातील शनि आपल्या कामातील अडचणींचे जाळे फारसे विरळ होऊ देण्यास अद्याप तरी तयार नाही, त्यामुळे योजलेली कामे पूर्ण करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. आर्थिक आघाडीवर ओढाताण राहील. नोकरी- व्यवसायात मंदीचे वातावरण राहण्याची श्‍नयता आहे. आठवड्याच्या मध्यात शुक्राचे राश्यांतर झाल्यानंतर तो आपल्या राशीत येईल. त्यानंतर परिस्थिती काहीशी निवळायला सुरुवात व्हावी. कुटुंबीयांची साथ मिळेल. मोठ्या वस्तूच्या खरेदीने उत्साहाचे वातावरण राहील. शुभ दिनांक-२३,२४,२५,२८.
कर्क- खर्चवाढीची संभावना
आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशीस्वामी चंद्र राशीस्थानी असून आपल्या राशीत रवि व अस्तंगत मंगळ मुक्कामास आहेत. आठवडाअखेर चंद्र सुखस्थानी तुला राशीत येऊन पोहोचणार आहे. राशीस्वामी चंद्र प्रारंभी आपल्याच राशीत असल्याने हा आठवडा उत्तम राहील असा हवाला मिळत आहे मात्र धन स्थानावर येणारी शनिची दृष्टी पाहता काहीशी खर्चवाढ व आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक आवक देखील अवरुद्ध होऊ शकते. आपलेच पैसे न मिळाल्याने मनस्ताप होणारच. अष्टमात असलेला केतू पाहता प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. हवामानातील बदल, काहींना पडधड, छोटा-मोठा अपघात यांचे भय राहील. वाहने सांभाळून चालवावीत. प्रवासात सावध रहायला हवे.  तीर्थाटन, धार्मिक स्थळांना भेटीच्या योजना आखू शकाल. शुभ दिनांक- २३,२४,२५,२७.
सिंह- महत्त्वाची कामे वेगाने उरकून घ्यावी
आपला राशीस्वामी रवि या आठवड्यात व्यय स्थानात आलेला असून आपल्या राशीत बुध व राहू आहेत. चंद्र व्यय स्थानापासून प्रवास सुरू करीत पराक्रम स्थानात जाणार आहे. महत्वाची कामें पूर्वार्धात काहीशी मागे ठेवून ती उत्तरार्धात वेगाने उरकून घ्यावीत असे योग आहेत. या काळातील अनुकूल ग्रहयोगामुळे बर्‍यापैकी आर्थिक लाभ व्हावा असे वाटते. नोकरी व व्यवसायात काही चांगल्या घडामोडी घडून त्याचे दूरगामी चांगले प्रभाव अनुभवास येतील. नव्या क्षेत्रात व्यवसाय वाढविण्यासाठी देखील हा काळ उपयोगी ठरावा. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक समाधान लाभेल. मात्र प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालायचे नाही. वाहने सांभाळून चालवा. सुरुवातीला आर्थिक व्यवहारात, तसेच स्थावर खरेदीच्या व्यवहारात सतर्क रहावयास हवे. फवणुकीचे आणि मनस्तापाचे योग येऊ शकतात. नियमबाह्य वर्तन टाळा. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा. शुभ दिनांक- २६,२७,२८,२९.
कन्या- कामात धडाडीचा अनुभव
आपला राशीस्वामी बुध आता व्यय स्थानात आलेला आहे. तर आपल्या राशीत गुरु आहे. चंद्र या आठवड्यात लाभ स्थानातून प्रवास सुरू करीत धन स्थानी येणार आहे. लाभ ते धन हा प्रवास त्याचा बव्हंशी सुखकर ठरणार आहे. राशीतील गुरु आपल्याला व्यवसायाच्या नवनव्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो, आर्थिक लाभ देखील होईल, मात्र त्यात सातत्याचा अभाव राहील. तरीही आपल्या कामात धडाडीचा अनुभव येईल व त्याची लोकांवर छाप पडेल. स्पर्धेत पुढे राहाल. वरिष्ठांची मेहेरनजर होऊन आपले विरोधक तसेच छुप्या हितशत्रूंना चपराक बसेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राजकारणात असणार्‍यांना अपेक्षित पद, जबाबदारीचा लाभ मिळू शकतो. कलावंतांना व साहित्यिकांना देखील हा आठवडा उत्तम जावा. कौटुंबिक समारंभ, मंगलकार्याची बोलणी, धार्मिक कार्यक्रम. सणांमध्ये आपला उत्साहवर्धक सहभाग राहील. काहींना प्रवासाचे योग यावेत.  शुभ दिनांक- २३,२५,२७,२८.
तुला- आर्थिक सतर्कता हवी
या आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशीस्वामी शुक्र पीडादायक अष्टम स्थानात असून आठवड्याच्या मध्यात तो तिथून निघून भाग्यस्थानात जाईल. शुक्राचे हे राश्यंतर आपणास सुखकर ठरणार आहे. दरम्यान चंद्र देखील दशम स्थानातून प्रवास सुरू करीत आपल्या राशीत येणार आहे. राशीस्वामी अष्टमात असल्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला त्याचे फारसे सहकार्य आपणांस मिळेल असे वाटत नाही. व्ययातला गुरु देखील फारसा उपयुक्त नाही. या प्रतिकूल ग्रहमानात शनि धनस्थानातून आठमुठेपणा करू शकतो.त्यामुळे आपले आर्थिक अंदाजपत्रक कोलमडून जाण्याची शक्यता आहे. अनपेक्षित मोठे खर्च आणि आपली खर्चाळू वृत्ती देखील त्यास कारणीभूत ठरू शकते. जुनी येणी अडतील. आर्थिक फसवणूक व नुकसान यांचा मोठा फटका बसू नये म्हणून सतर्क रहायला हवे. भावनेच्या आहारी जाऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक- २४,२५,२६,२७.
वृश्‍चिक- अनपेक्षित खर्चाचे प्रसंग
आपला राशीस्वामी मंगळ या आठवड्यात भाग्य स्थानात रविसोबत अस्तंगत आहे. तर आपल्या सप्तम स्थानात या आठवड्याच्या मध्यापर्यंत शुक्र असणार आहे. चंद्र भाग्य स्थानातून निघून व्यय स्थानापर्यंतचा प्रवास करणार आहे. बरीच अस्थिरता व मनाचा त्रागा निर्माण करणारी स्थिती आहे. धनेश गुरु लाभात असल्याने आर्थिक स्थिती समाधानकारक राहणार असली तरी अनपेक्षित खर्चाचे प्रसंग उद्भवण्याचा धोका आहेच. प्रवासात त्रास, नुकसान, फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राशीतील वक्री शनि काहीसा त्रासदायक राहील. स्थावर व कोर्टाच्या कामात विलंब किंवा अपयश दर्शवीत आहे. नोकरीत हितशत्रूंच्या कारवाया तर व्यवसायातील स्पर्धा जीव मेटाकुटीस आणेल. प्रकृतीच्या दृष्टीनेही तो चांगला नाही. पोटाचे, महिलांना ओटीपोटाचे त्रास संभवतात. सणांच्या वातावरणात प्रत्यक्ष सहभाग व आप्तेष्टांच्या भेटीगाठीमुळे काहीसा विरंगुळा मिळू शकेल. शुभ दिनांक- २३,२४,२७,२९.
धनु- मेहनतीचे उत्तम फळ
याही आठवड्यात आपला राशीस्वामी गुरु दशम स्थानात असून व्ययस्थानात वक्री शनि आहे. अष्टमात  अस्तंगत मंगळाच्या सोबतीला रवि आलेला आहे. चंद्र या आठवड्यात अष्टम स्थानातूनच प्रवास सुरू करीत लाभ स्थानी जाणार आहे. गुरु दशमात असल्यामुळे काही दिवसांपूर्वी घेतलेल्या व्यावसायिक निर्णयाचे, केलेल्या कामाचे, मेहनतीचे उत्तम फळ आता आपणांस मिळण्याची शक्यता आहे. अडलेली कामे मार्गी लागतील व त्यातून धनप्राप्ती होण्याचे संकेत देत आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीला आता यश मिळेल. पण असे असतानाही आपणांस आर्थिक व्यवहारात सतर्क राहावे लागणार आहे. शनिची धनस्तानावर दृष्टी आहे.  कुटुंबाची साथ आपणांस वेळोवेळी मिळणार असली तरी आपणांस त्यांचे मन राखण्याचे धोरण स्वीकारावे लागेल. शुभ दिनांक- २५,२६,२७,२८.
मकर- मंगलकार्याच्या वाटाघाटी
राशीस्वामी शनि वक्री स्थितीत लाभ स्थानात असून तो त्याची आपल्या राशीवर दृष्टी आहे. तसेच सप्तमातून अस्तंगत मंगळ व रविची तर भाग्यातून गुरुची देखील आपल्या राशीवर दृष्टी आहे. चंद्र सप्तम स्थानातून प्रवास सुरू करीत आठवडाअखेर दशमस्थानी जाईल. राशीस्वामी शनिचे उत्तम सहकार्य आपणांस मिळत आहे. अन्य ग्रहस्थिती देखील बरीचशी उपयुक्त आहे. भाग्यस्थानातून येणारी गुरुची दृष्टी घरात मंगल कार्याच्या वाटाघाटी घडवू शकते. विशेषतः या आठवड्याच्या मध्यात होणार्‍या शुक्राच्या राश्यांतरानंतर त्यांना वेग यावा. संततीची चांगली प्रगती होईल. व्यवसायात प्रतिष्ठा व राजकारणात असलेल्यांना उत्तम यश मिळू शकेल. अवाजवी खर्च करण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण हवे. तसेच व्यसने, प्रलोभने, हितशत्रूंच्या कारवाया यांबाबत दक्ष राहण्याची गरज आहे. शुभ दिनांक- २३,२४,२७,२८.
कुंभ- चिकाटीनेच यशाला गवसणी
या आठवड्याच्या आरंभी राशीस्वामी शनि दशम स्थानात असून आपल्या राशीत केतू आहे. आपल्या राशीवर सप्तमातून बुध व राहूची दृष्टी असून शुभंकर गुरु देखील अष्टमात आहे.  राशीस्वामी शनि दशमातून सुखवृद्धी करणारा ठरू शकतो. त्यामुळे चिकाटी व जिद्द ठेवल्यास अनेक कठीण प्रसंगांवर मात करून तुम्ही आपले ईप्सित गाठू शकाल. उशीरा कां होईना मात्र यश निश्‍चित मिळेल याची ग्वाही हा सुयोगात असलेला शनि देत आहे. मात्र अष्टमातील गुरु व राहूच्या तावडीत सापडलेला बुध विद्यार्थीवर्गाला तसेच शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना काहीसे त्रासदायक ठरू शकतात. संततीकडून अपेक्षाभंगामुळे मनस्ताप करणारा प्रसंग निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्र व बांधवांचे सहकार्य मिळेल. शुभ दिनांक- २४,२५,२६,२७.
मीन- सत्पुरुषांचा सहवास लाभेल
राशीस्वामी गुरु सप्तमस्थानातून आपल्या राशीला शुभदृष्टीनेे पाहात आहे. अशात चंद्रही शुभकारक पंचम स्थानातून प्रवास सुरू करीत आठवडाअखेर पीडादायक अष्टम स्थानात जाणार आहे. भाग्य स्थानात वक्री होऊन बसलेला शनि काहीसा उपद्रवी ठरणार आहे. धनस्थानातील शुक्र हा हौशीने, आवडीने, छंदाखातर खर्चवाढ दर्शवीत आहे. एखादा प्रवास, मंगल व कौटुंबिक कार्यातील सहभागामुळेही मोठा खर्च होऊ शकतो. उत्तरार्धात शुक्राच्या राश्यांतरानंतर कुटुंबात विशेषतः ज्येष्ठ महिलांच्या प्रकृतीबाबत चिंता उत्पन्न होऊ शकते. कौटुंबिक कार्ये, सणांमध्ये सहभाग वाढावा. नातेवाईक, मित्र, आप्तेष्टांच्या भेटी व्हाव्यात.  मंदगतीने कामे होतील. स्थावराच्या व्यवहारात सतर्क रहावे. सत्पुरुषांचा सहवास लाभेल. काही मंडळींना जुन्या दुखण्यांच्या वाढीचे भय राहू शकते. त्याची काळजी घ्यावी. शुभ दिनांक- २३,२४,२८,२९.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६